आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीनिव्हा येथे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात जागतिक आरोग्य सभेला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी संबोधित केले



"भारताच्या पंतप्रधानांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, लसी आणि औषधांच्या समानशील वितरणासाठी, जागतिक पातळीवर टिकाऊ मजबूत अशी पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज आहे. यामध्ये लसी आणि उपचारपद्धतींना डब्ल्यु एच ओ ची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरळीत करणे आणि डब्ल्यु एच ओ ला सशक्त करून अधिक टिकाऊ अशी जागतिक आरोग्य सुरक्षा व्यवस्था उभी करणे हेही अनुस्यूत आहे."

जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या त्यांच्या निरीक्षणांमध्ये भारतातील मृत्युसंख्या अधिक दाखविल्याबद्दल, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण परिषदेने केली सामूहिक नाराजी व्यक्त, भारतातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या संस्थेकडून एकमताने केला होता ठराव मंजूर

भारताच्या मते या वर्षीची “शांतता आणि आरोग्य” यांना जोडणारी संकल्पना अगदी कालोचित आणि समर्पक आहे, कारण शांततेशिवाय कोणत्याही प्रकारचा शाश्वत विकास आणि सार्वत्रिक आरोग्य आणि निरामयता शक्य नाही- मांडवीय

Posted On: 23 MAY 2022 9:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2022

जागतिक आरोग्य सभेच्या 75 व्या सत्रात डब्ल्यु एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयात- जिनिव्हा येथे- केलेल्या ऐतिहासिक भाषणात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तथा रसायन आणि खतमंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी, जागतिक स्तरावर अधिक मजबूत आरोग्य सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठीची भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. डब्ल्यु एच ओ अधिक बळकट करण्याची गरज ठामपणे व्यक्त करताना ते म्हणाले, "भारताच्या पंतप्रधानांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, लसी आणि औषधांच्या समानशील वितरणासाठी, जागतिक पातळीवर टिकाऊ आणि  मजबूत अशी पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज आहे. यामध्ये लसी आणि उपचारपद्धतींना डब्ल्यु एच ओ ची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरळीत करणे आणि डब्ल्यु एच ओ ला सशक्त करून अधिक टिकाऊ अशी जागतिक आरोग्य सुरक्षा व्यवस्था उभी करणे हेही अनुस्यूत आहे." जागतिक संरचनेचा एक जबाबदार सदस्य देश म्हणून या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी भारत तयार आहे, असेही ते म्हणाले.

भारताच्या मते या वर्षीची शांतता आणि आरोग्य यांना जोडणारी डब्ल्यु एच ओ ची  संकल्पना अगदी कालोचित आणि समर्पक आहे, कारण शांततेशिवाय कोणत्याही प्रकारचा शाश्वत विकास आणि सार्वत्रिक आरोग्य आणि निरामयता शक्य नाही, असेही मांडवीय यांनी नमूद केले.

मात्र भारताच्या वैधानिक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेली देशविशिष्ट अधिकृत आकडेवारी विचारात न घेता, जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या त्यांच्या निरीक्षणांमध्ये भारतातील  मृत्युसंख्या अधिक दाखविल्याबद्दल, या सत्रात भारताने नाराजी आणि चिंता व्यक्त केली. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भारतातील  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण परिषदेने नोंदवलेली  सामूहिक नाराजी या मंचावर त्यांच्यावतीने व्यक्त केली. भारतातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या या संस्थेने, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अधिक मृत्युसंख्येमागील दृष्टिकोन आणि मोजणीपद्धत यांना विरोध दर्शवणारा ठराव एकमताने मंजूर केला होता.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांचे संपूर्ण भाषण

जागतिक आरोग्य संघटनेची या वर्षीची शांतता आणि आरोग्य यांना संलग्न करणारी संकल्पना अगदी योग्य वेळ साधणारी आणि समर्पक आहे, असे भारताला वाटते कारण शांततेशिवाय कोणत्याही प्रकारचा शाश्वत विकास आणि सार्वत्रिक आरोग्य आणि निरामयता शक्य नाही.

सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट लक्ष्य निर्धारित आणि परिणाम प्राप्तीकारक पद्धतीने साध्य करण्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका मध्यवर्ती आहे, असा भारताचा ठाम विश्वास आहे.

समकालीन वास्तव परिस्थितीची हाताळणी करण्याची क्षमता जागतिक आरोग्य संघटनेमध्ये आहे हे सुनिश्चित करण्याची आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी असली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांच्या आकांक्षा तिच्याकडून प्रतिबिंबित व्हाव्यात आणि तिच्या प्रक्रिया सदस्य देशांच्या सहभागानेच केल्या जाव्यात यासाठी भारताने नेहमीच विधायक योगदान दिले आहे.

या संदर्भात अतिशय खेदाने आणि चिंतेने भारत असे नमूद करत आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या अलिकडेच राबवलेल्या प्रक्रियेनुसार  भारतातील मृत्यूंची संख्या अधिक प्रमाणात दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये आमच्या देशामधील वैधानिक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या प्रमाणित आकडेवारीला विचारात घेतलेले नाही.

परिणामी, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या भारतातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेने एकमताने एक ठराव संमत केला असून त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांची एकत्रित नाराजी आणि चिंता याविषयी मला इथे कळवण्यास सांगितले आहे.

जागतिक संरचनेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे मध्यवर्ती स्थान सुनिश्चित करण्याची आणि या संघटनेसाठी मूल्यमापन केलेल्या योगदानात टप्प्याटप्प्याने वाढ करण्याची गरज आहे. मात्र ते उत्तरदायित्वाच्या चौकटीशी, पैशाचा मोबदला देण्याच्या दृष्टीकोनाशी आणि सदस्य देशांसोबत प्रामाणिक संपर्क यांसोबत संलग्न असले पाहिजे. बौद्धिक संपदेशी संबंधित पैलूंसह वैद्यकीय उपाययोजनांची सर्वांना समान उपलब्धतेव्यतिरिक्त किफायतशीर संशोधनाची गरज, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि प्रादेशिक उत्पादन क्षमता हे विशेष भर असलेले क्षेत्र असले पाहिजे, ही बाब भारत अधोरेखित करत आहे.

माननीय पंतप्रधान मोदीजींनी लसी आणि औषधांच्या समन्यायी उपलब्धतेसाठी एक चिवट जागतिक पुरवठा साखळी उभारण्याची; लसींना आणि औषधांना मान्यता देण्याची जागतिक आरोग्य संघटनेची प्रक्रिया सुविहित करण्याची आणि एक अधिक चिवट जागतिक आरोग्य सुरक्षा संरचना तयार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला बळकट करण्याबरोबरच त्यामध्ये सुधारणा करण्याची  गरज अधोरेखित केली आहे. जागतिक समुदायाचा एक जबाबदार सदस्य म्हणून या सर्व प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी भारत सज्ज आहे.

Jaydevi PS/S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827753) Visitor Counter : 388


Read this release in: English