संरक्षण मंत्रालय

संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक

Posted On: 25 JUL 2022 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जुलै 2022

 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी सरकारने थेट परदेशी गुंतवणुकीचा मार्ग खुला करून दिनांक 17.09.2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रक क्रमांक 4 (2020 मालेतील) द्वारे स्वयंचलित मार्गाने 74% पर्यंत आणि सरकारी मार्गाने 100% पर्यंत थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. सुधारित थेट परदेशी गुंतवणूक धोरणाच्या अधिसूचनेपासून, मे, 2022 पर्यंत नोंदवलेला एकूण थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ अंदाजे 494 कोटी रुपये आहे. संरक्षण उत्पादन विभागाने (DDP) गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत:

  • संरक्षण उत्पादनासाठी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आकर्षित करण्यासाठी ऑफसेट धोरणात उच्च गुणकांची नियुक्ती.
  • परदेशी मूळ उपकरणे उत्पादकांसोबत (FOEMs) नियमितपणे विशिष्ट सल्लामसलत केली जाते.
  • तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश अशा दोन ठिकाणी संरक्षण कॉरिडॉर स्थापन केले आहेत जे कॉरिडॉरमधील परदेशी मूळ उपकरणे उत्पादकांसह उद्योगांना या क्षेत्रात कामासाठी पाठबळ देतात. दोन राज्य सरकारांनी अधिसूचित केलेल्या एरोस्पेस आणि संरक्षण धोरणांतर्गत, गुंतवणूक, रोजगार आणि प्रकल्पाच्या स्थानावर आधारित गुंतवणूकदारांना सानुकूलित प्रोत्साहन पॅकेज प्रदान केले जातात ज्यात विक्रीवरील जीएसटी आधारित परतावा, जमीन वाटपावरील मुद्रांक शुल्क सवलती, वीज कर सूट, भांडवली अनुदान आणि प्रशिक्षण कामगारांसाठी प्रशिक्षण अनुदान यांचा समावेश असू शकतो.
  • संरक्षण मंत्रालयाच्या (MoD) संरक्षण उत्पादन विभागांतर्गत भारतीय संरक्षण उद्योगांच्या सक्रिय सहभागासह परदेशातील भारतीय दूतावास आणि उद्योग संघटनांमार्फत मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांसोबत वेबिनार आयोजित केले जातात. आजपर्यंत मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या 27 देशांबरोबर वेबिनार आयोजित केले गेले आहेत.
  • गुंतवणुकीच्या संधी, कार्यपद्धती आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी नियामक आवश्यकतांशी संबंधित प्रश्नांसह सर्व आवश्यक माहिती प्रदान करण्यासाठी संरक्षण गुंतवणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाद्वारे आजपर्यंत 1,445 प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज राज्यसभेत के आर सुरेश रेड्डी यांनी विचारलेल्या प्रश्नाला  लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.


* * *

S.Kakade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844701) Visitor Counter : 219


Read this release in: English , Urdu