शिक्षण मंत्रालय

आयसर पुणे मधील नव्या विभागांमुळे विविध शाखांसाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यासाठी मदत होईल- धर्मेंद्र प्रधान


धर्मेंद्र प्रधान यांची पुण्याच्या आयसरला भेट, विविध सुविधांचे केले उद्घाटन

Posted On: 27 MAY 2022 7:27PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुण्यातील आयआयएसईआर,आयसर इथेडेटा सायन्स विभागाच्या संशोधन आणि कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. या एकाच विभागात, डेटा सायन्स शी संबंधित तीन मूलभूत अभ्यासक्रम एकत्रित येणार आहेत. यात- 1) सांख्यिकी आणि संभाव्यता, 2) अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि 3) कॉम्प्युटर सायन्स यांचा समावेश आहे. या विभागाचा भर, शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष अशा तीन स्तरीय धोरणांवर असणार आहे. त्याद्वारे, थीअरॉटिकल अंडरपिनिंग म्हणजे गृहीतक कल्पनाशक्ति, नव्या पद्धतींचा विकास आणि विविध अॅप्लिकेशनसाठीची क्षमता विकसित केली जाईल.

 

धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते, आरोग्य आणि  आजार यांच्या संदर्भात जनुकीय कार्यविषयक राष्ट्रीय सुविधेचेही उद्घाटन झाले. या सुविधेमुळे, आजारांचा अभ्यास करण्यासाठी महत्वाची मदत होईल तसेच आरोग्य आणि औषधे यांच्यासाठी महत्वाची माहिती मिळू शकेल.  या सुविधेत, मॉलिक्यूलर बायोलॉजी प्रयोगशाळा मायक्रोइंजेक्शन व्यवस्थेचाही समावेश आहे . ज्याद्वारे, नॉक आऊट किंवा नॉक इन माऊस मॉडेल  निर्माण करता येईल.  या सुविधेत, शुक्राणू आणि गर्भ क्रायोप्रीझर्वेकशन म्हणजे संवर्धन आणि कृत्रिम फलन, तसेच स्टीरिओ-टॅक्सीक शस्त्रक्रियेच्या सुविधेचाही समावेश आहे. आयआयएसईआर पुण्यातील 10 संशोधन समूह या सुविधेचा उपयोग करतील. त्याशिवाय, टीआयएफआर, आयुष मंत्रालय, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अशा विविध संस्थांनाही या सुविधेद्वारे आवश्यक त्या सेवा पुरवल्या जातील.

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी भारत सरकारच्या राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग मिशनच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या  सी-डॅकच्या परम (PARAM)ब्रह्म सुविधा केंद्राला देखील भेट दिली. परम ब्रह्म येथे 1.7 पीएफ (पेटाफ्लॉप्स) इतकी गणन क्षमता असलेल्या सीपीयू आणि जीपीयूचे मिश्रण आहे. त्याशिवाय,  1 पीबी ( पेटाबाईट्स) साठवणूक क्षमतेवर आधारित, उच्च कामगिरीक्षम समांतर यंत्रणाही आहे.

त्याशिवाय, त्यांनी इंद्राणी बालन, विज्ञान कृती केंद्रालाही भेट दिली. या केंद्रात कमी खर्चातली वैज्ञानिक संवादात्मक खेळणी विकसित केली जातात, ज्याद्वारे सहभागात्मक आणि सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवले जाते. त्यानंतर अटॉमिक फिजिक्स आणि क्वांटम ऑप्टिक प्रयोगशाळेला आणि सूक्ष्मजीव दर्शक सुविधा केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

आयआयएसईआर, पुणे इथला डेटा सायन्स विभाग, भारताला भविष्यासाठी सज्ज, विशेषतः आरोग्यासारख्या आघाडीच्या क्षेत्रांत सुसज्ज होण्यास मदत करेल आणि वैज्ञानिक दृष्ट्या, प्रयोगशाळेत सिद्ध  अशा अद्यायवत वैद्यकीय ज्ञानामुळे आरोग्य चिकित्सा करण्यात मदत होईल. आरोग्य आणि आजार निदानासाठी जनुकीय कार्यविषयक राष्ट्रीय सुविधेमुळे, जीवशास्त्रात संशोधनाच्या क्षमता वाढतील आणि सूक्ष्म जीवाणूला समजून घेण्यात आज असलेल्या कमतरता यातून भरुन निघतील. आयआयसीईआर पुणे, मध्ये समाविष्ट झालेल्या या नव्या सुविधेमुळे, शिक्षणाच्या कक्षा विस्तारतील, संशोधनात सुधारणा होईल आणि जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानवशास्त्र, पृथ्वीविज्ञान, हवामान बदल अशा विषयात सुधारणा होईल.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828772) Visitor Counter : 216


Read this release in: English , Urdu , Hindi