जलशक्ती मंत्रालय
नोबेल पारितोषिक विजेते,प्राध्यापक मायकेल क्रेमर यांनी पेय जल पुरवठा विभागाच्या जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट
आरोग्यासंदर्भातले विशेषतः बालकांच्या आरोग्यासंदार्भातले मापदंड सुधारण्यात ‘हर घर जल’अभियानाची महत्वपूर्ण भूमिका : प्राध्यापक क्रेमर
पाण्याचा सुरक्षित साठा, नवीन आणि किफायतशीर जलशुद्धीकरण तंत्रज्ञान आणि ग्रामीण भागात नळाद्वारे पाण्याच्या पुरवठ्याच्या उपलब्धतेबाबत परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन
Posted On:
13 JUL 2022 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2022
नोबेल पारितोषिक विजेते, प्राध्यापक मायकेल क्रेमर यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पेय जल आणि स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, युनिसेफ आणि इतर क्षेत्रातल्या भागीदारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अंत्योदय भवन इथे संवाद साधला.
प्राध्यापक मायकेल क्रेमर हे अमेरिकतील विकास अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यांना जागतिक दारिद्र्य निर्मूलन क्षेत्रातील त्यांच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो यांच्यासमवेत 2019 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
कुटुंबाना शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचा पुरवठा झाला तर बालमृत्यूंच्या प्रमाणात 30 टक्क्यांनी घट होईल असे आपल्या अभ्यासातून दिसून आले आहे, असे प्राध्यापक क्रेमर यांनी या बैठकीदरम्यान सांगितले. प्रामुख्याने नवजात बालकांमध्ये अतिसार हा एक नेहमी आढळणारा आजार आहे. नवजात बालकांना पाण्यामुळे होणारे आजार लगेच होतात आणि लहान मुलांशी संबंधित, प्रत्येक 4 पैकी 1 मृत्यू, सुरक्षित पाण्यामुळे टाळता येऊ शकतो, असा निष्कर्ष त्यांनी केलेल्या संशोधनादरम्यान केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे, त्यामुळेच आरोग्यासंदर्भातले विशेषतः बालकांच्या आरोग्यासंदार्भातले मापदंड सुधारण्यात ‘हर घर जल’ अभियानाची महत्वपूर्ण भूमिका पार पाडते आहे, असे त्यांनी सांगितले.
जल जीवन मिशन हे अभियान केवळ ग्रामीण भागातील कुटुंबाना पेय जल पुरवठा करण्या इतकेच मर्यादित नसून पुरवठा केलेले पाणी हे विहित दर्जाचे आहे याबद्दल देखील दक्षता बाळगली जाते, हे ऐकून प्राध्यापक क्रेमर यांनी समाधान व्यक्त केले. यासंदर्भात जल परीक्षण प्रयोगशाळा आणि सामुदायिक देखरेख प्रणाली अंतर्गत फिल्ड टेस्ट किट्स (FTKs) वापरून पाण्याच्या स्रोतांची आणि पाण्याच्या अंतिम टप्प्यातील पुरवठ्याच्या ठिकाणाची नियमित तपासणी केली जाते.
विनी महाजन यांनी, पाण्याचा शाश्वत ओघ कायम राखण्यातील आव्हाने अधोरेखित केली. पाण्याचा समंजसपणे वापर होण्यासाठी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. युनिसेफच्या वॉश (water, sanitation and hygiene) उपक्रमाचे भारतातील प्रमुख निकोलस ऑस्बर्ट यांनी बाल आरोग्यावर सुरक्षित पाण्याचा प्रभाव या विषयावर मार्गदर्शन केले. वॉटरएड आणि वॉश इन्स्टिट्यूट सारख्या इतर क्षेत्रातील हितधारकांनी सुरक्षित पेयजलाच्या महत्त्वावर त्यांचे विचार मांडले.
कार्यान्वयन संशोधन करण्यासाठी जल जीवन मिशन नवीन संधी देते असे राष्ट्रीय जल जीवन मिशनचे अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक विकास शील म्हणाले. ग्रामीण भाग सध्या या योजनेच्या अंमलबजावणीच्या टप्प्यात असल्याने अशाप्रकारचा अभ्यास करण्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे, असे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये 100% योजना लागू झाली आहे, तर अनेक गावांना काही प्रमाणात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे तर काही गावात मात्र अजूनही दूर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे.
प्राध्यापक क्रेमर यांनी भविष्यात पाण्याचा सुरक्षित साठा, नवीन आणि किफायतशीर जलशुद्धीकरण तंत्रज्ञान आणि ग्रामीण भागात नळाद्वारे पाण्याच्या पुरवठ्याच्या उपलब्धतेबाबत परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
S.Thakur/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841484)
Visitor Counter : 167