माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्युरो गोवा यांच्याकडून कारगील विजय दिवस साजरा

Posted On: 26 JUL 2022 5:20PM by PIB Mumbai

गोवा, 26 जुलै 2022

 

माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय संचार ब्युरो, गोवा विभागाने आज पणजी येथील आझाद मैदानात कारगील विजय दिवस साजरा केला. I गोवा बटालियना एनसीसी आणि अखिल गोवा माजी-सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस महासंचालक जसपाल सिंग, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात कारगील योद्धे, माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेटसनी कारगील शहिदांना आदरांजली वाहिली.

   

याप्रसंगी संबोधित करताना पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी कारगील विजय भारतीय लष्कराच्या शौर्याचे एक प्रतिक आहे. कोणत्याही देशासाठी युद्ध ही काही योग्य परिस्थिती नसते, भारत नेहमीच शांततेचा पुरस्कार करत आला आहे. मात्र, शत्रुराष्ट्राने आगळीक केल्यानंतर भारताने तो हल्ला परतून लावला आणि विजय मिळवला. सध्या देशात आंतरिक सुरक्षेचा मुद्दा कळीचा आहे. गनिमी आणि छुपे (प्रॉक्सी) युद्धाने आंतरिक सुरक्षेवर कोणीही घाला घालू शकतो. मात्र, भारताने अशाप्रकारची आक्रमणेही उलटून टाकली आहेत. सध्या देशाला कुशल युवकांच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे युवकांनी सैन्यदलात मोठ्या प्रमाणात भरती व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

गोवा सैनिक कल्याण बोर्डाचे मेजर वेणुगोपाल नायर, अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटना आणि गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.

महापौरांनी आझाद मैदान ते युथ हॉस्टेल अशा तिरंगा यात्रेला झेंडा दाखवला. युथ हॉस्टेल येथील कार्यक्रमात कारगील युद्धातील जवानांना केंद्रीय संचार ब्युरोकडून सन्मानित करण्यात आले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियाझ बाबू, अविनाश गरुड, सत्यवान गवळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. एनसीसी कॅडेटसच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.  


* * *

PIB Panaji | S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845033) Visitor Counter : 137


Read this release in: English