सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने महाविद्यालय/विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अधिकृत आकडेवारीवर देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे केले आयोजन
लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्याला चषक आणि रोख 5000 रुपयांचे पारितोषिक प्रदान
Posted On:
27 JUN 2022 7:32PM by PIB Mumbai
मुंबई, 27 जून 2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत साजरा केला जात असलेल्या सप्ताहाचा एक भाग म्हणून, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या फील्ड ऑपरेशन्स विभागाने (MoSPI) आज राज्यांच्या राजधानीतील प्रादेशिक कार्यालयांमध्ये महाविद्यालय/विद्यापीठातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत आकडेवारीवरील देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या फील्ड ऑपरेशन विभागातर्फे मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई आणि आसपासच्या शहरांतील 43 विविध महाविद्यालये/विद्यापीठांतील 86 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
यावेळी बोलताना, भारताचे मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव जी.पी. सामंत यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सप्ताह कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सहभागी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, 'भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी होतील तेव्हा आजचे काही विद्यार्थी आणि युवक हे निर्णय घेणारे बनले असतील.’ त्यामुळे त्यांना अधिकृत आकडेवारी माहित असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
सांख्यिकीय माहितीच्या प्रासंगिकतेचा पुनरुच्चार करताना जी.पी. सामंत म्हणाले, सांख्यिकीय माहितीमध्ये अर्थशास्त्र आणि सामाजिक-लोकसंख्या विषयक घटक यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असतो, जे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महत्वाचे असतात.
सामंत म्हणाले, भारतात कृषी, उद्योग, नागरी पुरवठा आणि इतर क्षेत्रातील संधी समाविष्ट करण्यासाठी सांख्यिकीय माहितीचा वापर केला जातो. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय डेटा संकलित करते, प्रक्रिया करते आणि प्रसिद्ध करते आणि सकल राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न, महागाई दर, ग्राहक किंमत निर्देशांक इत्यादी सारख्या विविध आर्थिक आणि सामाजिक सांख्यिकी घटकांवर सर्वेक्षण करते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून अधिकृत सांख्यिकीबद्दल जागरूकता वाढवणे आणि भारतीय अधिकृत सांख्यिकी प्रणालीच्या विविध पैलूंबद्दल युवकांना प्रबोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
आर ए पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे मधुर राजन टिके आणि शॉन जेकब यांना प्रथम सांघिक विजेते घोषित करण्यात आले. त्यांनी चषक आणि 5000/- रुपये रोख पारितोषिक पटकावले. एलएस रहेजा कॉलेज आणि एसआयईएस नेरुळ कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या विद्यार्थी गटांना प्रथम उपविजेते आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांना चषक आणि अनुक्रमे 3000/- आणि 2000/- रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
उपमहासंचालक सुप्रिया रॉय, शीव येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आणि महाराष्ट्रातील अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय अहेर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताचे मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव जी.पी. सामंत यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्रीय दूरसंचार विभाग, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा), माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि प्रकाशन विभाग संचालनालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या वतीने मुंबईतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित प्रदर्शन आणि पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन केले.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837356)
Visitor Counter : 211