पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताची स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात दाखल


भारतातल्या मोठ्या उद्योगांनी तसेच 100 पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी पुरविलेल्या देशी उपकरणे आणि यंत्रसामुग्रीचा वापर करून आयएनएस विक्रांतची निर्मिती

भारताच्या सागरी आणि नौदल इतिहासातली आजवरची सर्वात मोठी युद्धनौका; तसेच यावर अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आहेत.

भूतकाळातील वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकत, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित अशा मुद्रा चिन्हांकित नौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले अनावरण

“आयएनएस विक्रांत ही केवळ युद्धनौकाच नाही. हे 21व्या शतकातील भारताचे परिश्रम, कौशल्य, प्रभाव आणि कटिबद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे”-पंतप्रधान

“भारत आत्मनिर्भर होत आहे याचे अद्वितीय उदाहरण म्हणजे आयएनएस विक्रांत”

“आयएनएस विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे प्रतीक आहे.”

“आजवर भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामीच्या खुणा होत्या. पण आजपासून शिवाजी महाराजांपासून प्रेरित नवा नौदल ध्वज समुद्रात आणि आकाशात दिमाखात फडकणार आहे”

“विक्रांतवर नौदलाच्या अनेक महिला सैनिकांची नियुक्ती केली जाईल. अथांग सागरी शक्तीला अमर्याद स्त्रीशक्ती जोड मिळेल.”

Posted On: 02 SEP 2022 11:00AM by PIB Mumbai

भारताच्या  संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकणाऱ्या आणि भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील अनावरण केले.

“आज इथे केरळच्या किनाऱ्यावर प्रत्येक भारतीय, भविष्याच्या नव्या सूर्योदयाचा साक्षीदार आहे. हा समारंभ आयएनएस विक्रांतवर होत आहे, ही जागतिक नकाशावर सातत्याने उंचावत असलेले भारताचे मनोबल दर्शवणारी घटना आहे. आज स्वातंत्र्य सैनिकांचे सक्षम आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न साकार होताना आपण बघत आहोत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. “विक्रांत भव्य आहे, दिव्य आहे आणि विशाल आहे. विक्रांत ही युद्धनौका विशेष आहे, विक्रांत खास देखील आहे. विक्रांत ही केवळ  युद्धनौकाच नाही. हे 21व्या शतकातील भारताची मेहनत, कौशल्य, प्रभाव आणि कटिबद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जेव्हा दूरचे लक्ष्य असते, प्रवास मोठा असतो, समुद्र आणि आव्हाने अनंत असतात, तेव्हा त्याला भारताचे उत्तर आहे विक्रांत. कशाशीही तुलना न होऊ शकणारे, अतुल्य असे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे अमृत म्हणजे विक्रांत. विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे अद्वितीय प्रतीक आहे.”

आजच्या भारतासाठी कुठलेही आव्हान कठीण नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. “आज भारत, स्वदेशी तंत्रज्ञानाने इतक्या महाकाय विमानवाहू नौका बनविणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आज आएनएस विक्रांतने देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, देशात नवीन आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पावर काम करणारे नौदल अधिकारी, कोचीन जहाज बांधणी केंद्राचे अभियंते, वैज्ञानिक आणि विशेषतः कामगारांचे अभिनंदन केले, त्यांची प्रशंसा केली. ओणमच्या शुभ आणि आनंदी मुहूर्तावर हा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे मोदी म्हणले.

आयएनएस विक्रांतच्या प्रत्येक भागाची स्वतःची गुणवत्ता आहे, शक्ती आहे, स्वतःची एक विकास यात्रा आहे. विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे प्रतीक आहे. याच्या एअरबेसमध्ये लावलेले पोलाद देखील स्वदेशी बनावटीचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. या विमानवाहू युद्ध नौकेच्या भव्य क्षमता समजावून सांगताना नरेंद्र मोदी म्हणले, हे एक तरंगते शहर आहे. यावर इतकी वीज निर्माण होते, की ज्यामुळे 5,000 घरांना वीज पुरवठा होऊ शकतो आणि यात वापरण्यात आलेल्या वायरिंगची लांबी इतकी आहे, ते कोची पासून काशी पर्यंत पोहोचू शकेल. आयएनएस विक्रांत हे पंच प्रण या भावनेचे मूर्तिमंत स्वरूप आहे, ज्याचा उल्लेख त्यांनी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून केला होता.

यावेळी, भारतातील दर्यावर्दी परंपरा आणि नौदलाच्या सामर्थ्याविषयी देखील पंतप्रधानांनी भाष्य केले. छत्रपती वीर शिवाजी महाराजांनी ह्याच सागरी सामर्थ्याचा वापर करुन, असे सशक्त आरमार उभे केले होते, ज्याने स्वराज्याच्या शत्रूवर  सतत त्यांची जरब असे, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा ब्रिटिश भारतात आले,त्यावेळी त्यांनाही भारतीय नौकांच्या ताकदीचा आणि त्यांच्याद्वारे होणाऱ्या व्यापाराचे दडपण असे. आणि म्हणूनच, भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी, भारताचे हे सामर्थ्य मोडून काढणे आवश्यक आहे, हे ओळखून त्यांनी भारताचा सागरी शक्तीचा पाठीचा कणा मोडायचे ठरवले. ब्रिटिश संसदेचा त्यावेळेचा कायदा वापरुन, मग भारतीय जहाजांवर आणि सागरी व्यापाऱ्यांवर त्यानंतर कसे जाचक निर्बंध  घालण्यात आले, याचा इतिहास साक्षी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आज, 2 सप्टेंबर 2022 हा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक ठरला असून, भारताने, गुलामीच्या खुणा, गुलामीचे ओझे काढून फेकून दिले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.आतापर्यंत, भारतीय नौदलाच्या ध्वजावर, गुलामीची खूण कायम होती. मात्र, आजपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन, तयार करण्यात आलेला हा नौदलाचा नवा ध्वज, भारताच्या समुद्रात आणि आकाशात दिमाखाने फडकेल, असे पंतप्रधान म्हणाले.

जेव्हा, विक्रांत, आपल्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी सज्ज होईल, तेव्हा, भारतीय नौदलातील अनेक महिला सैनिकही त्यावर तैनात केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. सागराच्या या अपार सामर्थ्याला, अमर्याद स्त्रीशक्तीची जोड मिळेल, आणि हे जहाज भारताची एक भव्य ओळख सांगणारे ठरेल.आता नौदलाच्या सर्व शाखांमध्ये महिलांना प्रवेश देण्याची दारे खुली करण्यात आली आहेत, असेही मोदी यांनी सांगितले. आता त्यांच्यावर कुठलीही बंधने नाहीत. सक्षम, शक्तिमान लाटांना जसे रोखता येत नाही, तसेच, आता भारताच्या कन्या देखील निर्बंधमुक्त, बंधनविरहित काम करु शकतील, असे त्यांनी सांगितले.

पाण्याच्या एकेका थेंबापासून हा विशाल महासागर बनतो, असे पंतप्रधान म्हणाले. या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात, देण्यात आलेली भारतीय बनावटीच्या तोफांची सलामी, हा आनंददायी क्षण होता,असे त्यांनी नमूद केले. तसेच जर देशातील प्रत्येक व्यक्तीने, ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र जपायला आणि त्याचे आचरण करायला सुरुवात केली, तर देश आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आजच्या बदललेल्या भू-राजकीय परिस्थितीविषयी भाष्य करतांना ते म्हणाले की, याआधी, हिंद-प्रशांत महासागर आणि  हिंद महासागराच्या सुरक्षेच्या मुद्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले जात असे. मात्र, आज भरतासारख्या देशात, संरक्षण  क्षेत्राच्या धोरणात, ह्या प्रदेशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी, आम्ही प्रत्येक दिशेने, जे शक्य असतील ते प्रयत्न करतो आहोत. मग नौदलासाठीचा निधी वाढवणे, नौदलाच्या क्षमता वाढवण्यापर्यंत काम सुरु आहे. मजबूत भारतच, शांततामय आणि सुरक्षित जगाचा मार्ग खुला करु शकतो, असे त्यांनी सांगितले.

केरळचे राज्यपाल, आरीफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, व्ही. मुरलीधरन, अजय भट्ट, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नौदलप्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आयएनएस विक्रांत:  

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका, भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येणारी संस्था, युद्धनौका संरचना विभाग (WDB) ने या जहाजाची संरचना तयार केली असून, तिची निर्मिती, जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधीन असलेली, सार्वजनिक जहाजबांधणी संस्था, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे. या जहाजात सर्व अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आणि उपकरणे आहेत.  भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे.

भारताची पहिली, विमानवाहू युद्धनौका, विक्रांतच्या स्मरणार्थ, ह्या नव्या युद्धनौकेचे नावही विक्रांत ठेवण्यात आले आहे. आपल्या आधीच्या विक्रांत युद्धनौकेने, 1971 च्या युद्धात, महत्वाची कामगिरी बजावली होती.  ह्या युद्धनौकेवर, मोठ्या प्रमाणात, स्वदेशी बनावटीची उपरकणे आणि मशीनरी आहे. ही उपकरणे आणि मशीनरी (यंत्रसामुग्री) करण्यात, भारताच्या मोठ्या उद्योगसमूहासह 100 पेक्षा एमएसएमई कंपन्यांनी हातभार लावला आहे. विक्रांतच्या जलावतरणामुळे, आता नौदलाच्या ताफ्यात, दोन कार्यरत विमानवाहू नौका आल्या असून, ज्यामुळे भारताचे नौदल सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.   

यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते, नौदलाच्या नव्या ध्वजाचे (निशान) अनावरणही करण्यात आले. यावर असलेल्या  भारताच्या वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून भारताच्या समृद्ध सागरी परंपरेच्या वारशाचा गौरव करणारी मुद्रा चिन्हांकित करण्यात आली आहे.  

 

***

Jaydevi PS/R Aghor/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856267) Visitor Counter : 2125