दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पर्वरी गोवा येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन येथे विशेष दिव्यांग मुलांसाठी दोन दिवसीय योग कार्यशाळा संपन्न
‘योगामुळे उत्तम आकलनशक्ती प्राप्त होते ‘-पद्मश्री ब्रह्मानंद शंकवलकर
Posted On:
21 JUN 2022 4:27PM by PIB Mumbai
पणजी, 21 June 2022
केंद्रीय संचार विभागाच्या गोवा येथील क्षेत्रीय कार्यालयाने पणजीच्या सम्राट क्लबच्या सहकार्याने, पर्वरी गोवा येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन येथे विशेष दिव्यांग मुलांसाठी दोन दिवसीय योग कार्यशाळा आयोजित केली होती. नियमित योगसाधनेमुळे मिळणाऱ्या शारीरिक आणि मानसिक लाभांबाबत जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला माजी भारतीय फुटबॉलपटू आणि गोव्याचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेते पद्मश्री ब्रह्मानंद शंकवलकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष गुरुदास पावसकर हे देखील उपस्थित होते.


पद्मश्री ब्रह्मानंद शंकवलकर यांनी यावेळी सांगितले की ‘योगामुळे उत्तम आकलनशक्ती प्राप्त होते . त्यांनी पालकांना आपल्या मुलांना दैनंदिन उपक्रमांमध्ये योगासने शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जावा यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.


प्राचीन काळापासून योग संस्कृती असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे, असे योगचार्य सुरेश कुमार यांनी सांगितले. तुमच्या 'दिनचर्येमध्ये योगाभ्यासाचा समावेश करा, तुम्ही स्वतःच तुमच्या आरोग्याचे मोठे डॉक्टर आहात, 24 तासांपैकी किमान एक तास योगाभ्यासासाठी द्या, असे सांगत त्यांनी योगाभ्यासाचे महत्व विशद केले.

त्यापूर्वी सम्राट क्लबच्या अध्यक्ष प्रेरणा पावसकर यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियास बाबू यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर महेश रेवणकर यांनी आभार मानले. क्लबचे सदस्य प्रकाश महांबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रियास बाबू यांच्या हस्ते पद्मश्री ब्रह्मानंद शंकवलकर यांचा तर प्रेरणा पावसकर यांच्या हस्ते सुरेश कुमार यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा आणि सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत कु. सुमन दास आणि झोहेब काची यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. तर कु. साईश तळवडेकर, प्रतीक तुळसकर आणि विजय कुमार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.सूर्यनमस्कार स्पर्धेत कु. आमिर पीर याने सुवर्णपदक पटकावले तर कु. रुद्रेश नाईक आणि रेहमान यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक जिंकले, तर कु. सुमन दास आणि कु. पूर्वा गानू यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पहिल्या सत्रात, गोव्यातील पोर्वोरिम येथील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनच्या सर्व विद्यार्थ्यांनी योगचार्य सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली.
R.Aghor/S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835959)
Visitor Counter : 121