पर्यटन मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिन गोव्यात 2 आयकॉनिक ठिकाणी साजरा होणार
गोव्यातील योग दिन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल होणार सहभागी
विशेष मुलांसाठी फील्ड ऑफिस, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, गोवा योगावर कार्यशाळा आयोजित करणार
‘मानवतेसाठी योग’ ही आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे
Posted On:
18 JUN 2022 7:47PM by PIB Mumbai
8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी गोवा येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी दोन ठिकाणे निश्चित केली आहेत. लार्गो ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर, से कॅथेड्रल ओल्ड गोवा (गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट) येथील कार्यक्रमात नाईक सहभागी होतील. अग्वाद किल्ला येथे योग दिन प्रात्यक्षिक कार्यक्रमात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल सहभागी होतील. सकाळी साडेपाच वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरूवात होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र आमसभेने 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून देशभरात योग प्रात्यक्षिकांवर आधारित सामूहिक योग प्रात्यक्षिकांसह हा दिवस सामान्य योग प्रोटोकॉलनुसार साजरा केला जातो. पर्यटन मंत्रालय तसेच या मंत्रालयाची देशांतर्गत आणि परदेशी क्षेत्रीय कार्यालये मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करतात. भारताचे समृद्ध सौंदर्य, स्थलाकृति, भौगोलिक महत्त्व आणि वास्तुकला प्रदर्शित करण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर अतुल्य भारत ब्रँडचा प्रसार करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 साजरा करण्यासाठी देशभरातील 75 आयकॉनिक पर्यटन स्थळे निश्चित केली आहेत. या वर्षीची संकल्पना 'मानवतेसाठी योग' ही आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालय 21 जून 2022 रोजी देशभरात विविध कार्यक्रमांसह 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. मुख्य कार्यक्रमांपैकी एक लार्गो ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर, से कॅथेड्रल ओल्ड गोवा (चर्चेस आणि कॉन्व्हेंट ऑफ गोवा) येथे आयोजित केला जाईल. दुसरा कार्यक्रम फोर्ट अग्वाद येथे होणार असून केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल सहभागी होत आहेत. ही स्थळे केंद्र सरकारने निवडली आहेत.
गोवा राज्य योग अकादमी, जिल्हा परिषद जुने गोवा, स्थानिक ग्रामपंचायती, श्री दत्त पद्मनाभ पीठ श्री क्षेत्र तपोभूमी गोवा, नेहरू युवा केंद्र, विद्या प्रबोधिनी महाविद्यालय, लायन्स क्लब, रोटरी क्लब, सम्राट क्लब, मार्मागोवा पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि कर्मचारी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटरस्पोर्ट्सचे विद्यार्थी उत्सवात सहभागी होत आहेत. कार्यक्रमात अंदाजे 800 ते 1000 स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे.
केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त पत्रकार परिषदेला गोवा राज्य योग अकादमीचे मिलिंद महाले, इंडिया टुरिझमचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेशन आणि कार्यक्रमाचे समन्वयक सूरज नाईक उपस्थित होते. पत्र सूचना कार्यालयाचे सहसंचालक विनोद कुमार यांनी 21 जून या दिवसाचे महत्त्व आणि योग दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे राबविल्या जाणार्या उपक्रमांची माहिती दिली.
फील्ड ऑफिस गोवा, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (CBC), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि विशेष शिक्षण शिक्षकांसाठी पर्वरी येथे संजय केंद्रात सामान्य योग प्रोटोकॉलवर विशेष दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून CBC संजय केंद्राला पन्नास योग मॅट्स देणार आहे. पद्मश्री ब्रह्मानंद शंकवळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पर्यटन मंत्रालय आपल्या भारत पर्यटन कार्यालयांद्वारे देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळे आणि आयकॉनिक ठिकाणी योग सत्रे आणि थेट प्रात्यक्षिके आयोजित करत आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील वेरुळ लेणी, वर्धा येथील सेवाग्राम, मुंबई शहरातील काळा घोडा, पुणे येथील आगा खान पॅलेस, गुजरातच्या पतन येथील रानी की वाव, चंपानेर- पावागड, चेन्नईचा बेसंत नगर बीच, सूर्य मंदिर ( बोधगया, बिहार), या ठिकाणी ही प्रात्यक्षिके होतील.
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम "मानवतेसाठी योग" अशी असेल. योग दिवस प्रात्यक्षिकाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकातील म्हैसूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. योग दिवसाचा मुख्य उद्देश लोकांसाठी योगाच्या आरोग्य फायद्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस ही आरोग्यासाठी एक जनचळवळ बनली आहे. आयुष मंत्रालय मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 8 व्या आवृत्तीचा प्रचार करीत आहे. 13 मार्च 2022 रोजी 100 दिवसांची उलटगणना करण्यासाठी मोहीम सुरू करणारा कार्यक्रम साजरा करण्यात आला. 13 मार्च ते 21 जून 2022 या कालावधीत (100 दिवस) जगभरात 100 शहरे आणि 100 संस्था या मोहिमेत सहभागी आहेत. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 75 व्या दिवसाचे आसामच्या शिवसागर येथे 50 व्या दिवसाचे आणि तेलंगणामधील हैदराबाद येथे 25 व्या दिवसांचे उलट गणना कार्यक्रम झाले.
***
S.Thakur/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835269)
Visitor Counter : 157