वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांची मुंबईत कामांचा आढावा घेण्यासाठी वस्त्रोद्योग सल्लागार गटाशी दुसरी चर्चात्मक बैठक


कापसाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी कापसाचे बियाणे उत्तम दर्जाचे असणे अतिशय आवश्यक- पीयूष गोयल

Posted On: 15 JUL 2022 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2022

 

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज म्हणजेच 14 जुलै रोजी मुंबई येथे वस्त्रोद्योग सल्लागार गट (TAG) सोबत दुसरी चर्चात्मक बैठक घेतली.

कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कापूस बियाणांचा पुरवठा होणे अतिशय आवश्यक आहे यावर गोयल यांनी या बैठकीत भर दिला. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी उच्च उत्पन्न देणाऱ्या कापूस बियाण्यांशी संबंधित प्रगत तंत्रज्ञान आणि कापसाच्या लागवडीची घनता वाढवणे यांसारख्या नाविन्यपूर्ण  कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या सहकार्याने भारतीय कापूस महामंडळाने कृषीसेवांचा आपल्या देशभरातील सगळ्या शाखांमध्ये विस्तार करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली

मूल्यसाखळीच्या प्रत्येक टप्प्यावर, उद्योग क्षेत्राने उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी जागरूक असायला हवे, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. तसेच, या क्षेत्रासाठी आवश्यक त्या सगळया अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या मूल्यसाखळीत माग काढण्याचे तंत्रज्ञान आणि चाचणी सुविधा अधिक समक्ष करण्याची गरज आहे, असे मत गोयल यांनी व्यक्त केले.

कापूस दूषित होऊ नये म्हणून खतांच्या रंगीत पिशव्या वापरण्याच्या पद्धतींवर चर्चा करताना गोयल यांनी  TAG  ला दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्येला प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच यावर उपाययोजना शोधतांना खर्चात वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली.

एमसीएक्स मध्ये खुल्या स्थितीवर असणाऱ्या मर्यादा आणि विशिष्ट वितरण-आधारित करार असण्याची गरज आहे, यावर बोलतांना पीयूष गोयल यांनी वस्त्रोद्योग आयुक्त, सीसीआय आणि TAG ना निर्देश दिले की, त्यांनी MCX/SEBI सोबत, या करार विषयक मुद्द्यावर काहीतरी ठोस तोडगा काढावा. किमतीच्या बाबतीत काही फेरफार होण्याच्या शक्यता  कापसाच्या-सूती वस्त्राच्या संपूर्ण मूल्यसाखळीसाठीच नुकसानकारक ठरू शकतात, त्यामुळे, त्याचा योग्य प्रतिबंध करायला हवा, असे ते म्हणाले.

मूल्य साखळीतील आकडेवारीच्या अचूकतेची गरज लक्षात घेण्यासाठी सांख्यिकी संकलन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत दंडात्मक तरतुदींचे पालन करावे, असे निर्देशही, गोयल यांनी उद्योजकांच्या शिफारसीनुसार, वस्त्रोद्योग आयुक्तांना दिले. ही कारवाई  जिनिंग विभागापासून सुरु होऊ शकते. सांख्यिकी कायद्यांतर्गत जिनिंग विभागातील डेटा संकलनासाठी  CCI कर्मचाऱ्यांच्या सेवांचा वापर करण्याचे निर्देश गोयल यांनी वस्त्रोद्योग आयुक्तांना दिले.

वस्त्रोद्योग आयुक्त आणि भारतीय कापूस महामंडळाने संयुक्तपणे या बैठकीचे आयोजन केले होते.  

 

 

 

 

R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841921) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Hindi