विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारे उच्च क्षमतेचे मॅग्नेट्रॉन तंत्रज्ञान देशात विकसित करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


इंग्लंड आणि जपान नंतर उच्च क्षमतेचे मॅग्नेट्रॉन तंत्रज्ञान देशात विकसित करणारा भारत तिसरा देश ठरणार : डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 25 MAY 2022 9:27PM by PIB Mumbai

 

कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारे उच्च क्षमतेचे मॅग्नेट्ररॉन तंत्रज्ञान देशात विकसित करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.

डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि बंगळुरूच्या पॅनासिया मेडिकल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या दरम्यान " एस - बँडवर नियंत्रित करता येण्याजोगे मॅग्नेट्रॉन परमाणू प्रवेगक तयार करणे तसेच त्यांचे व्यापारीकरण यासाठी आर्थिक सहकार्य करण्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण 9.73 कोटी रुपये निधीपैकी 4.78 कोटी रुपये निधी कर्ज रुपात कंपनीला द्यायला तंत्रज्ञान विकास मंडळाने सहमती दर्शवली आहे.

डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले की, पिलानी येथील सीएसआयआर- सीईईआरआय ( केंद्रीय इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संशोधन संस्था ) ने विकसित केलेले उच्च क्षमतेचे मॅग्नेट्रॉन तंत्रज्ञान कर्करोगाच्या उपचारात क्रांतिकारी ठरेल. या तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगतज्ञ 2 मिलिमीटर पेक्षाही लहान असलेल्या मेंदूतील

गाठींवर रेडिएशनच्या मदतीने कोणत्याही दुष्परिणाम शिवाय परिणामकारक उपचार करू शकतील. या तंत्रज्ञानामुळे परिणामकारक उपचारांसोबतच सर्व प्रकारच्या कर्करोगांच्या गाठींवर उपचारांसाठी येणारा खर्च देखील कमी होईल.

ते पुढे म्हणाले की, हे यंत्र U.S. FDA, 510(k) प्रमाणित असून 11 मे 2022 रोजी साजऱ्या झालेल्या  तंत्रज्ञान दिनी याची सुरुवात करण्यात आली आहे. इंग्लंड आणि जपान या देशानंतर जागतिक बाजारात प्रवेश करणारा हा तिसराच  ब्रॅण्ड आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या 'मेक इन इंडिया' या मंत्रासह ' मेक फोर वर्ल्ड' चा अवलंब करत विकसित करण्यात आलेले तसेच अमेरिकेच्या एफडीएने मंजुरी दिलेले  हे यंत्र  जगातल्या अनेक देशांना निर्यात करता येऊ शकते,असे सिंह यांनी सांगितले.

मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत नरेंद्र मोदी सरकारने वैद्यकीय उपकरण निर्मितीला प्राधान्य क्रम दिला असून स्वदेशात विकसित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासही सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.   आशिया खंडात वैद्यकीय उपकरण  बाजारात  सध्या जपान, चीन आणि दक्षिण कोरिया नंतर भारत चौथ्या स्थानावर आहे असून जागतिक बाजारात 20 व्या स्थानावर आहे. भारत सध्या वैद्यकीय उपकरणांच्या आपल्या गरजेपैकी 86% उपकरणे आयात करतो तर अत्यंत महागडी असणारी वैद्यकीय उपकरणे जवळपास पूर्णपणे  आयात करत असल्याचे त्यांनी सांगितले.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1828358) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil