महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ‘शक्ती अभियाना’साठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने जारी केल्या तपशीलवार मागर्दर्शक सूचना

Posted On: 14 JUL 2022 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2022

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने शक्ती अभियान योजनेसाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिलांची सुरक्षितता,संरक्षण आणि सक्षमीकरण या उद्देशाने सर्वंकष योजना म्हणून केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या वर्ष 2021-22 ते 2025-26 या कार्यकाळातील अंमलबजावणीसाठी ‘शक्ती अभियान’ हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरु केला आहे. ‘शक्ती अभियाना’चे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत.

‘शक्ती अभियान’ही योजना महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण यासाठीच्या उपाययोजनांना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने मोहीमेच्या स्वरुपात राबविण्यात येत आहे. महिलांच्या जीवन चक्रात त्यांच्यावर सतत परिणाम करणाऱ्या समस्या सोडवून आणि केंद्राभिमुखता तसेच नागरी हक्कांच्या माध्यमातून त्यांना राष्ट्र उभारणीत समान भागीदार करून घेऊन महिलांच्या नेतृत्वाखालील विकास साधण्याच्या केंद्र सरकारच्या कटिबद्धतेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच हिंसा आणि धाकदपटशामुक्त वातावरणात त्यांना त्यांचे मन आणि शरीर या दोन्हींच्या बाबतीत मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी मिळणे या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. तसेच महिलांवरील काळजीचे ओझे कमी करणे आणि कौशल्य विकास, क्षमता निर्मिती, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्ज मिळण्यातील सुलभता इत्यादी बाबींना प्रोत्साहन देऊन महिला कामगार दलाचा सहभाग वाढविणे ही उद्दिष्टे देखील या योजनेच्या अंमलबजावणीतून साध्य करता येणार आहेत.

‘शक्ती अभियाना’मध्ये दोन उपयोजना आहेत- ‘सांभाळ’ आणि ‘सामर्थ्य’ यातील ‘सांभाळ’ ही उपयोजना महिलांची सुरक्षितता आणि संरक्षण यांच्या संदर्भात काम करते तर ‘सामर्थ्य’ या उपयोजनेत महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने उपक्रम राबविले जातात. ‘सांभाळ’ या उपयोजनेतील घटकांमध्ये पूर्वी राबविण्यात येत असलेल्या एक-थांबा केंद्र (ओएससी), महिलांसाठी हेल्पलाईन(डब्ल्यूएचएल), बेटी बचाओ, बेटी पढाओ(बीबीबीपी) या उपक्रमांसह ‘नारी अदालत’ हा समाजातील आणि कुटुंबातील वादविवाद आणि लिंगभेद याबाबत न्यायनिवाडा करणारी पर्यायी न्यायव्यवस्था निर्माण करून तिला प्रोत्साहन देणाऱ्या नव्या उपक्रमाचा समावेश करून घेण्यात आला आहे.

‘सामर्थ्य’ या उपयोजनेतील घटकांमध्ये पूर्वीपासून राबविण्यात येत असलेल्या उज्ज्वला, स्वाधार गृह आणि कामकरी महिलांसाठी वसतिगृह या उपक्रमांमध्ये सुधारणा करून त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर, काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी सध्या सुरु असलेली राष्ट्रीय संगोपन योजना आणि एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेली पंतप्रधान मातृ वंदना योजना यांना देखील ‘सामर्थ्य’ या उपयोजनेत समाविष्ट करून घेण्यात आले आहे. सामर्थ्य योजनेत, आर्थिक सक्षमीकरणासाठी गॅप आर्थिक मदतीचा नवा घटक देखील जोडण्यात आला आहे.

‘शक्ती अभियान’योजनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा:

https://wcd.nic.in/acts/mission-shakti-guidelines-implementation-during-15th-finance-commission-period-2021-22-2025-26

 

 

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841598) Visitor Counter : 7803


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Telugu