भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केले स्वदेशी तंत्रज्ञान विकसित- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

Posted On: 21 JUL 2022 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जुलै 2022

 

केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य म्हणजे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे.

राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरामधून डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology-NIOT)  या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी लो प्रेशर थर्मल डीसालायनेशन (LTTD)  तंत्रज्ञान विकसित केले असून ते लक्षद्वीप बेटांवर यशस्वीपणे वापरण्यात आले आहे.

केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या कावारात्ती, अगाती आणि मिनीकॉय बेटांवर LTTD तंत्रज्ञानावर आधारित तीन डीसलायनेशन प्लांट विकसित करण्यात आले आहेत. यापैकी प्रत्येक LTTD प्लांटची दर दिवशी 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी बनवण्याची क्षमता आहे.

या प्लांट्सच्या यशाच्या आधारावर गृह मंत्रालयाने (MHA) केंद्रशासित प्रदेश (UT)  लक्षद्वीपच्या माध्यमातून अमिनी, अन्द्रोथ, चेटलेट, कादमात, काल्पेनी आणि किलतान या ठिकाणी दिवसाला 1.5  लाख लिटर क्षमतेच्या  आणखी 6 LTTD प्लांट्सची स्थापना करण्याचे काम सोपवले आहे. LTTD तंत्रज्ञान लक्षद्वीप बेटांसाठी योग्य आढळून आले असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाणी आणि खोल समुद्राचे पाणी यांच्या तापमानातील सुमारे 15⁰C इतका आवश्यक फरक आतापर्यंत केवळ लक्षद्वीप किनारपट्टी परिसरातच आढळून आला आहे.

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणाऱ्या निर्मिती प्रकल्पाची (डीसालायनेशन प्लांट) किंमत अनेक घटकांवर अवलंबून असून प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि प्रकल्पाचे स्थान याचा यात समावेश आहे. लक्षद्वीप येथील सहा LTTD प्लांटची एकूण किंमत 187.75 कोटी रुपये इतकी आहे.    

 

* * *

R.Aghor/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843629) Visitor Counter : 243


Read this release in: English , Urdu