माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती व प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची कोल्हापूर आकाशवाणीला भेट
कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा देखील घेतला आढावा
Posted On:
16 JUN 2022 3:33PM by PIB Mumbai
कोल्हापूर, 16 जून 2022
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राला भेट दिली. त्यांनी कोल्हापूर केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. तसेच स्टुडिओ आणि संग्रहण सुविधाही पाहिल्या. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांवर कार्यक्रम राबवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले जेणेकरून इतर लोकांनाही त्यांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन मिळेल.
कोल्हापूर आकाशवाणी केंद्र
हे आकाशवाणी केंद्र 1992 मध्ये कार्यान्वित झाले. या केंद्रावरून बातम्या, संगीत, मुलाखत-आधारित कार्यक्रम तसेच पुस्तक वाचन आणि फोन-इन कार्यक्रम मराठी भाषेत प्रसारित केले जातात. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील सुमारे 40 लाख लोकसंख्येपर्यंत ह्या केंद्राची व्याप्ती आहे.
आकाशवाणी कोल्हापूर हे स्थानक रेडिओ स्टेशन आहे परंतु स्टेशनद्वारे स्वीकारलेला प्रोग्राम पॅटर्न हा मुख्य वाहिनीच्या कार्यक्रमांवर आधारित आहे. कोल्हापूर शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या एफएम ट्रान्समीटरद्वारे कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. 102.7 MHz ही स्टेशनची वारंवारता आहे. उपमहासंचालक (अभियांत्रिकी) श्री अधीर गडपाले यांनी आकाशवाणी, कोल्हापूर येथे मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख डॉ सुनील गायकवाड उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा
त्याआगोदर डॉ. एल. मुरुगन यांनी आज कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह इथं केंद्रीय कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.
सुरुवातीला कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्रीय कल्याणकारी योजनांसंदर्भात डॉ.एल. मुरुगन यांना माहिती दिली.
केवळ कोल्हापूर जिल्ह्याला पुरेल इतकंच नव्हे तर मेट्रो शहरांना लागणाऱ्या दुधाची गरज इथून पूर्ण केली जाते, याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवर सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहितीही यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंत्री महोदयांना देण्यात आली.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 2,24,000 कार्डांचं वितरण कशा पद्धतीनं करण्यात आलं, याचीही माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे याचीही माहिती डॉ एल मुरुगन यांनी घेतली.
कोल्हापूर जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 2 हजार 870 घरकुलं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 570 घरकुलं लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत सुमारे 19 हजार 744 घरांचं कोल्हापूर जिल्ह्याला उद्दिष्ट असून यापैकी 7 हजार 196 बिगर झोपडपट्टी घरकुलं बांधकामासाठी सज्ज आहेत. परंतु झोपडपट्टी वासियांच्या विरोधामुळे बांधकामास विलंब होत असल्याचं मंत्रिमहोदयांना अवगत करण्यात आलं.
यावेळी मंत्रिमहोदयांनी मुद्रा योजनेअंतर्गत महिला तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांचीही माहिती घेतली.
गाववार जमिनीच्या प्रती संबंधी आणि या संदर्भातील उणिवा संबंधात गावकऱ्यांच्या फायद्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून यासंदर्भातील फलक त्याच्या गावात लावण्यात आल्याचं जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितलं.
डॉ एल मुरुगन, सध्या कोल्हापुरात बांधकाम चालू असलेल्या अमृत सरोवरला भेट देतील.
बैठकीला कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय आदी शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
MC/PIB 001/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834522)
Visitor Counter : 305