अर्थ मंत्रालय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या 7व्या वार्षिक बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी
Posted On:
19 MAY 2022 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2022
केंद्रीय अर्थमंत्री, कार्पोरेट व्यवहार मंत्री तसेच न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भारतातल्या गव्हर्नर निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या गव्हर्नर बोर्डाच्या 7व्या वार्षिक बैठकीत दूरदृष्टी प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. या बैठकीत ब्राझील, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि नव्याने सदस्य झालेल्या बांगलादेश तसेच संयुक्त अरब अमिराती या देशांचे गव्हर्नर आणि त्यांचे समकक्ष सहभागी झाले होते.
या वार्षिक बैठकीचे या वर्षाचे यजमान पद तसेच अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या भारताने कोरोना महामारीमुळे ही बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केली होती. या वार्षिक बैठकीची मुख्य संकल्पना ' न्यू डेव्हलपमेंट बँक : प्रगतीचा प्रभाव अनुकूलित करणे' असून ही संकल्पना सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाची आणि समर्पक आहे. अर्थमंत्र्यांनी या बैठकीत आपल्या संबोधनात आर्थिक व्यवस्था पूर्वपदावर आणण्यात जागतिक स्तरावर बहुपक्षीय आणि परस्पर सहकार्य भावनेचे महत्व अधोरेखित केले.
न्यू डेव्हलपमेंट बँकेने उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थेप्रति आपली विकासातला विश्वसनीय भागीदार ही प्रतिमा सिद्ध केली असल्याचे त्या म्हणाल्या. बँकेच्या गेल्या सहा वर्षांच्या प्रगतीचा आणि उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेताना सीतारामन यांनी बँकेने सर्व नियमांचे काटेकोर पालन करत लक्ष्य साध्य केले असल्याचा विशेष उल्लेख केला. बँकेचे भारतातले विभागीय कार्यालय गुजरात मधल्या गिफ्ट सिटीमध्ये सुरू होत असल्याबद्दल सीतारामन यांनी समाधान व्यक्त केले. निकट भविष्यात सदस्य देशांच्या प्रगतीत न्यू डेव्हलपमेंट बँक अर्थपूर्ण आणि महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826773)
Visitor Counter : 241