युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधानांनी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सुरुवात झाल्याची केली घोषणा
बुद्धिबळाची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात, बुद्धिबळाच्या मायदेशात आली आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांचा पाठींबा आणि ध्यास यांतून आम्हां सर्वांना क्रीडाक्षेत्राला अधिक सुधारणा करण्यासाठी काम करण्याची आणि भारताला क्रीडाक्षेत्रात जागतिक तोडीचा देश बनविण्याची प्रेरणा मिळते : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भारत प्रथमच भूषवित आहे; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडापथकासह देश या स्पर्धेत सहभागी होत आहे
Posted On:
28 JUL 2022 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नई येथील जेएलएन इनडोअर स्टेडीयम मध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सुरुवात झाल्याची घोषणा केली. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्यासह एफआयडीई अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्केडी वोर्कोव्हीच हे देखील यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जगभरातून भारतात आलेल्या खेळाडूंचे आणि बुद्धिबळ प्रेमींचे स्वागत केले. ही स्पर्धा ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’दरम्यान होत असल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाच्या काळाच्या महत्त्वाकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की बुद्धिबळाची ही सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात, बुद्धिबळाच्या मायदेशात आली आहे.
44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्पर्धा प्रथमच घडणाऱ्या अनेक गोष्टींची आणि अनेक विक्रमांची साक्षीदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुद्धिबळ खेळाचा उगम जेथे झाला त्या भारत देशात पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन होते आहे. 3 दशकानंतर ही स्पर्धा आशिया खंडात भरविली गेली आहे. आतापर्यंतच्या काळात सर्वात जास्त संख्येने देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. तसेच सर्वात जास्त संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. ते म्हणाले की या वेळी प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशाल रिलेची सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की ज्या भूमीत बुद्धिबळाचा खेळ उगम पावला तीच ही भारतभूमी आहे आणि इतिहासात प्रथमच भारत या प्रतिष्ठित स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की 40 दिवसांपूर्वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सर्वात पहिली मशाल रिले पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आली आणि त्यांनी ती मशाल आपल्या देशाचा जगप्रसिध्द बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्याकडे सोपविली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे होत असल्याबद्दल साजऱ्या होणाऱ्या अमृतमहोत्सवानिमित्त मशाल रिलेने देशातील विशेष महत्त्वाच्या 75 स्थळांना भेट दिली असे ठाकूर यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की पंतप्रधानांनी नेहमीच क्रीडाक्षेत्र आणि क्रीडापटूंना भक्कम पाठींबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठींबा आणि ध्यास यांतून आम्हा सर्वांना क्रीडाक्षेत्राला अधिक सुधारणा करण्यासाठी काम करण्याची आणि भारताला क्रीडाक्षेत्रात जागतिक तोडीचा देश बनविण्याची प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले. सध्या देशात 2700 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारणीच्या 300 पेक्षा जास्त प्रकल्पांचे काम सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली. खेलो इंडिया योजना देशातील युवा क्रीडापटूंची जोपासना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे याचा त्यांनी ठळक उल्लेख केला.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845999)
Visitor Counter : 165