आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव-राष्ट्रीय जैविकी संस्थेच्या 30 वर्षांच्या कारकीर्दीच्या सोहोळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले


पारंपारिक रासायनिक औषधे निष्क्रिय ठरतात  तिथे जैविक औषधे या उपचारपद्धतीची निवड उदयाला येऊ लागली आहे

Posted On: 30 JUN 2022 10:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज नोईडा येथील एनआयबी अर्थात राष्ट्रीय जैविकी संस्थेच्या कार्याला 30 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या सोहोळ्याचे अध्यक्षपद भूषविले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, आयसीएमआरचे महासंचालक  डॉ. बलराम भार्गव आणि एनआयबीचे संचालक, डॉ. अनुप अन्विकर हे देखील या समारंभाला उपस्थित होते.

 

एनआयबीने केवळ विद्वत्ता, ज्ञान, अनुभव आणि निपुणता यांचे भांडार म्हणून दिलेले योगदानच नव्हे तर आपल्या देशाच्या विकासात देखील दिलेल्या योगदानावर जोर देत केंद्रीय राज्यमंत्री भारती प्रवीण पवार म्हणाल्या, औषधांच्या बाजारात शिरू पाहणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या औषधांना रोखून आणि औषधांच्या दर्जाच्या सुनिश्चिततेसाठी मानके विकसित करून या संस्थेने समाज स्वास्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न प्रशंसेला पात्र आहेत. मात्र, अजूनही या बाबतीत अनेक आव्हानांवर मात करणे बाकी आहे. आपण सर्वजण हे जाणतोच की निकृष्ट दर्जाची किंवा बनावट औषधे ही आरोग्याच्या क्षेत्रातील एक जागतिक समस्या आणि आर्थिक ओझे आहेत. पारंपारिक औषधे जेव्हा निष्क्रिय ठरतात त्या वेळी जैविक औषध योजना   पर्यायी उपचारपद्धती म्हणून उदयाला येऊ लागली आहे. म्हणूनच, निकृष्ट दर्जाची औषधे रुग्णांपर्यंत पोहोचण्यापासून आणि त्यांच्या आरोग्याला इजा पोहोचविण्यापासून रोखण्यात दर्जाविषयक परीक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे.

त्या पुढे म्हणाल्या की अतुलनीय उत्कृष्टता गाठण्यासाठीचा मार्ग ठरलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे एनआयबी त्यांच्या प्रयोगशाळा आणि प्राणीशाळा सुविधांसाठी निर्दोष मानके राखण्यात यशस्वी ठरली आहे. प्रमाणित गुणवत्ता नसलेल्या जैविक उत्पादनांना बाजारात प्रवेश देण्यासाठीच्या शिफारसी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण त्या रुग्णाचे आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ्याचे रक्षण यांच्याशी थेटपणे संबंधित आहेत. एनआयबी ही संस्था सरकारी औषध पुरवठा आणि खरेदी संस्थांना प्राधान्य देते जेणेकरून भारतीय औषध बाजारात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा भासू नये. त्यामुळे, जिथे मानवी जीवनाचा थेट सहभाग आहे अशा विषयात इतक्या संवेदनशील क्षेत्रामध्ये घेतली जाणारी दक्षता आणि तज्ञता आवश्यकच आहे असे मला वाटते, त्यांनी सांगितले.

सरकारचे या संदर्भातील प्रयत्न ठळकपणे मांडत केंद्रीय राज्यमंत्री म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली, आपण जगाचे औषधालय होण्याच्या मार्गावर आहोत. आपल्या औषधनिर्मिती क्षेत्राने जगभरात कमाविलेल्या चांगल्या ख्यातीमुळे हे शक्य होत आहे. आता आपल्या औषधांचा दर्जा उत्तम राखणे आणि ही औषधे सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे, जेणेकरून गरीबात गरीब व्यक्तीला ही औषधे विकत घेता येऊ शकतील. आपल्या पंतप्रधानांचे सर्वांसाठी आरोग्य हे स्वप्न साकार करण्याचा हा मार्ग आहे. आपल्या पंतप्रधानांनी नेहमीच, अगदी कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील  इतर देशांना मदतीचा हात दिला आहे. भारत आज औषधनिर्मिती उद्योगात जगाचे नेतृत्व करत आहे. मात्र, तरीही मी अशी सूचना करू इच्छिते की, एनआयबीने अधिकाधिक प्रमाणात जैविक औषध चाचण्या केल्या पाहिजेत तसेच त्यांच्या परीक्षणाचे ज्ञान इतर देशांपर्यंत पोहोचवून वसुधैव कुटुंबकम या  भारतीय तत्वज्ञाणाचे अनुसरण केले  पाहिजे.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838354) Visitor Counter : 157


Read this release in: English , Urdu , Hindi