कृषी मंत्रालय

कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास उझबेकिस्तान आणि भारत सहमत

Posted On: 28 JUL 2022 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2022


उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान जमशीद खोडजाव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यात आज नवी दिल्लीत फलदायी चर्चा झाली. बैठकीत दोन्ही देशांमधील कृषी क्षेत्रात सुरू असलेले सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली.

उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान म्हणून खोडजाव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना तोमर म्हणाले की, खोडजाव यांचा देशाचे कृषी मंत्री म्हणून पूर्वीचा अनुभव त्यांच्या नवीन कार्यभारासाठी खूप उपयुक्त ठरेल. तोमर म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये अतिशय चांगले राजनैतिक आणि व्यापारी संबंध आहेत.

कृषी क्षेत्रात परस्पर सहकार्यावर विशेष लक्ष दिल्याबद्दल तोमर यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी माहिती दिली की भारताने उझबेकिस्तानमधील द्राक्षे, आलुबुखार आणि गोड चेरीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची अधिसूचना लवकरच प्रकाशित केली जाईल, तर भारताला आंबा, केळी आणि सोयाबीन ऑइलकेकच्या निर्यातीसाठी उझबेकिस्तान कडून मान्यता मिळाली आहे, ज्यासाठी तोमर यांनी खोडजाव यांचे आभार मानले. डाळिंब, बटाटा, पपई आणि गहू आयात करण्याची परवानगी त्वरित देण्याचे आवाहन तोमर यांनी उझबेकिस्तानला केले आहे.

तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध पैलूंवर मोठ्या उत्साहाने काम केले जात आहे.

तत्पूर्वी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबद्दल भारताचे अभिनंदन करताना खोडजाव म्हणाले की, भारताचा कृषी क्षेत्रातील अनुभव खूप चांगला आहे, त्याविषयी तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या पाठबळाविषयी उझबेकिस्तानला जाणून घ्यायचे आहे. "भारताप्रमाणेच, आम्हाला उझबेकिस्तानमधील शेतीची दिशा बदलायची  आहे, ज्यासाठी आम्हाला भारताकडून शिकायचे आहे," ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थांना संशोधन आणि विकासाचे फायदे उझबेकिस्तानला सामायिक करण्याची विनंती केली. भारतीय शेतीमधील डिजिटायझेशनच्या वाढत्या प्रवृत्तीचे कौतुक करून खोडजाव यांनी भारतीय कंपन्यांसह उझबेकिस्तानमध्येही असेच डिजिटायझेशन करण्याचा मानस व्यक्त केला.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1845989) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi