संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लष्कराच्या दक्षिण कमांड येथील युद्धस्मारकात 23 व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 26 JUL 2022 4:23PM by PIB Mumbai

पुणे, 26 जुलै 2022

 

कारगिल विजय दिवसानिमित्त आज 26 जुलै 2022 रोजी  लष्कराच्या पुण्यातील दक्षिण कमांड मुख्यालय येथील युद्धस्मारकात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमात पुण्यातील तसेच  उपनगरातील  लष्करी अधिकारी उपस्थित होते. यावेळी कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य दाखवत वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दक्षिण कमांडच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने, दक्षिण कमांडचे चीफ ऑफ स्टाफ  लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकात या जवानांच्या  स्मृती प्रित्यर्थ पुष्पचक्र अर्पण केले.

‘ऑपरेशन विजय’ च्या यशामुळे ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. पाकिस्तानने , शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विश्वासघात करुन भारतीय शिखरांवर कब्जा घेतला होता, ती सगळी शिखरे भारतीय जवानांनी पुन्हा जिंकून घेतली. कारगिल युद्ध 60 दिवसांपेक्षा अधिक काळ चालले आणि याच दिवशी, 26 जुलै 1999 रोजी भारताने या युद्धात मोठा विजय मिळवला होता.

हा दिवस, आपल्याला जम्मू काश्मीरच्या प्रचंड थंडीच्या बर्फाळ प्रदेशात अत्यंत उंचावर आपल्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांशी युद्ध करतांना गाजवलेले अद्वितीय शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करुन देतो.  आपल्या तिन्ही सैन्यदलांचा पराक्रम, सर्वोच्च बलिदान आणि नेत्रदीपक विजयाचे स्मरण करत, हा विजय साजरा करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844970) Visitor Counter : 185


Read this release in: English