युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकूल 2022 : भारतीय भारोत्तोलक संकेत सर्गरने जिंकले रौप्य तर पी गुरुराजाने  जिंकले कांस्य पदक

Posted On: 30 JUL 2022 9:20PM by PIB Mumbai

 

ठळक वैशिष्ट्ये:

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत सर्गर आणि पी गुरुराजा यांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल केले त्यांचे अभिनंदन
  • संकेतचे अभिनंदन करतांना भारताला तुझा अभिमान आहे असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे गौरवोद्गार

बर्मिगहॅम इथे सुरु असलेल्या  राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये, भारोत्तोलनाच्या 55 किलो वजनी गटात, भारताच्या संकेत सर्गरने रौप्य पदक जिंकत, भारताच्या विजयाचे खाते उघडले आहे. तर दुसरीकडे, 61 किलो वजनी गटात भारताच्याच पी. गुरुराजाने कांस्य पदक जिंकले आहे. या कामगिरीबद्दल संकेत सर्गर आणि पी. गुरुराजा यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह देशभरातल्या जनतेकडून अभिनंदन होत आहे.

    https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0017Q7Y.jpg      https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002UI2I.jpg

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संकेतचे अभिनंदन करतांना ट्वीट केले आहे, तुझ्या अविरत परिश्रमामुळेच आज भारताला हा गौरव प्राप्त झाला आहे. भारताने आज आपल्या पदकांचे खाते उघडले आहे, पुढच्या सगळ्या प्रयत्नांसाठी माझ्या खूप शुभेच्छा !

पी. गुरुराजाचे अभिनंदन करतांना राष्ट्रपती म्हणाल्या, राष्ट्रकुल स्पर्धेत भारोत्तोलनात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पी. गुरुराजाचे अभिनंदन ! तुझ्या यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. अशा पुढच्या अनेक प्रेरणादायक यशांसाठी माझ्या अनेक शुभेच्छा!

राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत भारोत्तोलनाच्या 55 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकेत सर्गरचे आणि कांस्य पदक पटकावल्याबद्दल पी. गुरुराजाचे अभिनंदन केले आहे. संकेत सर्गरचे खेळात अद्वितीय प्रदर्शन ! राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्य पदक जिंकत त्याने भारताला एक उत्तम सुरुवात करुन दिली आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या प्रयत्नांसाठी अनेक शुभेच्छा!

गुरुराजाचे अभिनंदन करतांना पंतप्रधान यांनी ट्वीट केले आहे, राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्याच्या पी गुरुराजा याच्या कामगिरीचा अतिशय आनंद झाला आहे.  त्याने अतिशय चिकाटी आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन केले. त्याच्या क्रीडाक्षेत्रातील पुढच्या प्रवासासाठी माझ्या अनेक शुभेच्छा!''

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील संकेत सर्गर आणि पी गुरुराजा यांचे या उत्कृष्ट कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे. संकेत सर्गरचे अभिनंदन करताना आपल्या ट्वीट मध्ये अनुराग ठाकूर म्हणाले, राष्ट्रकुल स्पर्धा  2022 मध्ये संकेत सर्गरने पुरुषांच्या 55 किग्रा (248 किग्रा) गटात भारोत्तोलन स्पर्धेचे रौप्य पदक पटकावून भारताचे पदकांचे खाते उघडले आहे.  सुवर्ण पदक थोडक्यात हुकले, पण भारताला तुझा खरोखर अभिमान आहे. अभिनंदन संकेत!

पी. गुरुराजाचे अभिनंदन करताना ठाकूर यांनी ट्वीट मध्ये म्हटले, पुरुषांच्या 61 किलो भारोत्तोलन स्पर्धेत पी. गुरुराजा याने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये कांस्य पदक मिळवून देशाला आणखी गौरव मिळवून दिला आहे. ज्या प्रकारे त्याने क्लीन अँड जर्क प्रकारात पुनरागमन केले ते खरोखरच प्रशंसनीय आहे. सलग दुसऱ्या राष्ट्रकूल पदकासाठी अभिनंदन पी. गुरुराजा आणि पुढच्या अनेक स्पर्धांसाठी शुभेच्छा.

संकेतने 2013 मध्ये भारोत्तोलन सुरु केले. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या संकेतच्या कुटुंबातच भारोत्तोलानाची आवड आहेत, त्याची बहिणदेखील भारोत्तोलन करते.

गुरुराजाने महाविद्यालयीन जीवनातच 2010 मध्ये भारोत्तोलन सुरु केले. तो 2015 ला भारतीय हवाई दलात रुजू झाला. त्याची 2016 मध्ये भारतीय राष्ट्रीय चमूत निवड करण्यात आली.

संकेत सर्गर विषयी  सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

पी गुरुराजा विषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1846611) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi