युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

44 व्या बुद्धीबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या महिला गटात तानिया सचदेवची चमकदार कामगिरी, सांघिक फेरीत महत्त्वाचा सामना जिंकला


चेन्नईच्या मलप्पुरम इथं सुरु असलेल्या 44 व्या बुद्धीबळ ऑलिंपियाड स्पर्धेच्या महिला गटात चौथ्या फेरीच्या सामन्यात, तानिया सचदेवनं केला, हंगेरीच्या खेळाडूचा पराभव

Posted On: 02 AUG 2022 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

चेन्नईच्या मल्लपुरम इथे सुरु असलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये महिला विभागाच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात, तानिया सचदेवनं प्रदीर्घ लढा देत महत्वाचा गुण मिळवत भारताला  हंगेरीविरुद्ध 2.5-1.5 असा विजय मिळवून दिला.

विशेष म्हणजे, कोनेरू हंपी, द्रोणवल्ली हरिका आणि आर. वैशाली या दिग्गज खेळाडूंच्या लढती अनिर्णित राहिल्यानंतर, सचदेवने आपल्या सामन्यात ही चमकदार कामगिरी केली. तिने हंगेरीच्या झ्सोका गाल ला नमवून निर्णायक गुण मिळवत संघासाठी सामना जिंकला.

“हा माझ्यासाठी परीक्षेचा काळ होता. आमचे दोन सामने अनिर्णित राहिले आहेत, हे मला माहीत होतं. आमचा प्रतिस्पर्धी मजबूत होता आणि त्यामुळे आम्हालाही, जिद्दीने आपला खेळ खेळण्याची गरज होती. म्हणून आता आपण संपूर्ण तयारीनिशी या सामन्यात उतरायला हवं असं मला वाटलं, असं सचदेवनं या सामन्यानंतर सांगितलं. 

“भारताचे संघ चांगले, संतुलित आहेत आणि एका वेळी एक फेरी घेणे खूप महत्वाचे ठरते. आजचे सर्व सामने चांगलेच लढले गेले,” असे भारताच्या महिला संघाचे प्रशिक्षक अभिजित कुंटे म्हणाले.

11व्या मानांकित भारतीय महिला ब संघानेही एस्टोनियाचा 2.5-1.5 गुणांसह असाच पराभव केला. वंतिका अग्रवालने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत, संघाला विजयी गुण मिळवून दिले तर इतर तीन सामने अनिर्णित राहिले. दरम्यान, चौथ्या दिवसाच्या मोठ्या सामन्यात, अमेरिकेच्या माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप (जागतिक अजिंक्यपद) स्पर्धेमधील चॅलेंजर फॅबियानो कारुआनाला उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोवने पराभूत केले.

17 वर्षीय प्रतिभावान अब्दुसत्तारोवच्या प्रयत्नांच्या जोरावर उझबेकिस्तानने अव्वल मानांकित बुद्धिबळपटूंचा ताफा बाळगणाऱ्या अमेरिकेला 2-2 असे बरोबरीत रोखले. खुल्या विभागातील इतर चौथ्या फेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या ब संघाने इटलीविरुद्ध 3-1 ने विजय मिळवला.

गुकेश आणि निहाल सरीन यांनी विजय मिळवला तर आर प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी यांनी बरोबरी साधली. गुकेशने डॅनियल वोकाचुरोविरुद्ध शानदार खेळाचे प्रदर्शन केले, ज्याने रविवारी मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले होते.  क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड गेममध्ये, गुकेश रणनैतिक खेळ करत प्याद्यांना घेरण्यावर भर दिला आणि 34 चालीनंतर गुण कमावला, जेव्हा त्याचा वजीर, हत्ती आणि उंटाने  प्रतिस्पर्ध्याच्या राजाला घेरले.  दुसरीकडे, द्वितीय मानांकित भारतीय अ संघाने चारही बोर्ड स्प्लिटिंग गुणांसह फ्रान्सबरोबर 2-2 अशी बरोबरी साधली तर भारताचा क संघ स्पेनकडून 1.5-2.5 गुणांनी पराभूत झाला.

 

* * *

S.Patil/Radhika/Rajashree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1847517) Visitor Counter : 194


Read this release in: English , Urdu , Hindi