माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला


हिंदी चित्रपटसृष्टीतील सुभाष घई, राकेश मेहरा, जॅकी श्रॉफ, दिव्या दत्ता आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर कार्यक्रमात झाले सहभागी

Posted On: 15 AUG 2022 8:35PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2022

 

नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या  ध्वजारोहण समारंभाला  चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा आणि सुभाष घई यांच्यासह अभिनेते जॅकी श्रॉफ  , दिव्या दत्ता, निर्माता शब्बीर बॉक्सवाला आणि पटकथा लेखक संदीप श्रीवास्तव हे देखील  उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिल्म्स डिव्हिजनने स्वातंत्र्य लढ्यावरील 18 चित्रपट आणि महत्त्वाचे ऐतिहासिक क्षण यांचे संकलन  केलेल्या  विशेष डीव्हीडी  संचाचे यावेळी  प्रकाशन करण्यात आले.

कर्मा, भाग मिल्खा भाग आणि शेरशाह या लोकप्रिय देशभक्तीपर चित्रपटांचे सर्वांसाठी मोफत स्क्रीनिंग आयोजित  करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक  आणि सीबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  रविंद्र भाकर म्हणाले, “हे वर्ष भारतातील तसेच जगभरातल्या सर्व भारतीयांसाठी खास आहे,  आपण  आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.  सिनेमा हे खूप  सशक्त माध्यम आहे आणि देशाला जागतिक नकाशावर आणण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे

मला आनंद आहे की चित्रपटसृष्टीतले हे मान्यवर या कार्यक्रमासाठी वेळ काढून आले. येत्या काही वर्षांत आणखी  समृद्ध चित्रपटांची उत्सुकतेने वाट पाहत आहोत. ”

“या वर्षी हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून इतक्या लोकांना  झेंडे फडकवताना पाहणे ही देखील अभिमानाची  बाब आहे. आपणही आपली  सर्वोत्तम  कामगिरी करूया . भारताचा विकास आणि वैभव आणखी वाढवूया. ” असे  भाकर म्हणाले.

कर्मा चित्रपटाबद्दल  बोलताना चित्रपट निर्माते सुभाष घई म्हणाले, “सिनेमामध्ये अशी जादू असते जी प्रेक्षकांशी, त्यांच्या हृदयाशी आणि आत्म्याशी जाऊन भिडते. चित्रपटांमधील  देशभक्तीबद्दल बोलताना ते म्हणाले की  यासाठी लेखकाला देशभक्तीच्या भावनेची जाणीव असावी लागते, दिग्दर्शकाने ते अनुभवायला हवे ,  कलाकारांना त्यांच्या देशाप्रति  त्या भावना जाणवल्या पाहिजेत. तेव्हाच तुम्ही ती जादू निर्माण करू शकता. 'हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए… मला वाटतं चित्रपटात सहभागी असलेल्या प्रत्येकाला ते वाटलं होतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही त्या भावना जाणवल्या.”असे त्यांनी नमूद केले.

जॅकी श्रॉफ  म्हणाले, “ या चित्रपटात काम करायला मिळाले हे मी  माझे भाग्य मानतो. चित्रपटाशी निगडीत अनेक छान आठवणी आहेत . मला आठवते दिलीपजी अतिशय मृदू स्वभावाचे  होते , त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी आम्हाला अक्षरशः त्यांच्या  जवळ जावे लागायचे. आज या चित्रपट संग्रहालयात स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी समारंभात सहभागी होताना अतिशय आनंद  झाला आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी भाग मिल्खा भागबद्दल सांगितले. ते  म्हणाले, “भाग मिल्खा भागच्या माध्यमातून मला फाळणी आणि आज आपण साजरे करत असलेल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांना मोजावी लागलेली किंमत या संदर्भातील एक कथा सांगायची होती. मला आठवतंय ,चित्रपट पाहिल्यानंतर  मिल्खा सिंग म्हणाले होते , 'मेरी सारी नफरत पाकिस्तान के खिलाफ मिट  गई, याच भावनेसाठी हा चित्रपट बनवला होता ”

यावेळी बोलताना दिव्या दत्ता म्हणाली, “देशप्रेमावर आधारित चित्रपटांचा भाग बनता आले म्हणून मी खूप भाग्यवान आहे. माझी व्यक्तिरेखा साकारताना मला एका बहिणीची वेदना जाणवली. ही जादू आहे , अभिनेता म्हणून आपण पडद्यावर साकारत असलेल्या वास्तविक जीवनातील पात्रांमधून त्यांच्या भावना, वेदना, त्यांचा अभिमान अनुभवता येतो.”

पटकथा लेखक संदीप श्रीवास्तव म्हणाले, “देशभक्ती ही दाखवण्यापुरती नव्हे तर ती  कृतीत असते.  एक जवान आपले शौर्य दाखवतो, त्यांना ते  सांगण्याची गरज नाही.  जर प्रत्येकाने  ही मूल्ये योग्यरित्या समजून घेतली , तर त्या भावना लोकांशी जोडल्या जातात."

शेरशाहबद्दल शब्बीर बॉक्सवाला म्हणाले, “ चांगला सिनेमा जग बदलू शकतो यावर माझा कायम विश्वास आहे.  जेव्हा शेरशाहची कथा माझ्याकडे आली, तेव्हा मला सर्वात जास्त भावलेली  गोष्ट म्हणजे मेजर विक्रम बत्रा यांनी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी एवढे काही केलं, ज्या वयात आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात  काय करायचे आहे ते स्पष्ट माहित नसते.  त्यांच्या कथेने अनेकांना प्रेरणा दिली आहे.”

या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75  वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेच्या आवाहनानुसार देश स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय   हे देशातील पहिले चित्रपट संग्रहालय आहे, जिथे भारतीय चित्रपटसृष्टीच्या  100 वर्षातील ऐतिहासिक घटनांच्या नोंदी आहेत, ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटापासून ते तांत्रिकदृष्ट्या प्रगत आजच्या चित्रपटांपर्यंतच्या नोंदी आहेत. सिनेमा आणि भारताचे स्वातंत्र्य एकत्र साजरे करण्याचे हे योग्य ठिकाण आहे.’


* * *

PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852113) Visitor Counter : 111


Read this release in: English