अर्थ मंत्रालय

देशातील सामान्य गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षांत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन


एनएसडीएलने विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ‘मार्केट का एकलव्य’ या गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमाचे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एनएसडीएल चा रौप्यमहोत्सव साजरा; कर्जरोखे करारांच्या परीक्षणासाठी एनएसडीएल ब्लॉकचेन मंचाची सुरुवात

Posted On: 07 MAY 2022 6:06PM by PIB Mumbai

 

भारतातील सामान्य गुंतवणूकदारांनी विशेषत्वाने गेल्या दोन वर्षांत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. एफपीआय प्रमाणे न वागता समर्थपणे उभे राहून आणि धक्के सहन करणारी यंत्रणा म्हणून ते काय करू शकतात हे त्यांनी जगाला हे दाखवून दिले आहे अशा शब्दात देशाच्या किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारात दाखविलेल्या अमर्याद विश्वासाचे कौतुक करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे भाषण सुरु केले. देशातील सर्वात मोठी भांडार संस्था असलेल्या एनएसडीएल अर्थात राष्ट्रीय सुरक्षा ठेव मर्यादित या संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

किरकोळ गुंतवणूकदारांचे आभार व्यक्त करत त्या म्हणाल्या, वर्ष 2019-20 मध्ये दर महिन्यात सरासरी 4 लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली. 2020-21 मध्ये या संख्येत तिपटीने वाढ होऊन ती दर महिन्याला 12 लाख इतकी झाली आणि आता आणखी वाढ दर्शवत 2021-22 मध्ये दर महिन्याला सुमारे 26 लाख नवी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री, सेबीचे अध्यक्ष मधाबी पुरी बूच आणि महाराष्ट्र मंडळाच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा रामकृष्ण श्रीनिवास यांच्या उपस्थितीत आज एनएसडीएलने भारतीय भांडवली बाजारातील सेवेची 25 वर्षे साजरी केली.

 

मार्केट का एकलव्य

या सोहोळ्याचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी मार्केट का एकलव्यहा हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमाची सुरुवात केली. या मार्केट का एकलव्यकार्यक्रमातून तुम्ही आर्थिक साक्षरतेची गरज असलेल्या अनेकांपर्यंत पोहोचू शकता. सध्या लोकांमध्ये बाजाराविषयी गोष्टी जाणून घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे, तेव्हा असा मंच सुरु करण्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी एनएसडीएलने अत्यंत उत्तम दृष्टीकोन ठेवला आहे,त्या म्हणाल्या. हा उपक्रम इतर जागतिक भाषांमध्ये राबवून त्याला जागतिक पातळीवर न्यावे अशी सूचना देखील त्यांनी केली. अशा मार्गांनी आपण पंतप्रधान मोदी यांचे भारताला विश्वगुरु करण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात साकारू शकतो. जर हा कार्यक्रम अनेक भाषांमध्ये राबविला गेला तर जगभरात असे अनेक युवक असतील ज्यांना याचा मोठा लाभ होईल. केंद्रीय अर्थमंत्री पुढे म्हणाल्या.

मार्केट का एकलव्य (भांडवली बाजाराचा एकलव्य) याचे उद्दिष्ट भांडवली बाजारातील मूलभूत गोष्टींचा परिचय करून देणे आणि विद्यार्थ्यांना आर्थिक बाजारपेठेचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देणे हे आहे.

देशातील फिनटेक कंपन्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल आणि भारत या क्षेत्रात बजावत असलेल्या आघाडीच्या भूमिकेबद्दल श्रीमती. सीतारामन यांनी माहिती दिली.  फिनटेकमधील स्टार्टअप्स आज वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करत आहेत, असे सांगत त्यांनी प्रशंसा केली. आमच्या फिनटेक कंपन्यांच्या यशाकडे जगभरातील गुंतवणूकदार कशा प्रकारे लक्ष देत आहेत, हे देखील त्यांनी यावेळी  नमूद केले.

'माय स्टॅम्प' या विशेष कव्हरचे प्रकाशनही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी केले आणि भारतीय भांडवली बाजाराच्या विकासात राष्ट्रीय प्रतिभूती भांडार लिमिटेड (एनएसडीएल,NSDL) देत असलेल्या योगदानाचा त्यांनी गौरव केला.  प्रमुख पोस्टमास्टर जनरल, श्रीमती वीणा रामकृष्ण श्रीनिवास यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

 

डीएलटी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळ (सेबी SEBI) अध्यक्ष, माधवी पुरी बुच यांनी डिबेंचर कोव्हेनन्ट मॉनिटरींगसाठी असलेल्या एनएसडीएलच्या डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) ब्लॉकचेन मंचाचे अनावरण केले.

'डीमॅट' क्रांती ही संपूर्ण बाजारपेठेने स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाची पहिली पायरी होती. आम्ही बाजारात डीएलटीच्या वापराच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत आहोत, म्हणून हा दिवस संस्मरणीय दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल, असे सेबीच्या अध्यक्ष यावेळी म्हणाल्या. 

संपूर्णपणे पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, आणि डिबेंचर मधील गुंतवणूकदारांच्या शुल्काची नोंद ठेवण्यासाठी त्यांना एकाच मंचावर आणत, तसेच मालमत्ता कव्हर रेशो जारी करण्याच्या विविध करारांचे निरीक्षण करत, भांडवली बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी, डीएलटी ब्लॉकचेनची सुरुवात  करण्यात आली आहे. एनएसडीएलचा दावा आहे, की यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, विविध बाँड इन्शुरन्स कराराच्या सुरक्षित देखरेखीसाठी महत्त्वपूर्ण बाजार पायाभूत सुविधा तयार करण्यात येत असून त्यायोगे डिपॉझिटरी एक पाऊल पुढे जाईल.

डिपॉझिटरीद्वारे विशेषत: नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगाने होत असलेल्या प्रगतीचे सीतारामन यांनी कौतुक केले. एनएसडीएल आपल्या तंत्रज्ञान, विश्वास, आणि व्याप्तीया बोधवाक्याच्या कसोटीवर खरे उतरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, पद्मजा चंद्रू म्हणाल्या एनएसडीएल ने 1996 मध्ये भारतात पहिले डीमॅट उघडले. एनएसडीएलची संपूर्ण भारतामध्ये 57,000 सेवा केंद्र आहेत. त्यात 27 दशलक्षाहून अधिक डिमॅट खाती आहेत आणि त्यातील ठेवींचे मूल्य 4 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असून; लवकरच ते 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल.

कार्यक्रमादरम्यान एनएसडीएलच्या गेल्या 25 वर्षांच्या वाटचालीवर एक चित्रफीत दाखवण्यात आली.  या कार्यक्रमात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

https://youtu.be/0NWrkKoa1RM  च्या माध्यातन कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.

एनएसडीएल विषयी

एनएसडीएल (www.nsdl.co.in ) ही भारतातील पहिली आणि जगातील अग्रगण्य सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरीजपैकी एक आहे.  डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणे (होल्डिंग) आणि हस्तांतरीत करणे (ट्रान्सफर) याद्वारे भारतीय सिक्युरिटीज बाजाराचा कायापालट करण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  डीमॅट मालमत्तेच्या मूल्यामध्ये एनएसडीएलचा बाजारातील हिस्सा 89% पेक्षा जास्त आहे.  एनएसडीएल डिमॅट खाती देशातील 99% पेक्षा जास्त पिन कोडमध्ये आणि जगभरातील 167 देशांमध्ये स्थित आहेत, जी एनएसडीएल ची व्याप्ती दर्शवते.

***

S.Thakur/S.Chitnis/S.Patgaonkar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1823533) Visitor Counter : 266


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil