आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा 63वा दीक्षांत समारंभ संपन्न
Posted On:
03 JUN 2022 5:41PM by PIB Mumbai
मुंबई, 3 जून 2022
अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता मिळालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा 63वा दीक्षांत समारंभ आज मुंबईत झाला. यावर्षी 255 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. संशोधन आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदके प्रदान करण्यात आली. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक, प्राध्यापक बलराम भार्गव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्राध्यापक भार्गव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पदवी, पदविका आणि पदकं प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या विद्यार्थ्यांनी या संस्थेत प्राप्त केलेले उच्च दर्जाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यांचा उपयोग जास्तीत जास्त क्षमतेने लोकांच्या सेवेसाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेने 1956 पासून लोकसंख्या शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आणि लोकसंख्येचे पुराव्यांवर आधारित संशोधन करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केले.
2019-21 या कालावधीतल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशात अलीकडच्या काळात लोकसंख्येच्या विविध मापदंडांमध्ये सुधारणा झाली आहे, असे प्राध्यापक भार्गव म्हणाले. मात्र कोविड 19 सारखे नव्याने उद्भवणारे संसर्गजन्य रोग आपल्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करतात असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावर नियोजन आणि धोरण निर्मिती करता या क्षेत्रात उच्च गुणवत्तेच्या अधिकाधिक संशोधनाची आवश्यकता आहे तसेच लिंग, सामाजिक आणि प्रादेशिक असमानतांनुसार असलेली तफावत मोजणे महत्वाचे आहे, असं मत त्यांनी व्यक्त केले.

भारत सरकारचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि बेंगळुरू इथल्या राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्रातील मानद प्राध्यापक डॉ. के. विजय राघवन, यांनी दीक्षांत भाषण केले. या सोहळ्यातल्या पदक विजेत्या आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध सरकारी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आणि त्या उपक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.
जैवविविधतेचा ऱ्हास, हवामान बदल, उच्च गुणवत्तेच्या शिक्षणातील फरक, श्रमशक्तीचा सहभाग, विविध रोग, युद्ध , श्रीमंत आणि गरीब देशांमधील विकासातील प्रचंड तफावत यामुद्द्यांवर डॉ राघवन यांनी भर दिला. उच्च दर्जाचे संशोधन, प्रशिक्षण आणि शिक्षणामुळे आपल्या देशातीलच नव्हे तर जगासमोरच्या आव्हानांचा सामना करता येणं शक्य होईल, असे ते म्हणाले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) , अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS आणि आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था ( IIPS) मध्ये उपलब्ध असलेले ज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षण हे त्यांच्या कॅम्पसपुरते मर्यादित न राहता ते देशातील दुर्गम भागात असलेली महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचे संचालक प्राध्यापक के. एस. जेम्स यांनी 2021-22 या वर्षातील संस्थेचे उपक्रम आणि कामगिरी याबाबत माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेविषयी :
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेत चार प्रकारचे नियमित स्वरूपातील अभ्यासक्रम शिकवले जातात:
लोकसंख्या शास्त्रात M.A.किंवा M.Sc
लोकसंख्या अभ्यासात प्राविण्य ( मास्टर )
जैवसंख्याशास्त्र आणि मानवी लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास या विषयात एमएस्सी(Biostatistics & Demography)
आणि पीएचडी
याव्यतिरिक्त या संस्थेत दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि मुंबई इथल्या सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे दोन पदविका अभ्यासक्रम देखील शिकवले जातात.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण, जिल्हास्तरीय घरगुती सर्वेक्षण, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचे मूल्यांकन यासारख्या अतिशय महत्वाच्या सर्वेक्षणांमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था आघाडीवर असते.
Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830854)
Visitor Counter : 219