सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ‘कौटुंबिक वापर आणि खर्चविषयक सर्वेक्षण’ (जुलै 2022- जून 2023) करणार
एचएसई सर्वेक्षणात संकलित झालेली आकडेवारी-माहिती, ग्राहकांच्या वस्तूवापरावर आधारित निर्देशांकासारखे महत्वाचे सामाजिक-आर्थिक निकष मोजण्यासाठी उपयुक्त ठरेल
कौटुंबिक ग्राहक खर्चविषयक सर्वेक्षण यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे—एनएसओच्या उपमहासंचालकांचे आवाहन
Posted On:
20 JUL 2022 6:16PM by PIB Mumbai
मुंबई, 20 जुलै 2022
राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या महाराष्ट्र विभागाच्या (पश्चिम) मुंबई कार्यालयाकडून, ‘कौटुंबिक वापर आणि खर्चविषयक सर्वेक्षण’ (जुलै 2022-जून 2023) केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने, आजपासून या कार्यालयात तीन दिवसांच्या प्रादेशिक प्रशिक्षण परिषदेची सुरुवात झाली. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील ही कार्यालय, लवकरच सर्वेक्षण सुरु करणार आहे.
‘कौटुंबिक वापर आणि खर्चविषयक सर्वेक्षण’ या अंतर्गत संकलित करण्यात आलेल्या माहितीचा डेटा “वजनविषयक आकृत्या/तुलनात्मक तक्ते’ तयार करण्यासाठी केला जाणार आहे, त्यासाठी, वस्तू-पदार्थांच्या एकूण वापरात विशिष्ट समुदायांचा वाटा किती आहे, यांची नेमकी माहिती ह्या सर्वेक्षणाद्वारे मिळू शकेल.
यातून उपलब्ध झालेल्या आकडेवारीचे, ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांच्या वस्तू वापरावर आधारित किंमत निर्देशांकाच्या संकलनासाठी देखील अध्ययन केले जाईल. त्याशिवाय, लोकांची जीवनमान पातळी, सामाजिक स्थिती आणि कल्याणाशी संबंधित आकडेवारी, त्यात असलेली असमानता अशा सगळ्यांची सांख्यिकीय आकडेवारी देखील या सर्वेक्षणादरम्यान संकलित केली जाईल.
एनएसओच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय यांनी आज मुंबईत या सर्वेक्षणाची सविस्तर माहिती दिली. या सर्वेक्षणामुळे, ग्राहकांच्या वस्तू वापरावर आधारित निर्देशांकासाठी अत्यंत महत्वाचा असलेला सामाजिक-आर्थिक डेटा संकलित केला जाणार आहे, त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. “अंदमान-निकोबार येथील काही भाग वगळता, देशभरात हे सर्वेक्षण होणार आहे’ असे त्यांनी पुढे सांगितले. सर्वेक्षणाची नमूना संख्या 15,000 इतकी असून, त्यात शहरी तालुके आणि गावांचा समावेश आहे. यासाठी घरांची निवड करताना कुठलेही मानवी पूर्वग्रह टाळण्यासाठी निवड डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘कौटुंबिक वापर आणि खर्चविषयक सर्वेक्षण’ दरवर्षी केले जाते. या सर्वेक्षणाच्या आधारावर देशभरातील नमूना सर्वेक्षणाद्वारे, विविध सामाजिक आर्थिक निकषांवर एक भक्कम आकडेवारीची बँक तयार केली जाते. ह्या संकलनाचा उपयोग केंद्र तसेच, राज्य सरकारांना आपली धोरणे आखण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी होतो.
एनएसओचे उपमहासंचालक, नमूना रेखाचित्र आणि संशोधन विभाग, ओंकार प्रसाद घोष यांनी सांगितले की, “भारत आणि परदेशातील विविध संस्थांना देखील, या एनएसओ च्या आकडेवारीचा उपयोग होतो. त्यानुसार ते गरीबीचे अनुमान, किंमतीवर आधारित निर्देशांक तयार करतात, तसेच, विविध कार्यक्रमांच्या- योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन, कौटुंबिक वापरावरील खर्चाची पातळी, रोजगार-बेरोजगारांची स्थिती, कृषि व्यावसायिक कुटुंबांची स्थिती, स्थलांतर, आरोग्य आणि शिक्षण सेवांचा वापर, देशांतर्गत पर्यटन इत्यादिविषयक माहिती मिळते.
“हे ‘कौटुंबिक वापर आणि खर्चविषयक सर्वेक्षण’करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आम्ही आवाहन करतो” असेही ते पुढे म्हणाले. जीमाहीती संकलित केली जाईल, त्यात काही वैयक्तिक माहिती असण्याचीही शक्यता आहे, मात्र ही माहिती केवळ ह्या सर्वेक्षणासाठी वापरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘कौटुंबिक वापर आणि खर्चविषयक सर्वेक्षण’करण्यामागचे उद्दिष्ट
कौटुंबिक वापर आणि खर्चविषयक सर्वेक्षण’हे सामाजिक पातळीवरील नागरिकांचा विविध वस्तू-पदार्थांचा वापर करण्याची, क्रयशक्तीची क्षमता आणि नागरिकांचे कल्याण, जीवनमान पातळी आणि त्यातील असमानता याची सांख्यिकीय माहिती जाणून घेण्याचा प्राथमिक स्त्रोत आहे. या डेटाच्या आधारे विविध निकष निश्चित केले जाऊ शकतात.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843174)
Visitor Counter : 212