गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
शहरांच्या नवनिर्मितीचा भारत साक्षीदार - हरदीपसिंह पुरी
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या कायापालटाद्वारे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे मंत्र्यांचे गौरोवोद्गार
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग साजरा करत आहे 168 वा वार्षिक दिवस
Posted On:
12 JUL 2022 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2022
भारत शहरांच्या नवनिर्मितीचा साक्षीदार आहे तसेच राष्ट्रपती भवन आणि इतर विविध स्मारकांची वास्तुशास्त्रीय आश्चर्य हे स्वतंत्र भारतापूर्वीच्या आपल्या स्थापत्य कौशल्याची साक्ष देतात, असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सीपीडब्लूडी) 168 व्या वार्षिक दिनाच्या समारंभात उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे महासंचालक शैलेंद्र शर्मा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.



गेल्या अनेक वर्षांमध्ये महत्त्वाची सार्वजनिक कामे करत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग बांधकाम व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य उपक्रम बनला आहे, असे पुरी म्हणाले. ब्रिटीश राजवटीच्या दिवसांपासून ते स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत आणि आता 21व्या शतकापर्यंत, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग निरंतर आणि आश्वासक रितीने कार्यरत आहे, असे मंत्र्यांनी सांगितले. एखाद्या संस्थेचे खरे स्वरूप ती काळाशी किती चांगल्या प्रकारे सुसंगत आहे यावरून दिसून येते असे सांगत देशाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने स्थापनेपासूनच केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग प्रगती करत आहे , असेही ते म्हणाले.


केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रपती भवन, नॉर्थ आणि साउथ ब्लॉक, आणि संसद भवन, अन्य तितक्याच प्रतिष्ठित प्रकल्पांच्या अंमलबजावणीसह नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी क्षेत्र विकसित केले आहे असे सांगत पुरी म्हणाले की, आजही हा विभाग नवीन संसद भवन, उपराष्ट्रपती भवन आणि सामान्य केंद्रीय सचिवालयाच्या विकासासह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या कायापालटाद्वारे प्रशासनात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. उत्तम कार्याच्या जोरावर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने देशाच्या सीमा ओलांडत अन्य देशातही काम केले आहे. अफगाणिस्तान संसदेचे बांधकाम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे आणि ते अफगाण लोकांशी असलेल्या भारताच्या अतूट मैत्रीचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.
महामारीनंतरच्या जगात भारताने यशस्वीपणे मार्गक्रमण सुरु केले असून भारताला लवचिक, शाश्वत आणि सर्वसमावेशक भविष्याकडे नेण्यात बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल असे त्यांनी सांगितले. संपूर्ण बांधकाम चक्रामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच स्वदेशी आणि स्थानिक पातळीवर तयार केलेल्या साहित्यासह बांधकाम तंत्रज्ञान एकत्रित करून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग पर्यावरणपूरक आणि टिकाऊ बांधकामाला प्राधान्य देत आहे, असे पुरी यांनी सांगितले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांनी सन्मानित केले.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभगाने प्रकाशित केलेल्या विविध प्रकाशनांचे मंत्र्यांनी प्रकाशन केले. त्यांनी विभागाच्या सुधारित संकेतस्थळाच्या सहा मॉड्यूलचाही प्रारंभ केला.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840962)
Visitor Counter : 193