कोळसा मंत्रालय

कोळसा क्षेत्राची कामगिरी उत्कृष्ट - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Posted On: 18 AUG 2022 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2022

 

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या अडचणी असूनदेखील भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करत  असल्याचे केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे आयोजित 2021-22 च्या कोळसा मंत्री पुरस्कार कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यात कोळसा क्षेत्राने महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आणि तिच्या उप-कंपन्यांनी कोळशाचे उत्पादन वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन जोशी यांनी केले. कोळसा सचिव डॉ. अनिल  कुमार जैन, कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष प्रमोद अगरवाल आणि मंत्रालय आणि कोल इंडियाच्या उप-कंपन्यांचे अन्य वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.  

Image

गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या या पुरस्काराचा हेतू केवळ सीआयएलच्या कोळसा उत्पादक कंपन्यांपैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांची प्रशंसा  आणि दखल  इतकाच  नसून, परस्परात निकोप स्पर्धेची  भावना निर्माण करणे हा आहे.       

पहिल्यांदाच देण्यात आलेले गेल्या वर्षीचे पुरस्कार सुरक्षा, उत्पादन आणि उत्पादकता आणि शाश्वतता (टिकाऊपणा) या तीन श्रेणींसाठी होते. या परीक्षेत्राचा विस्तार करून यंदाच्या वर्षी त्यामध्ये दर्जा आणि ईआरपी अंमलबजावणी या दोन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला. आणखी पुढे जात, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांच्या महा व्यवस्थापकांना देखील यंदाच्या वर्षी गौरविण्यात आले आणि त्यांना चार उप-श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले.        

Image

पाच श्रेणींमध्ये देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये महानदी कोल फिल्ड्स लिमिटेड (MCL) ने सुरक्षा, उत्पादन आणि उत्पादकता आणि दर्जा या तीन श्रेणींमध्ये प्रथम पुरस्कार पटकावला. शाश्वतता (टिकाऊपणा) श्रेणीतील प्रथम पारितोषिक वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) ला मिळाले, तर नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) ला ईआरपीच्या अंमलबजावणीमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले.    

यंदाच्या वर्षी देखील आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी कायम राखत, सीआयएल च्या आतापर्यंतच्या (11 ऑगस्ट, 2022) 224 दशलक्ष टन उत्पादनाने 24% इतकी मजबूत वृद्धी नोंदवली आहे. 

तसेच, महामारी नंतर देश आपल्या आर्थिक विकासाला पुन्हा चालना देत असताना कोल इंडियाचा भांडवली खर्च आर्थिक वर्ष 2022 मध्ये 15,400  कोटी या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून, सलग दुसर्‍या वर्षी त्याने आपले उद्दिष्ट ओलांडले आहे.        

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853004) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu