संरक्षण मंत्रालय
देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या कोणत्याही शक्तीपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
13 AUG 2022 6:19PM by PIB Mumbai
देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता याकडे कोणत्याही भारत-विरोधी शक्तींना वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस होऊ नये, यासाठी सरकारने पूर्णपणे सुसज्ज सुरक्षा यंत्रणा उभारली आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. जोधपूर येथे आज मारवाडचे प्रसिद्ध योद्धा वीर दुर्गादास राठोड यांच्या पुतळ्याचे अनावरण संरक्षणमंत्र्यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून भारताच्या जनतेचे संरक्षण आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे, असे सिंह यांनी सांगितले आणि देशाची शांतता आणि सौहार्द यांचा भंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. संरक्षण दलांना अत्याधुनिक शस्त्रे/ उपकरणे यांनी सुसज्ज केले जात आहे आणि भविष्यातील कोणत्याही धोक्यांना तोंड देण्यासाठी आणि देशहिताचे रक्षण करण्यासाठी ते सज्ज आहेत, असे त्यांनी नमूद केले.
संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करण्याचे आणि एक भक्कम लष्कर उभारण्याचे महत्त्व संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. संरक्षण मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत स्वदेशी बनावटीची शस्त्रे/उपकरणे यांचे उत्पादन करण्यासाठी अनेक सुधारणा हाती घेतल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सरकारने गेल्या काही वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे भारताने जगातील आघाडीच्या 25 संरक्षण निर्यातदारांमध्ये झेप घेतली आहे, असे ते म्हणाले. या दशकाच्या अखेरपर्यंत भारताला संरक्षण सामग्रीचा प्रमुख निर्यातदार बनवण्याचा आमचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्र्यांनी यावेळी वीर दुर्गादास राठोड यांना अभिवादन केले. समाजातील विभाजनवादी घटकांच्या विरोधात शांतता आणि सौहार्दासाठी झटणारे वीर दुर्गादास राठोड यांच्याकडून कोणत्याही जातीधर्मातील लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851566)
Visitor Counter : 203