विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद(सीएसआयआर) - राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा
Posted On:
15 JUL 2022 9:38PM by PIB Mumbai
पणजी, 15 जुलै 2022
अटल नवोन्मेष मिशन तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या प्रयोगशाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करून “जागतिक युवा कौशल्य दिन” साजरा केला गेला. विद्यार्थ्यांसाठी या प्रयोगशाळेला भेट देणे तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधणे सोबतच विज्ञान आणि नवकल्पना यातून निर्माण होणाऱ्या शक्यतांबद्दल जाणून घेणे हा एक उत्तम अनुभव होता.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) गोव्यातल्या डोना पॉला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत (CSIR-NIO) आज वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद 'जिज्ञासा' कार्यक्रमांतर्गत अटल टिंकरिंग लॅबच्या (ATL) शाळांसाठी अर्ध्या दिवसाचे संवाद सत्र आयोजित केले होते. उद्घाटन सत्रात CSIR-NIO चे वरिष्ठ प्राचार्य शास्त्रज्ञ डॉ. मारिया-जुडिथ गोन्साल्विस यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे स्वागत केले तसेच कौशल्य आणि उच्च कौशल्याचे महत्त्व विशद केले. तरुणांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या कार्यक्रमाबाबत त्यांनी आपली मते आणि विचार व्यक्त केले .नव्या जगात तंत्रज्ञान जोमाने प्रगती करत असल्याने कौशल्य आणि प्रशिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे भारतीय तरुणांनी आपले कौशल्य सतत वाढवले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागचा उद्देशही त्यांनी विशद केला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी मिळाली. त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची संधी मिळाली. झूप्लँक्टन आणि फायटोप्लँक्टनबद्दल तसेच खडकांमध्ये असलेल्या विविध खनिजांबद्दल देखील जाणून घेता आले. विद्यार्थ्यांनी मरीन इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजनला भेट दिली आणि नवीन तंत्रज्ञान तसेच आधुनिक डिझाईनबद्ल जाणून घेत CBOT, AUV, AVP आणि SREP यांची कार्यप्रणाली समजून घेतली. विद्यार्थ्यांनी नंतर सेंट्रल ॲनालिटिकल फॅसिलिटीला भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोमीटर आणि गॅस क्रोमॅटोग्राफी आयसोटोपिक रेशो मास स्पेक्ट्रोमीटर यांसारख्या विविध मशीनचे कार्य समजावून सांगण्यात आले.
या अर्ध्या दिवसाच्या सत्रात 41 विद्यार्थ्यांसह 9 शिक्षक सहभागी झाले होते. या सर्वांना वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्रातील विद्वानांशी संवाद साधण्याची तसेच CSIR-NIO चे संशोधन प्रकल्प समजून घेण्याची उत्कृष्ट संधी मिळाली.
R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841932)
Visitor Counter : 246