अल्पसंख्यांक मंत्रालय
410 हज यात्रेकरूंची पहिली तुकडी मुंबईतून रवाना
अनेक सुधारणा केल्यामुळे 2022 ची हज यात्रा सुरळीत पार पडत असल्याचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे प्रतिपादन
सुमारे 8,000 हज यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी मुंबईतून 19 विमाने उड्डाण करणार
वर्ष 2022 मध्ये भारतीय हज यात्रेकरूंपैकी 50% महिलांचा समावेश
Posted On:
18 JUN 2022 3:54PM by PIB Mumbai
मुंबई, 18 जून 2022
हज 2022 यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. या यात्रेकरूंना केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निरोप दिला. ‘मुंबई एम्बार्केशन पॉईंट’ वरून एकूण 410 हज यात्रेकरू पहिल्या तुकडीमध्ये सहभागी झाले. यामध्ये 207 पुरुष आणि 203 महिला हज यात्रेकरूंचा समावेश आहे. सुमारे 8000 हज यात्रेकरूंसाठी मुंबई एम्बार्केशन पॉईंटवरून 19 उड्डाणे करण्यात येणार आहेत.

"भारतातील हज यात्रेकरूंनी संपूर्ण जगाच्या शांती आणि समृद्धीसाठी त्याचबरोबर मानवाला सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रार्थना करावी ," असे आवाहन नक्वी यांनी करून यात्रेकरूंना त्यांची यात्रा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौदी अरेबियाचे अधिकारी आणि प्रतिनिधी भारतातील हज यात्रेकरूंच्या चांगल्या वर्तनाबद्दल नेहमीच कौतुक करतात, असेही नक्वी यांनी यावेळी नमूद केले. तसेच 2022 मध्ये हजला जाणारे भारतीय मुस्लिम हा विश्वास कायम ठेवतील, अशी आशा नक्वी यांनी व्यक्त केली. अशा महत्त्वाच्या काळात भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सौदी अरेबियाच्या दूतावासाचे अधिका-यांचे आभार मानले. “सौदी अरेबियाने यावर्षी भारतातून जास्तीत जास्त हज यात्रेकरूंना परवानगी दिली आहे,” असेही नक्वी यावेळी म्हणाले.

100% डिजिटल/ ऑनलाईन अर्जप्रक्रिया आणि यात्रेकरूंसाठी सुधारित सोयीसुविधा यांसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणांसह हज 2022 यशस्वीरित्या सुरू असल्याचे नक्वी यांनी सांगितले. 'डिजिटल हेल्थ कार्ड' , 'ई-मसीहा आरोग्य सुविधा' आणि ई-लगेज प्री- टॅगिंग यासह मक्का मदीना येथील निवास तसेच वाहतूक यांसंबंधीची संपूर्ण माहिती देणाऱ्या अनेक ऑनलाइन/ डिजिटल सुविधा हज यात्रेकरूंना पुरवण्यात आल्या आहे असे नक्वी यांनी सांगितले.
हज 2022 साठी जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांपैकी 50% महिला यात्रेकरू आहेत.

एकंदर 79,237 भारतीय मुस्लिम हज 2022 साठी जात आहेत,अशी माहिती नक्वी यांनी दिली. लक्षणीय बाब म्हणजे हज यात्रेकरूंपैकी 50 % महिला यात्रेकरू आहेत. 1800हून अधिक मुस्लिम महिला हज 2022 साठी 'महरम' अथवा पुरुष सोबत्याशिवाय हजयात्रेला जात आहेत. महाराष्ट्रातून 4,874 यात्रेकरूंनी हज 2022 साठी नोंदणी केली आहे.
हज 2022 साठीमुंबईव्यतिरिक्त दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, कोची, लखनऊ, श्रीनगर आणि गुवाहाटी अशा नऊ एम्बार्केशन पॉईंटवरून (प्रस्थानबिंदूंवरून) विमान उड्डाणे संचालित केली जात आहेत.

सौदी अरेबियाचे मुंबईतील रॉयल कौन्सुल जनरल एच.ई. सुलेमान बिन ईद अलोतैबी ; भारतीय हज कमिटीचे अध़्यक्ष ए.पी.अब्दुल्लाकुट्टी; भारतीय हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद याकुब शेखा आणि इतर वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
***
S.Kakade/S.Auti/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835057)
Visitor Counter : 174