गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खेडा येथे गुजरात पोलिसांसाठी 348 कोटी रुपयांच्या निवासी आणि अनिवासी संकुलांचे उद्घाटन केले


देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या 35000 हून अधिक शहीद पोलिसांना अमित शहा यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

Posted On: 29 MAY 2022 8:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खेडा येथे गुजरात पोलिसांसाठी 348 कोटी रुपये खर्चाच्या निवासी आणि अनिवासी संकुलांचे उद्घाटन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय मंत्री देवुसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.कोटी रुपये खर्चाच्या निवासी आणि अनिवासी संकुलांचे उद्घाटन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय मंत्री देवुसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, सरदार पटेल यांच्या जन्मभूमीला भेट देताना मला नेहमीच नवचैतन्य आणि ऊर्जा मिळते, कारण संपूर्ण भारताच्या नकाशावर याच लोहपुरुषामुळे आज अखंड भारताचे दर्शन साकार झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी, 600 हून अधिक संस्थानांचा हा देश कसा एकरूप होईल असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि सरदारसाहेब नसते तर ते शक्यच झाले नसते. त्यांनी संपूर्ण देशाला एकत्र आणले. जुनागड असो, जोधपूर, हैदराबाद असो की लक्षद्वीप, सरदार पटेल यांनी देशाला जोडण्याचे काम केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देशभरातील पोलीस दल कटिबद्ध आहे. असंख्य नवनवीन आव्हानांना तोंड देत देशातील पोलीस दलाने स्वत:ला अद्ययावत केले आहे. ज्यांना देश तोडायचा होता, त्यांनी चुकीच्या हेतूने अनेक कट रचले,मात्र आपले कौशल्य, देशभक्ती, कर्तृत्वाने आणि कर्तव्यदक्षतेने या लोकांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे काम देशाच्या पोलीस दलाने केले आहे. ते म्हणाले की, या प्रयत्नात पोलीस दलातील 35000 हून अधिक लोकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला गुजरातच्या जनतेला सांगायचे आहे की, जर या 35000 पोलीस कर्मचाऱ्यांनी मातृभूमीसाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले नसते तर आपण सुरक्षित राहू शकलो नसतो. शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला भरपाई देणे अशक्य आहे, मात्र देशाच्या इतिहासात प्रत्येक शहीद जवानाचे हौतात्म्य सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

शाह म्हणाले की, आज अनेक कामांचे उद्घाटन होत आहे. सुमारे 348 कोटी रुपये खर्चून एकाच व्यासपीठावरून 57 विविध इमारतींचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये गुप्तहेर यंत्रणेचे कार्यालय, डॉग कॅनाल , वाहतूक विभागाची इमारत, वायरलेस वर्कशॉप, पोलीस बॅरेक, पोलीस दवाखाना, न्यायालय सुविधा, पोलीस ठाणे आणि निवासी संकुल यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, 2001 मध्ये नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते आज 2022 मध्ये भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री झाल्यापर्यंत, आमच्या सरकारने सुमारे 31,146 पोलीस कर्मचाऱ्यांना घरे देण्याचे काम सुमारे 3840 कोटी रुपये खर्चून केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या विकासाची पायाभरणी शक्ती पंचामृत म्हणजेच ज्ञानशक्ती, संरक्षण शक्ती, जलशक्ती, लोक शक्ती, ऊर्जा शक्ती या आधारे केली आहे.

अमित शहा म्हणाले की, सण कोणताही असो, पोलीस कर्मचारी आपल्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात. रक्षाबंधन असो, दिवाळी असो, होळी असो, रथयात्रा असो किंवा अन्य कोणताही सण असो, पोलीस दलाचे जवान सण साजरे करण्याऐवजी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी रस्त्यावर उभे राहतात. सणासुदीच्या दिवशीही गुजरात पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्था सांभाळून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात आणि कायदा व सुव्यवस्था राखतात, हे लोक २४ तास काम करतात, त्यांची ड्युटी अशीच असते. आम्ही त्यात कोणताही बदल करू शकत नाही, मात्र या 31000 जवानांना घरे देऊन आम्ही सुनिश्चित करतो आहोत की तुम्ही गुजरातची काळजी घ्या, गुजरात सरकार तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी बसले आहे. या 31000 हजार कुटुंबांना घरे दिल्यानंतर आज मी गुजरातमधूनच केंद्रात गेलो आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो. आज मी अभिमानाने सांगत आहे की पोलीस संतुष्टता गुणोत्तरामध्ये गुजरात संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

ते म्हणाले की, आत्ताच भारत सरकारने अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या पोलिसांना एकत्र जोडून अंमली पदार्थांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. आज अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत गुजरातने संपूर्ण देशाला मार्ग दाखवला आहे. चेतक कमांडोज, एटीएस पोलीस, तटरक्षक पोलीस स्टेशन, मरीन ट्रान्सपोर्ट यासारख्या गुजरात पोलिसांच्या अनेक तुकड्या एक नेटवर्क बनल्या आहेत, आणि देशातील घुसखोरी दहशतवाद, देशविरोधी कारवाया आणि जातीय हिंसाचार थांबवून गुजरातला सुरक्षित करण्यात मदत केली आहे.

ते म्हणाले की, जातीय सलोखा राखणे असो, कायदा-सुव्यवस्था बिघडवणारी विविध आंदोलने असोत, सागरी सुरक्षा असो, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ, तस्करी या सगळ्याच बाबतीत गुजरात पोलिसांनी दोन पावले पुढे राहण्याचे धोरण ठेवले.

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829286) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi