अर्थ मंत्रालय

केंद्रीय वित्तमंत्रालयाच्या अमृत महोत्सव आयकॉनिक वीक ची सांगता


वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते संवाद आणि जनसंपर्कासाठीच्या अभिनव अशा विविध साधनांचे उद्घाटन

जनतेची आणि देशाची सेवा करण्याचा वित्तीय सेवा विभागाच्या संकल्पाचा, ‘द प्लेज’ या सांगीतिक व्हीडिओच्या माध्यमातून पुनरुच्चार

भारतीय अर्थव्यवस्थेत अर्थसंकल्पाचे योगदान या विषयावरील दोन टपाल तिकिटे आणि कव्हरचेही प्रकाशन

Posted On: 11 JUN 2022 8:10PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत, केंद्रीय अर्थमंत्रालयातर्फे गेले सात दिवस साजऱ्या केल्या गेलेल्या आयकॉनिक वीकची आज, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या विशेष कार्यक्रमात, निर्मला सीतारामन यांनी, देशाच्या विकासात अर्थ आणि कॉर्पोरेट मंत्रालयातर्फे दिल्या जात असलेल्या योगदानाची माहिती देणाऱ्या अभिनव संवाद आणि जनसंपर्क साधनांचे उद्घाटन केले.

गोव्याची राजधानी पणजी इथल्या मॅक्विनेझ पॅलेस इथे झालेल्या या सांगता कार्यक्रमात बोलतांना निर्मला सीतारामन म्हणाल्या, आपल्यासारख्या, म्हणजे अर्थमंत्रालयाच्या कामकाजाविषयी लोकांना माहिती देणारी मोहीम कितपत यशस्वी होऊ शकेल, याविषयी खुद्द आमच्या मनातही काही शंका होत्या. कारण, आम्ही आमच्या ज्या काही कामांविषयी बोलतो, ते लोकांना फारसे आवडतेच असे नाही. यावर पुढे भाष्य करताना त्या म्हणाल्या, जेव्हा आम्ही याचा अभ्यास केला, तेव्हा आम्हाला असं जाणवलं की आम्ही जी काही कामे करतो, जे उपक्रम राबवतो, त्याविषयी लोकांना काही माहिती नसते. मात्र, लोकांनी त्या समजून घ्याव्यात, यासाठी त्यांच्यापुढे आमची कामे/उपक्रम कमीतकमी शब्दांत, रोचक पद्धतीने मांडणे आवश्यक आहे. म्हणजे लोकांना ते समजेल आणि राष्ट्रबांधणीत, अर्थमंत्रालयाचे काय योगदान आहे, याची जाणीव सर्वसामान्य लोकांना होऊ शकेल.

देशात जे चांगले काम होत आहे, त्याबद्दल आपल्या जवळच्या आणि इतरांनाही माहिती सांगावी आणि प्रशासनात लोकांची रुचि आणि सहभाग वाढेल यासाठी तसेच, आणखी प्रभावी आणि प्रतिसादात्मक प्रशासनासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बोर्ड गेम्स, 3D कोडी आणि CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ ने आणलेल्या कॉमिक बुक्सच्या स्वरूपात शैक्षणिक साहित्य उपलब्ध केले. खेळातून शिकाअशी ही मनोरंजक पुस्तके नागरिकांमध्ये तसेच मुलांमध्ये कर साक्षरता पसरवण्याच्या उद्देशाने विकसित केली गेली आहे.

साप, शिडी आणि कर: कर इव्हेंट्स आणि आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात चांगल्या आणि वाईट सवयींचा परिचय हा बोर्ड गेम देतो. हा खेळ सोपा, अंतर्ज्ञानी आणि शैक्षणिक आहे ज्यामध्ये चांगल्या सवयी शिडीद्वारे पुरस्कृत केल्या जातात आणि वाईट सवयी सापांकडून दंडित केल्या जातात.

भारताची निर्मिती: हा सहयोगी खेळ पायाभूत सुविधा आणि सामाजिक प्रकल्पांवर आधारित 50 मेमरी कार्ड वापरून कर भरण्याचे महत्त्व या संकल्पनेचा परिचय करून देतो. कर आकारणी निसर्गत: सहयोगात्मक आहे आणि स्पर्धात्मक नाही हा संदेश पोचवण्याचा या खेळाचा उद्देश आहे.

इंडिया गेट - 3D कोडे: या गेममध्ये 30 तुकड्यांचा समावेश आहे, प्रत्येकामध्ये कर आकारणीशी संबंधित विविध अटी आणि संकल्पनांची माहिती आहे. हे तुकडे एकत्र जोडलेले असताना ते इंडिया गेटची त्रिमितीय रचना तयार करतील आणि कर भारताच्या उभारणीचा संदेश देईल.

डिजिटल कॉमिक बुक्स : मोटू - पतलूची पात्रे सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय कार्टून पात्रांपैकी एक आहेत. आयकर विभागाने मुले आणि तरुणांमध्ये उत्पन्न आणि कर आकारणीच्या संकल्पनांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी लॉट पॉट कॉमिक्सचे सहकार्य घेतले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओडिशात पुरीच्या किनाऱ्यावर प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी तयार केलेल्या 'Taxes for Nation's Development' या वाळू कला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पटनायक तसेच वाळुची शिल्पे तयार करणारे  त्यांच्या विद्यार्थ्यांची सीतारामन यांनी संवाद साधला.

आझादी का अमृत महोत्सवावरील आयकर विभागाच्या ध्वनिचित्रफितीत स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रातल्या करांनी देशाच्या विकासात कसे योगदान दिले आहे हे दाखवण्यात आले आहे.

यात प्रत्यक्ष करांच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणांवरही यात प्रकाश टाकलेला आहे.

"Resolve at 75 ही अमृतमहोत्सवाची महत्त्वाची संकल्पना आहे. अर्थ सेवा विभागाच्या 'द प्लेज' या व्हिडिओ मध्ये भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रातील लोकांनी देशाची सेवा करण्याचे व्रत घेत असल्याचे चित्रण केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माय स्टॅम्प, एक विशेष कव्हर आणि गेल्या 75 वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्थेत केंद्रीय अर्थसंकल्पाने दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या एका माहिती अल्बमचे अनावरण केले. हा अल्बम अर्थसंकल्प विभागाने पोस्ट विभागाच्या सहकार्याने आणला आहे.

गोव्याचे मंत्री मौविन गोडिन्हो, महसूल सचिव तरुण बजाज, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, श्री अजय सेठ, अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) विवेक जोहरी आणि अध्यक्ष,

केंद्रीय बोर्ड ऑफ प्रत्यक्ष कर (CBDT) संगीता सिंग यांचा उपस्थितांमधे समावेश होता.

 

आझादी का अमृतमहोत्सव आणि आयकाॅनिक सप्ताहाविषयी

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेला हा उपक्रम आहे. भारताची जनता, संस्कृती आणि कामगिरी याचा गौरवशाली इतिहास  साजरा करणे हा या उपक्रमाचा एक भाग आहे.

या उपक्रमाची औपचारिक सुरूवात  12 मार्च 2021ला झाली. त्या दिवशी 75 आठवड्यांची उलटीगिनती सुरू झाली. केंद्रीय अर्थमंत्रालयाने 6 ते 11 जून या कालावधीत आयकाॅनिक वीक साजरा केला. त्यात विविध उपक्रम राबविले. अर्थविषयक जनजागृती, साक्षरता मोहिमा, व्याख्याने, परिसंवाद, अमली पदार्थ विरोधी दिवस, सायकल रॅली असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले. त्याविषयीचे संकलन ई काॅफी टेबल पुस्तिकेत आहे.

***

S.Tupe/R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833197) Visitor Counter : 193


Read this release in: English , Urdu , Hindi