रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत पश्चिम रेल्वेने साबरमती स्थानकावर आयोजित केले ‘आझादी की रेल गाडी और स्टेशन्स’ हे प्रदर्शन


स्वातंत्रसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना केले सन्मानित

Posted On: 23 JUL 2022 10:58AM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवअंतर्गत आझादी की रेल गाडी और स्टेशन्सया उपक्रमाचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने साबरमती स्थानकावर एक प्रदर्शन भरविले आहे. अहमदाबाद विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक तरूण जैन यांनी काल या दोन दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. हे प्रदर्शन आता जनतेसाठी खुलं झालं आहे.

  

या प्रदर्शनात महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करणारी, जुन्या स्मृति जागवणारी छायाचित्रे तसेच पश्चिम रेल्वेच्या  संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षांत पश्चिम रेल्वेने केलेल्या प्रमुख कामगिरीचे चित्रण या प्रदर्शनात पहायला मिळते. तसेच त्यात भविष्यातील प्रकल्पांवरही प्रकाश टाकला आहे.

 

प्रदर्शनात माहिती आणि मनोरंजनावर आधारित संवादात्मक व्हिडिओ वॉल स्क्रीन, सेल्फी पॉइंट्स उदा. गांधीजींचे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे पोर्ट्रेट  तसेच चरख्याची प्रतिकृती - साबरमती आश्रमाशी संबंधित एक प्रसिद्ध चिन्ह हेही पहायला मिळेल.

अहमदाबाद विभागातील तीन विशेष रेल्वेगाड्या, अहिंसा एक्स्प्रेस, साबरमती एक्स्प्रेस आणि गुजरात मेल सुशोभित करण्यात आल्या असून स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून त्यांना रवाना केले गेले. लोकशक्ती आणि वांद्रे टर्मिनस - सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस या आणखी दोन आयकॉनिक ट्रेन्सना मुंबई सेंट्रल विभागातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांनी हिरवा झेंडा दाखवला.

पश्चिम रेल्वेने नंदलाल शाह ( वय 96 वर्षे) आणि ईश्वर लाल दवे (वय 99 वर्षे) या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचा सत्कार केला. या दोघांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता आणि तुरुंगवासही भोगला होता. वडोदरा स्थानकावर 96 वर्षे वयाच्या आणखी एक स्वातंत्र्यसैनिक हिराबेन वेद यांचाही सत्कार करण्यात आला. हिराबेन वेद यांनी साबरमती आश्रमात गांधीजींची देखभाल केली होती. सुंदर सजवलेल्या संकल्प एक्स्प्रेसला हिराबेन वेद यांच्यासह गट्टूभाई एन व्यास, (99 वर्षांचे सेवानिवृत्त कर्मचारी) यांनी हिरवी झेंडा दाखवला.

सध्या सुरू असलेल्या उत्सवांचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या विभागांद्वारे इतर कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. पोरबंदर स्थानकावर रांगोळी, नुक्कड नाटक, गरबा, देशभक्तीपर गीते आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अहमदाबाद, वडोदरा, भावनगर आणि मुंबई सेंट्रल विभागांद्वारे साबरमती, अडास रोड, पोरबंदर, बारडोली आणि नवसारी स्थानकांवर, आझादी की रेल गाडी और स्थानकांच्या पार्श्वभूमीवर असेच कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ही स्थानके तिरंग्याच्या रंगांनी सजवली गेली आहेत.

देशाच्या इतिहासाची जाणीव नागरिकांना करून देण्यासाठी या स्थानकांवर डिजिटल स्क्रीनवर स्वातंत्र्यलढ्यावरील लघुपट दाखवले जात आहेत. रेल्वे स्थानकांच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या स्थानकांवर देशभक्तीपर गीते, पथनाट्य आणि लाइट-साऊंड शोचे आयोजन करण्यात आले आहे.  पश्चिम रेल्वेने प्रत्येक स्थानकावर स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे महत्त्व अधोरेखित करणारे बॅनर आणि स्टँडी प्रदर्शित केले आहेत.

कार्यक्रमात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि या महत्त्वाच्या उत्सवात तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी या स्थानकांवर प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. जुन्या आठवणींशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे असलेल्या या भिंतींच्या पार्श्वभूमीवर सेल्फी आणि छायाचित्रे घेण्यासाठी प्रवासी गर्दी करत आहेत.  सेल्फी पॉइंट म्हणून नागरिकांमध्ये या भिंती खूप लोकप्रिय झाल्या आहेत. स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना या आयकॉनिक स्थानकांवर आमंत्रित करून तिथे त्यांचा सत्कारही करण्यात आला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि देशातील लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्याचा भारत सरकारचा उपक्रम आहे. 18 ते 23 जुलै 2022 या कालावधीत या महोत्सवाच्या अंतर्गत भारतीय रेल्वेद्वारे आझादी की रेल गाडी और स्टेशन्स हा आयकॉनिक सप्ताह साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत, 75 स्थानकांवर आठवडाभराचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या गौरवशाली इतिहासाशी निगडित 27  रेल्वेगाड्यांही सुशोभित आणि प्रकाशमान केल्या गेल्या आहेत.  5 स्थानके आणि 10 गाड्यांचे नामांकन करून, पश्चिम रेल्वेने लोकसहभाग आणि लोकचळवळीच्या सर्वंकष भावनेने सर्वांना ह्या उत्सवात सहभागी करुन घेतले आहे.

***

R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1844189) Visitor Counter : 193


Read this release in: English