अल्पसंख्यांक मंत्रालय
उद्या 40 व्या ‘हुनर हाट’च्या समारोप समारंभात नामवंत कलाकारांचा सत्कार
देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले कारागीर, विणकर आणि शिल्पकार हुनर हाटमध्ये स्वदेशी उत्पादनांची प्रचंड विक्री करतात आणि मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन मागणीही मिळवतात
Posted On:
25 APR 2022 8:03PM by PIB Mumbai
मुंबई, 25 एप्रिल 2022
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित 40 व्या “हुनर हाट” च्या समारोप प्रसंगी उद्या (26 एप्रिल 2022) विविध कला, सांस्कृतिक, संगीतमय आणि लेझर लाइट शो कार्यक्रमांचा भव्य सोहोळा आयोजित केला जाईल.

एमएमआरडीए मैदान, वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित "हुनर हाट" मध्ये केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 16 एप्रिल रोजी सुरू झालेला 40 वा "हुनर हाट" 27 एप्रिल 2022 रोजी संपन्न होत आहे.
पंकज उधास, पुनीत इस्सार (महाभारतील दुर्योधन), अन्नू कपूर, सुरेश वाडकर, कैलाश खेर, सुदेश भोसले, रूप कुमार राठोड आणि सोनाली राठोड, तलत अजीज, अल्ताफ राजा, शब्बीर कुमार, शैलेंद्र सिंग, साधना सरगम, दलेर मेहदी, दिलबाग सिंग, नूरन भगिनी, उपासना सिंग, हमसर हयात, एहसान कुरेशी, भूपिंदर सिंग भप्पी, साबरी बंधू, भूमी त्रिवेदी, हम्सिका अय्यर, त्रिचूर बंधू, कविता पौडवाल, मोहित खन्ना, रेखा राज, ज्युनियर मेहमूद, राणी इंद्राणी, प्रेम भाटिया आणि अन्य देशातील नामवंत कलाकारांचाही उद्या सत्कार होणार आहे. या कलाकारांनी देशभरात आयोजित केलेल्या वेगवेगळ्या “हुनर हाट” मध्ये सादरीकरण केले आहे. या कारागिरांचे सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रम यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रदर्शित केले जातात जे लाखो लोक थेट पाहतात. याशिवाय, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाशी संबंधित माजी आणि आजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही “हुनर हाट” च्या यशस्वीतेमध्ये त्यांच्या अफाट आणि महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सत्कार करण्यात येईल.

अंदाजित आकडेवारीनुसार, मुंबई आणि आसपासच्या भागातील लाखो लोकांनी आजपर्यंत "हुनर हाट" ला भेट दिली आहे आणि 27 एप्रिलपर्यंत अभ्यागतांची संख्या काही लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, असे नक्वी यांनी सांगितले. कारागीर, विणकर आणि शिल्पकारांना मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ऑर्डर मिळत आहेत. "हुनर हाट" हे आभासी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म http://hunarhaat.org वर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या GeM पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. देश-विदेशातील लोक डिजिटल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे "हुनर हाट" उत्पादने खरेदी करू शकतात.

मुंबईतील “हुनर हाट” ला भेट देणाऱ्या लोकांनी देशातील विविध प्रदेशातील स्वादिष्ट पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. पारंपारिक सर्कस, लेझर लाईट शो, देशातील नामवंत कलाकारांचे विविध सांस्कृतिक-सांगीतिक कार्यक्रम हे मुंबई "हुनर हाट" चे प्रमुख आकर्षण ठरले आहेत असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

“हुनर हाट” पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “व्होकल फॉर लोकल” आणि “आत्मनिर्भर भारत” या आवाहनाला बळ देत आहे असेही नक्वी म्हणाले.

R.Aghor/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819954)
Visitor Counter : 168