माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“सिनेमानिर्मितीची प्रक्रिया कायम सरळसाधी असावी, म्हणजे उदयोन्मुख युवा सिनेनिर्मात्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता येतील”- प्रसून जोशी यांनी मिफ्फ-2022 च्या मास्टर क्लासेसमध्ये मांडले मत
कथावस्तूमागचा दृष्टिकोन महत्वाचा, त्याचबरोबर सिनेमाची कथा स्वानुभवातून बोलणारी असली पाहिजे: प्रसून जोशी
‘‘प्रत्येक माणूस म्हणजे एक न सांगितली गेलेली कथाच आहे’’
Posted On:
02 JUN 2022 5:20PM by PIB Mumbai
मुंबई, 2 जून 2022
“सिनेमानिर्मितीचे काम मोठ्या हिमतीचे काम असू नये, ही प्रक्रिया सरळ सोपी असायला हवी, तरच देशातल्या युवा, उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांची सिनेमानिर्मितीची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील” असे मत, सुप्रसिद्ध गीतकार, कवी आणि पटकथा लेखक प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. मुंबईत सुरू असलेल्या 17 व्या मिफ्फ म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज प्रसून जोशी यांनी मास्टर क्लासच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणा-या उपस्थित नवयुवकांना ‘आर्ट ऑफ द स्टोरी टेलिंग’ म्हणजे कथा सांगण्याची कला, या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

आपण नेहमी देशातल्या विविधतेविषयी बोलतो, मात्र, चित्रपट निर्मितीचे लोकशाहीकरण होत नाही, तोपर्यंत, ही विविधता चित्रपटातून कशी मांडली जाईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर काही निवडक लोकच चित्रपट बनवत राहिलेत, तर आपल्याला त्याच त्या प्रकारची कथावस्तू, आशय असलेले चित्रपट येतांना दिसतील, असे ते पुढे म्हणाले. वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले लोक जर सिनेमानिर्मितीत आले, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे, विषयांचे सिनेमे बघता येतील आणि त्यातूनच सिनेमा विश्व अधिक समृद्ध होत जाईल. असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक माणसामध्ये एक कथा असते, कुणी आपली कथा सांगतो, कुणी नाही. मात्र कोणतीही कथा कशी सांगायची हे तो सिनेकथाकार, लेखक ठरवत असतो. त्यामध्ये त्याचा अनुभव, दृष्टिकोन, त्याचा भवताल, त्याच्यावर झालेले संस्कार अशा अनेक गोष्टींचे प्रभाव दिसून येतात. असे मनोगत लोकप्रिय गीतकार, पटकथालेखक, पद्मश्री प्रसून जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत विजय यांनी प्रसून जोशी यांना चित्रपटांशी संबंधित अनेक विषयांवर त्यांना बोलते केले.
प्रत्येक माणसाला रोज अनेक अनुभवांना सामोरं जावं लागतं. स्वतःला आलेली अनुभूती, घेतलेला सत्यानुभव दुस-यापुढे मांडताना त्याला तो अनुभव आपलाच आहे, असे वाटले पाहिजे, अशा शब्दात मांडणे म्हणजे कथा सांगणे. तुमची कथा ऐकताना, पाहताना समोरची व्यक्ती तुमच्या अनुभवात समरस झाली पाहिजे. तुमचे दुःख, वेदना तसंच तुमचा आनंद, तुमचे यश हे त्या समोरच्या दुस-या व्यवतीला त्याचेच वाटले पाहिजे. हे ज्यावेळी घडते, त्यावेळी तुम्ही आपल्या अनुभवातले सुंदर मोती वेचले आणि ते लोकांना दाखवले, याचा आनंद मिळतो, हा आनंद लेखकाच्यादृष्टीने अवर्णनीय आहे, असे प्रसून जोशी यांनी सांगितले.

‘‘आता अनुभव असेल तरच लेखक लिहू शकेल का? केवळ असेच नाही. तर त्याला परकाया प्रवेशही तितक्याच ताकदीने करता आला पाहिजे. ‘‘ भाग मिल्खा भाग’’ या चित्रपटाचे लेखन करताना मी मिल्खासिंग यांच्याबरोबर अनेकदा चर्चा करीत असे. त्यांच्या बालपणातल्या आठवणी, स्पर्धेतल्या आठवणींवरच आम्ही जास्त बोलत असू. त्यावेळी मिल्खासिंगांना वाटले, माझ्या खेळाबद्दल तर आपण काही बोलतच नाही! वास्तविक, मी काही खेळाडू किंवा धावपटू नव्हतो. सिनेमाचा लेखक म्हणून कथेच्या नायकाचे व्यक्तिमत्व मला दाखवायचं होतं, तो खेळतो आणि जिंकतो किंवा हरतो; यापेक्षाही कोणत्याही स्पर्धेत, संघर्षाच्या काळात तो माणूस म्हणून कसा वागतो, हे मला प्रेक्षकांना दाखवायचं होतं. प्रेक्षकांनी चित्रपटातले प्रसंग आपल्या जीवनातल्या घटनांशी जोडले तर लेखकाने केलेला परकाया प्रवेश यशस्वी झाला, असे म्हणता येईल.

चित्रपट कथांचे विषय तेच असतात, फक्त कथेची मांडणी वेगळी असते, हे सांगताना प्रसून जोशी आपल्याच काव्यातील पंक्ती उदृधत करताना म्हणाले, ‘‘ हजार बार यहॉंसे जमाना गुजरा है, नई नई सी है कुछ तेरी रेह गुजर फिर भी ।‘‘ ‘’प्रत्येक माणसाची एक न सांगितलेली कथा असते, त्याची स्वप्ने, आकांक्षा असतात. ती आपल्या अनुभवांच्या जोरावर मांडताना कथाकाराने आपली पाळेमुळे, आपली संस्कृती यांचे विस्मरण होवू देवू नये,’’ असे जोशी यांनी आवर्जुन नमूद केले.
‘तारे जमीं पर’ या चित्रपटाच्या गीतांनी प्रसून जोशी यांना अमाप लोकप्रिय मिळवून दिली. या चित्रपटाच्या शीर्षक गीतकाव्याचे त्यांनी यावेळी वाचन केले. या गीताविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘ लहान मुलांसाठी लेखन करणे, या विषयाकडे माझे तसे दुर्लक्षच झाले होते. परंतु ‘तारे जमीं पर’ मधली गाणी लिहिताना मी मुलांची जणू वेगळी दुनियाच पाहिली, अनुभवली. त्यावेळी माझी कन्या अवघी अडीच वर्षांची होती. ती कोणत्या गोष्टीचा कसा विचार करीत असेल, याविषयी अंदाज बांधत मी कविता लिहिल्या आणि त्या सर्वांना आवडल्या, सिनेमाही लोकप्रिय झाला.

कथालेखन, गीतकार, जाहिरातींसाठी जिंगल्स त्याचबरेाबर इतर विविध संस्थांचे पदाधिकारी इतकी कामे एकाचवेळी करणे आणि त्या सर्व गोष्टी अतिशय उत्तमतेने पार पाडणे, तुम्हाला कसे शक्य होते, या प्रश्नावर प्रसून जोशी उत्तरले, ‘‘ मी स्वतःला फक्त सादर करतो. एक उदाहरण देतो ते म्हणजे, विजेच्या तारेचे! मी काही वीज नाही! तर वीजवाहक तार आहे. मी एक निमित्त आणि माध्यम आहे. लेखकाने फक्त त्याला आलेला अनुभव मांडायचा, तो मी मांडतो. जो विचार येतो, तो कागदावर उतरवतो. मात्र विजवाहक तार गरम होवू नये, याची काळजी घेत असतो. हे करताना मी कुठून आलोय हे मी कधीच विसरत नाही. यामुळेच माझ्या शब्दभंडारामध्ये माझ्या गावात वापरले जाणारे शब्द आहेत, ते मी लेखनात, काव्यातही वापरतो. हे सांगताना त्यांनी ‘झम’ सारख्या उत्तराखंडमध्ये वापरल्या जाणा-या अनेक शब्दांचा वापर आपण ‘तारे जमीं पर’च्या गाण्यातही केला असल्याचे सांगितले.

युवापिढीला खास मार्गदर्शन म्हणून काय सांगणार यावर प्रसून जोशी यांनी दिलेले उत्तर अतिशय विचार करायला लावणारे होते. ‘‘ आजच्या तरूणांनी बैचेन जरूर असावे, पण या अस्वस्थतेतून सकारात्मक, विधायक कार्य व्हावे. देशाच्या संस्कृतीचा महान वारसा कधीच विसरू नये, तो बरोबर घेवूनच आपल्याला स्वतःची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. जिंगल्ससाठी माझ्याकडे अनेक स्टार्टअप्स सुरू करणारे येतात, त्यांच्या अफाट कल्पना मलाही प्रोत्साहन देणा-या असतात,’’ असे सांगून जोशी यांनी नवयुवकांमध्ये असलेल्या अफाट क्षमतांचे कौतुक केले.
कोणाकडूनही निंदा होत असेल तर त्यामधून स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणा, परंतु दुस-याला मारक ठरणा-या निंदेला इथे अजिबात थारा असू नये, असे मत प्रसून जोशी यांनी एका युवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.
मिफ्फच् या मास्टर क्लासला चित्रपट महोत्सवाला उपस्थित असलेले युवा प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रसून जोशी यांनीही अनेकजणांच्या प्रश्नांना विस्ताराने उत्तरे दिली. यावेळी त्यांनी ‘लक्ष्य क्या है?‘, ‘दीपक हूं, मैं लालायित हूं’, ‘मूमकीन है...’ या कवितांचे वाचन केले, त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
* * *
PIB MIFF Team | R.Aghor/S.Bedekar/Darshana/MIFF-46
चांगल्या सिनेमांची प्रसिद्धी तुमच्यासारख्या चांगल्या सिनेप्रेमींच्या कौतुकामुळेच होते, यावर आमचा विश्वास आहे. तुमचं सिनेमाबद्दलचं प्रेम समाज माध्यमांवर #AnythingForFilms /#FilmsKeLiyeKuchBhi and #MIFF2022 वापरून शेयर करा. चला सिनेमाबद्दलचं हे प्रेम सगळ्यांपर्यंत पोहचवूया !
|
#MIFF2022 मधल्या कुठल्या सिनेमानं तुमच्या काळजाचा ठोका चुकवला? #MyMIFFLove वापरून जगाला कळू द्या MIFF मधला तुमचा आवडता सिनेमा कुठला ?
|
जर कथा तुमच्या काळजाला भिडली असेल तर, आम्हाला संपर्क करा! तुम्हाला सिनेमा किंवा निर्मात्याबद्दल आणखी माहिती हवी आहे का? विशेषतः जर तुम्ही पत्रकार किंवा ब्लॉगर आहात आणि सिनेमाशी संबंधित लोकांशी बोलायचं आहे? पीआयबी तुमची त्यांच्याशी गाठ घालून देईल, आमचे अधिकारी महेश चोपडे यांच्याशी +91-9953630802 वर कॉल करा. किंवा miff.pib[at]gmail[dot]com वर आम्हाला मेल करा.
|
कोविड महामारी नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या ह्या महोत्सवात, चित्रपट रसिक ऑनलाइन पण महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकतील. ऑनलाईन प्रतिनिधी म्हणून आपण मोफत नोंदणी करू शकता (मिश्र स्वरूपाच्या महोत्सवासाठी) https://miff.in/delegate2022/hybrid.php?cat=aHlicmlk या संकेतस्थळावर तुम्हाला स्पर्धा विभागातले चित्रपट उपलब्ध झाल्यावर बघता येतील.
|
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830524)
Visitor Counter : 325