माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्यूरोद्वारे महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे विविध पैलू प्रदर्शित करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन


फिरत्या प्रचार वाहनाद्वारे हर घर तिरंगा अभियान जनजागृती मोहीम

Posted On: 11 AUG 2022 7:50PM by PIB Mumbai

मुंबई, 11 ऑगस्ट 2022

 

 

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो , प्रादेशिक कार्यालय, पुणेद्वारे  महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि सोलापूर येथे रेल्वे, मेट्रो आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छायाचित्र प्रदर्शनासह विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत औरंगाबाद रेल्वे स्थानक येथे  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवणारी विशेष प्रसिद्धी मोहीम आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, सर्वसामान्य जनतेत जनजागृती करण्यासाठी प्रख्यात वक्त्यांची व्याख्याने, क्रीडा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासारखे विविध कार्यक्रम होणार आहेत. 

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू टर्मिनस रेल्वे स्थानकात  छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात 1700 ते 1947 या काळातील स्वातंत्र्यलढ्याची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. हे प्रदर्शन 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत नागरिकांसाठी खुले असेल.

नागपूरच्या सीताबर्डी मेट्रो स्थानक येथे स्वातंत्र्याचा   अमृत महोत्सव प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी नागपूर महानगरपालिका विशेष कोविड-19 लसीकरण शिबिर आयोजित करणार आहे.  स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव प्रदर्शनाबरोबरच, नागपूर आणि आसपासच्या भागात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या विकासकामांबाबत माहिती देणारे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या अनुषंगाने स्थानिक लोकांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे विभाग आणि सद्भावना सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरमधील सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी माहिती देणारे दालन या प्रदर्शनाचा एक भाग असेल. शहरात अनेक ठिकाणी फलकही लावण्यात येणार आहेत.

फिरत्या प्रचार वाहनाद्वारे 'हर घर तिरंगा अभियान' जनजागृती मोहीम.

केंद्रीय संचार ब्यूरो , प्रादेशिक कार्यालय, पुणे यांनी राज्याच्या ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने फिरत्या प्रचार वाहनाद्वारे हर घर तिरंगा अभियानासाठी  जनजागृती मोहीम सुरू केली आहे. हे प्रचार वाहन महाराष्ट्र आणि गोव्यातील  13  जिल्ह्यांतून फिरून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश आणि माहिती देत  आहेत.

केंद्रीय संचार ब्यूरो, पुणेची 11 विभागीय कार्यालये स्वातंत्र्य दिन 2022 पर्यंत ही मोहीम राबवणार आहेत. महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद लातूर, वर्धा आणि गोव्यातील पणजी या तेरा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे.   

 

S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851030) Visitor Counter : 178


Read this release in: English