सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबादमध्ये आयोजित गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या 70व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला नवी दिल्ली येथून दुरदृष्य प्रणालीद्वारे केले संबोधित
Posted On:
28 JUN 2022 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्रातील सुधारणांमुळे नागरिकांना बँकिंग सेवांचा लाभ मिळत आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबादमध्ये आयोजित गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक लि.च्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले.

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, आज भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि 25 वर्षांनंतर स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार से समृद्धी (सहकारातून समृद्धी) हा संकल्प राष्ट्रापुढे ठेवला आहे. मोदी यांनी देशाच्या समृद्धी आणि आर्थिक उन्नतीत योगदान देण्याची जबाबदारी सहकार क्षेत्रावर सोपवली आहे.

गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक लिमिटेडला खेती बँक असे म्हटले जाते , 1951 मध्ये तिची स्थापना झाली आणि तिच्या स्थापनेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे असे अमित शहा म्हणाले.
अमित शहा म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत, 45 कोटी नवीन बँक खाती उघडण्यात आली, 32 कोटी रुपे डेबिट कार्ड देण्यात आले आहेत, तर डिजिटल व्यवहारांनी एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. 2017-18 मधील डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत 50 पटीने वाढ झाली आहे.

थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून 52 मंत्रालयांच्या सुमारे 300 योजनांचे लाभ लाभार्थ्यांना थेट पाठवण्यात आले आहेत. या सर्व योजनांमध्ये लवकरच सहकारी संस्थांचा प्रवेश होणार असून त्यामुळे नागरिकांबरोबर कनेक्टीव्हिटी वाढेल असे त्यांनी सांगितले. कृषी बँकांना तोट्यातून बाहेर काढून नफ्यात आणण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत, त्याच पद्धतीने समृद्धीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्राशी संबंधित प्रत्येकजण एकत्रितपणे काम करेल असे ते म्हणाले.

* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837738)
Visitor Counter : 180