संरक्षण मंत्रालय
स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका होणार नौदलाच्या सेवेत दाखल
Posted On:
25 AUG 2022 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022
आत्मनिर्भरता प्रत्यक्षात साकारण्याच्या देशाच्या वचनबद्धतेत भारतीय नौदल आणि संपूर्ण देशासाठी 02 सप्टेंबर 2022 हा दिवस ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. या दिवशी स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका 'विक्रांत' भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. माननीय पंतप्रधान या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विक्रांत, ही भारतात बांधण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे. ती भारतीय नौदलासाठी आरेखित आणि बांधण्यात आलेली पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौकादेखील आहे.
भारतीय नौदलाची संस्था असलेल्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने तिचे आरेखन केले असून बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील जहाज कारखाना मेसर्स कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची बांधणी केली आहे. 1971 च्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका विक्रांतच्या नावावरून या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे.
विक्रांत म्हणजे विजयी आणि शौर्य. पूर्ण क्षमतेच्या सामग्रीसह सुमारे 43000 टनाची विक्रांत 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद असून 7500 नौटिकल मैल टिकाव क्षमतेसह 28 नॉट्सची तिची कमाल गती आहे. जहाजात सुमारे 2200 कक्ष असून ते युद्धनौकेवरील 1600 कर्मचारीवर्गासाठी आरेखित केले आहेत ज्यात महिला अधिकारी आणि खलाशांना सामावून घेण्यासाठी विशेष केबिन्सचा समावेश आहे.
ही युद्धनौका हवाई पथकाच्या कार्यान्वयासाठी सक्षम असेल ज्यामध्ये स्वदेशी बनावटीची प्रगत हलक्या वजनाची हेलिकॉप्टर (ALH) आणि हलक्या वजनाची लढाऊ (LCA) (नौदल) यांच्यासहमिग-29K लढाऊ विमाने, कामोव्ह-31, MH-60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर अशा 30 विमानांचा समावेश असेल. शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (STOBAR) या नावाने ओळखल्या जाणार्या नवीन एअरक्राफ्ट-ऑपरेशन मोडचा वापर करून, स्वदेशी विमानवाहू नौका, विमान सुरू करण्यासाठी स्की-जंप आणि जहाजावर त्यांच्या दुरुस्तीसाठी तीन 'अरेस्टर वायर्स'च्या संचासह सुसज्ज आहे.
'विक्रांत'वर मोठ्या प्रमाणात स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्री आहे. यात देशातील प्रमुख औद्योगिक कंपन्या उदा. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भेल , गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, केल्ट्रॉन , किर्लोस्कर , एल अँड टी , इत्यादींसह 100 हून अधिक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग कंपन्यांचा समावेश आहे. स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांमुळे कोचिन शिपयार्ड लिमिटेडच्या 2000 कर्मचार्यांना आणि संलग्न उद्योगांमधील सुमारे 13000 कर्मचार्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच संलग्न उद्योगांचा विकासही झाला आहे.
02 सप्टेंबर 22 रोजी 'विक्रांत' कार्यान्वित झाल्यावर, भारत निवडक देशांच्या गटात सहभागी होईल ज्यात स्वदेशी बनावटीची आणि विमानवाहू वाहक तयार करण्याची विशिष्ट क्षमता आहे, जी भारत सरकारच्या मेक इन इंडियाची साक्ष असेल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान 'विक्रांत'चे कार्यान्वित होणे हा राष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण असेल. हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा वृद्धिंगत करण्याच्या क्षमताबांधणीत देशाच्या जोश आणि उत्साहाचा तो खरा पुरावा आहे. क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्यासाठी योगदान देण्यासाठी भारतीय नौदलाची अटल वचनबद्धता त्यातून प्रदर्शित होईल.
अशा प्रकारे ‘विक्रांत’चा समावेश हे केवळ आपल्या संरक्षण सज्जतेला बळकटी देण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल तर आहेच, त्यासोबत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि 1971 च्या युद्धात वीर जवानांनी दिलेल्या बलिदानाला विनम्र श्रद्धांजली आहे.
7LBX.jpeg)


N.Chitale/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1854521)