परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते मुंबईत ‘भारतीय चित्रपट आणि सुप्त सामर्थ्य’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
भारतासह सर्व आशियायी देशांनी जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणून स्थापित होण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे : शेखर कपूर
Posted On:
03 MAY 2022 3:09PM by PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2022
सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हस्ते आज मुंबईत आयसीसीआर अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने आयोजित केलेल्या भारतीय चित्रपट आणि सुप्त सामर्थ्य या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची मुंबईत राजभवन येथे झालेल्या उद्घाटन सोहोळ्याला उपस्थिती होती.


याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना शेखर कपूर म्हणाले की, भारतासह सर्व आशियायी देशांनी जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणून स्थापित होण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे. ते म्हणाले, “माझ्या आयुष्यात अशीही एक वेळ आली होती जेव्हा, केवळ अमेरिकी माध्यमांच्या प्रभावामुळे मी अमेरिकन माणसांसारखे होण्याची आकांक्षा बाळगली होती.” मात्र आता आपली वेळ आली आहे, भारत आणि चीन हे दोन देश त्यांच्यातील सुप्त सामर्थ्याची जोपासना करू शकतात, आणि चीनने हे साध्य करण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरु केले आहेत,” असे ते पुढे म्हणाले.


तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाच्या गरजेवर भर देताना शेखर कपूर म्हणाले की, जर भारताला आपले सुप्त सामर्थ्य म्हणून चित्रपटाचा वापर करायचा असेल तर आपल्याला पुढच्या पिढीचे मन आणि हृदय जिंकून घ्यावे लागेल. आज अमेरिकेतील 90 टक्के युवक सिनेमा किंवा इतर आभासी व्यासपीठांवरील निर्मिती पाहत नसून ते गेमिंग तसेच युट्युबवर निर्मित खासगी कथानक पाहत असल्याचे नमूद करून जगातील मोठा युवा देश असलेल्या भारताकरिता सध्याचा काळ ही आपले कथानक जगभर पोहोचविण्याची सुवर्ण संधी आहे. युवकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. भारताकडे जगाला सांगण्यासाठी फार मोठे कथानक असून त्याच्या प्रचार प्रसारासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे असे ते म्हणाले.
आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे म्हणाले, “आज जगभरात भारतीय संस्कृतीबद्दल सद्भावना आणि आकर्षणाची भावना निर्माण झालेली दिसते पण आपल्याला त्यांच्यामध्ये भारताविषयी अधिक सखोल जाणीव निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.” ते पुढे म्हणाले की, गेल्या काही काळात आपल्याकडे तयार झालेले चित्रपट नकारात्मक बाजूवर अधिक प्रमाणात केंद्रित झालेले दिसतात; आपल्याला आपल्या संस्कृतीचे सकारात्मक पैलू देखील सर्वांसमोर आणायला हवेत.
DLF4.jpeg)
भारतीय चित्रपटसृष्टीची लोकप्रियता पाहता जागतिक सिनेमाशी स्पर्धा करु शकते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली. योग आणि जगभर साजरा करण्यात येणारा योग दिन ही सुद्धा भारताची सुप्त शक्तीच आहे, असे राज्यपाल म्हणाले.

सुभाष घई, रुपा गांगुली, भारत बाला, अंबरिश मिश्र, अरुणाराजे पाटील, अशोक राणे, मीनाक्षी शेडे, मनोज मुन्तासिर, परेश रावल आणि जी पी विनय कुमार या नामवंत व्यक्तिमत्वांचा चर्चासत्रात सहभाग आहे.
5XS8.jpeg)
सिनेमॅटिक वसाहतवादः जागतिक आणि भारतीय सिनेमा पाश्चात्यांच्या नजरेतून, परदेशामध्ये भारत या संकल्पनेबाबत जागरुकतेचा प्रसार करण्यासाठी भारतीय सिनेमाचा एक वाहक म्हणून उपयोग, प्रादेशिक सिनेमा आणि त्याचा जागतिक प्रभाव, भारतीय सिनेमाचा परदेशी प्रेक्षकांसोबत वाढीव संपर्क आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उद्या फिल्मस डिवीजन येथे आयोजित समारोपाच्या सत्राला संबोधित करणार आहेत.
S.Thakur/S.Chitnis/P.Malandkar
(Release ID: 1822320)
Visitor Counter : 280