सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालायचा विशेष उपक्रम, “22 वा भारत रंग महोत्सव” हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा नाट्य महोत्सव मुंबईत येत्या 9 ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार

Posted On: 07 AUG 2022 1:52PM by PIB Mumbai

मुंबई 7 ऑगस्ट 2022

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. यानिमित्त, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील, राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे, 22 वा भारत रंग महोत्सव आणि अमृतमहोत्सवाची सांगड घालत, देशभरात 16 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत, विशेष कार्यक्रम होत आहेत. 

याचाच भाग म्हणून, मुंबईतही हा महोत्सव होणार आहे. मुंबईत, 9 ते 13 ऑगस्ट 2022 या काळात राष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत, सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी संयुक्तरित्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता, रवींद्र नाट्य मंदिरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक आणि वाणी त्रिपाठी टिक्कू यांची या उद्घाटन समारंभाला विशेष उपस्थिती असेल. राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)चे संचालक, प्राध्यापक  रमेश चंद्र गौड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

 

उद्घाटन समारंभानंतर लगेचच, चंद्रकांत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या “आय एम सुभाष” या नाटकाचा प्रयोग होईल. 10 ऑगस्टला संध्याकाळी डॉ मंगेश बनसोड यांनी लिहिलेल्या ‘ गांधी-आंबेडकर’ नाटकाचा प्रयोग होईल. 11 ऑगस्टला रुपेश पवार यांचं नाटक “ऑगस्ट क्रांती”, 12 ऑगस्टला सुनील जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टिळक आणि आगरकर” या नाटकांचा प्रयोग होणार आहे. सर्व नाटकांचे प्रयोग संध्याकाळी सात वाजता होतील. महोत्सवाची सांगता, 13 ऑगस्ट मोहम्मद नजीर कुरेशी दिग्दर्शित ‘रंग दे बसंती चोला’ नाटकाने होईल.

मुंबईतल्या महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या, म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी, एनएसडीचे संचालक रमेश चंद्र गौड यांची पत्रकार परिषद मुंबईत पत्रसूचना कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. 
 
मुंबईसह दिल्ली, भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, बंगळुरू इथे हा महोत्सव साजरा होत आहे.

***

SonalT/RadhikaA/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849350) Visitor Counter : 405


Read this release in: English