रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (NHAI) जाहीर केली डिजिटल छायाचित्र स्पर्धा
Posted On:
24 JUN 2022 9:42PM by PIB Mumbai
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी, राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (NHAI) देशभरातील व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल छायाचित्र स्पर्धा जाहीर केली आहे.
‘नॅशनल हायवेज थ्रू द आईज ऑफ द कॅमेरा’ ही या छायाचित्रण स्पर्धेची संकल्पना आहे.ही स्पर्धा भारतीय नागरिकांसाठी खुली आहे आणि त्यात सहभाग घेण्यासाठी हौशी आणि व्यावसायिक अशा दोन स्वतंत्र श्रेणी आहेत. या सर्व श्रेणींमध्ये प्रत्येकी सहा बक्षिसे देण्यात येणार असून, प्रत्येक श्रेणीतील प्रथम विजेत्याला 50,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येकी 10,000 रु.ची दहा उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात येणार आहे.
छायाचित्रकार एनएचएआयच्या (NHAI) संकेतस्थळाला भेट देऊ शकतात आणि सहभागी होण्यासाठी कोणतीही एक श्रेणी निवडू शकतात. छायाचित्रे एक वर्षापेक्षा जुनी नसावीत.प्रत्येक सहभागी जास्तीत जास्त 5 एमबीची प्रत्येकी दोन छायाचित्रे अपलोड करू शकतो. सहभागी होण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2022 आहे.
छायाचित्रणाच्या माध्यमाचा वापर करून, या स्पर्धेद्वारे भारतातील राष्ट्रीय महामार्गांच्या बहुआयामी प्रतिमांची छायाचित्रे सादर केली जातील.
महामार्गांचे सौंदर्यशास्त्र आणि विस्तार याशिवाय, ही स्पर्धा महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे होत असलेल्या दळणवळण सुविधा आणि सुलभ प्रवेशाचा संदेश देखील प्रसारित करेल.
गेल्या काही वर्षांत देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे झपाट्याने वाढले आहे. एनएचएआय भारतमाला परियोजना सारखे महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवत आहे ज्यामध्ये 22 हरीत महामार्ग आणि नियंत्रित प्रवेश मार्ग (ऍक्सेस-नियंत्रित कॉरिडॉर) यांचा समावेश आहे. हे जागतिक दर्जाचे मार्ग विकास आणि समृद्धी आणण्यासाठी, आणि मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा प्रवास वेळ कमी करण्यासाठी देशातील बहुतेक सर्व उदयोन्मुख आर्थिक क्षेत्रांना जोडतील.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836845)
Visitor Counter : 188