दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाचे ‘ हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा)’ अभियान
गोवा विभागाला प्रत्येकी 25 रुपये दराने 15,100 राष्ट्र ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले
Posted On:
05 AUG 2022 7:00PM by PIB Mumbai
पणजी, 5 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने “हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा)” ही मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करून राष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून नागरिकांना आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकवायला प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे. 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत सर्व नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे अशी यामागची संकल्पना आहे.
टपाल विभागाचे विस्तृत जाळे लक्षात घेऊन, नागरिकांना या अभियानाचे महत्व समजावण्यासाठी आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रध्वजाचा पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रध्वजाचे वितरण करण्याची जबाबदारी टपाल विभागावर सोपवली आहे. टपाल संचालनालयाद्वारे राष्ट्रध्वज पुरवण्यात आले असून, त्यापैकी 15,100 राष्ट्रध्वज प्रत्येकी 25 रुपये दराने विक्रीसाठी गोवा विभागाला प्राप्त झाले आहेत. दुर्गम भागातील गावांमधील शाखांसह टपाल विभागाच्या सर्व शाखांना राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले असून, “हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा)” अभियानामध्ये नागरिकांना विकण्यासाठी ते उपलब्ध होतील.
“हर घर तिरंगा ” अभियानाबद्दल जनजागृती करण्यासाठी गोव्यामधील 7 प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये फ्लेक्स बॅनर प्रदर्शित करण्यात आले असून, पणजी, मडगाव, वास्को, कार्कोरेम, फोंडा, बिचोली आणि म्हापुसा या टपाल कार्यालयांचा यात समावेश आहे. प्रभावी जनजागृतीसाठी सर्व टपाल कार्यालयांमध्ये 10 ऑगस्ट 2022 पूर्वी हे बॅनर प्रदर्शित केले जातील.
हर घर तिरंगा अभियानाचा भाग म्हणून हर घर तिरंगा अभियानाबद्दल जनजागृती करण्यासाठी गोवा टपाल विभागाने प्रभात फेरीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये थिविम मतदारसंघाचे विधानसभा सदस्य नीलकांत हळणकर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि ते यात सहभागी झाले.
टपाल विभागाच्या पणजी आणि मडगाव येथील मुख्यालयात सेल्फी पॉइंट तयार केले जाणार असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सेल्फी घेण्यासाठी आणि #Indiapost4tiranga आणि #HarGharTiranga या हॅशटॅगसह इंडियापोस्ट आणि अमृत महोत्सव या हँडलना टॅग करून आपल्या सोशल मीडिया हँडलवर सेल्फी शेअर करायला प्रोत्साहन दिले जाईल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1848866)
Visitor Counter : 163