रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्याच्या एसटीपी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या प्रवास आणि वाहतूक यांच्याशी संबंधित स्टार्ट अप उत्पादनांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले परीक्षण


युवा पिढीची नवोन्मेषी उर्जा भारताला उज्ज्वल आणि शाश्वत भविष्याकडे घेऊन जाईल – केंद्रीय मंत्री गडकरी

Posted On: 06 MAY 2022 9:20PM by PIB Mumbai

पुणे, 6 मे 2022

 

पुण्याच्या एसटीपीने अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कने आयोजित केलेल्या विशेष संवादात्मक कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज वाहतूक आणि प्रवास यांच्याशी संबंधित निवडक स्टार्ट अप उत्पादनांचे परीक्षण केले.  केंद्रीय मंत्री गडकरी यांनी, कृषीक्षेत्राशी संबंधित उद्योगांमधून निर्माण झालेल्या टाकाऊ पदार्थांचे वापरायोग्य डीझेल इंधनात रुपांतर करणाऱ्या आणि पुण्याच्या एसटीपीच्या अखत्यारीतील ग्रीन ज्युल्स या स्टार्ट अपचे आभासी पद्धतीने उद्घाटन देखील केले.
या कायर्क्रमात बोलताना, गडकरी यांनी युवा पिढीमध्ये असणाऱ्या नवोन्मेषी ऊर्जेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की हे युवक भारताला उज्ज्वल आणि शाश्वत भविष्याकडे घेऊन जातील.

ते पुढे म्हणाले की, येत्या काळात पुणे वाहन उद्योगांतील उत्पादनांचे मोठे केंद्र होणार आहे. नवे उद्योजक स्थानिक गरजांनुसार संशोधनावर आणि स्टार्ट अप उद्योगांवर लक्ष केंद्रित करतील कारण नजीकच्या भविष्यात जैव आणि इथेनॉल आधारित पर्यावरणस्नेही इंधनावर चालणारी वाहने विकसित होतील असे त्यांनी पुढे सांगितले. स्टार्ट अप परिसंस्थेबद्द्ल बोलताना,  सध्याच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि सध्याच्या तसेच भविष्यकाळातील समस्यांवर उत्तर शोधणाऱ्या “गरजेवर आधारित” संशोधनावर त्यांनी भर दिला.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या सल्लागार आणि अध्यक्ष डॉ. अनिता गुप्ता म्हणाल्या, “स्टार्ट अप्समध्ये उद्योजकतेची रुजवात करणे हे  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे आणि आम्ही महत्त्वाकांक्षी अभिनव संशोधकांना त्यांचे प्रकल्प सत्यात उतरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहोत.”

माजी प्रशासकीय अधिकारी  तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क मंडळाचे अध्यक्ष दिलीप बंड, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पवार, पुण्याच्या एसटीपीचे महाव्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र जगदाळे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाच्या सौजन्याने 1986 साली सायटेक पार्कची स्थापना झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक अभिनव संशोधने आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग क्षेत्र, संशोधन क्षेत्र आणि शिक्षणक्षेत्र यांच्या दरम्यान दुवा निर्माण करण्याचे काम ही संस्था करते.

पुण्याची एसटीपी ही संस्था उद्योजक आणि स्टार्ट अप्सना पुढील सर्व प्रकारची मदत आणि सेवा पुरविते: (i)आयपीआर मधील शिक्षण आणि मार्गदर्शन, धोरणात्मक नियोजन, व्यवसाय विकास, आर्थिक बाजूंची व्यवस्था, हिशोब, मनुष्यबळ, इत्यादी आणि (ii) प्रोटोटायपिंग सुविधा, लहान उत्पादन एकके, सामायिक संशोधन आणि विकास सुविधा, सह-कार्यस्थळे इत्यादी भौतिक पायाभूत सुविधा एसटीपी उद्योजकतेसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित करते, मुख्यतः विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने जाहीर केलेली आणि डीपीआयआयटीकडे नुकतीच आलेली,  नव्या संशोधकांना टिकाव धरून राहण्यासाठी अनुदाने देते, प्रोटोटायपिंग अनुदाने देते आणि स्टार्ट अप्सना बीज निधी पुरविते. आतापर्यंत 168 स्टार्ट अप्सना सायटेक पार्कने मदत केली आहे; आणि विजेवर चालणारी वाहने, कचऱ्यावर प्रक्रिया, नूतनीकरणीय उर्जा, प्रदूषण नियंत्रण, आरोग्य आणि रोगनिदान, शिक्षण, उर्जा कार्यक्षम साधणे, हरित इमारतीच्या उभारणीसाठी लागणारे साहित्य, इत्यादी क्षेत्रांमधील 81 स्टार्ट अप्सना सुमारे 13 कोटी रुपयांचे (1.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे) अर्थसहाय्य दिले आहे.

या कार्यक्रमात सादर करण्यात आलेली स्टार्ट अप उत्पादने:

  • ग्रीनज्युल्स प्रा.लि.आणि उत्पादन प्रकल्पाने कृषीसंबंधित उद्योगांतून निर्माण झालेल्या कचऱ्यातून तयार केलेले इंधन
  • जी.डी.एन्व्हायर्नमेंटल प्रा.लि. ने प्लॅस्टिक आणि थर्माकोल पासून तयार केलेले इंधन आणि रंग
  • पिक्सी इलेक्ट्रिक कार्स प्रा.लि.तर्फे निर्मित इलेक्ट्रिक जिप्सी रेट्रोफिट कीट
  • अश्नी मोटर्स प्रा.लि. तर्फे निर्मित दूरवर वितरण करू शकणारी इलेक्ट्रिक स्कूटर
  • रोबोटिक्स अॅगटेक प्रा.लि. ने तयार केलेले इलेक्ट्रिक पेरणी यंत्र

 
* * *

PIB Pune | M.Iyengar/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823372) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi