अल्पसंख्यांक मंत्रालय
मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित 40व्या 'हुनर हाट' चे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित चाळीसाव्या हुनर हाट निमित्त केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पत्रकारांशी साधला संवाद
Posted On:
16 APR 2022 1:26PM by PIB Mumbai
मुंबई, 16 एप्रिल 2022
देशाच्या प्रत्येक भागात 'स्वदेशी' आणि 'व्होकल फॉर लोकल' च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव देणारा, कौशल्य कुबेरांचा 40 वा 'हुनर हाट', 16 ते 27 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात येत आहे. मुंबईत 40 व्या 'हुनर हाट' निमित्त केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री आणि उपनेता राज्यसभा, मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या हुनर हाट चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते, उद्या म्हणजेच 17 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता होईल अशी माहिती त्यांनी दिली.
कारागीर, विणकर, शिल्पकरांच्या कलांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या, चाळीसाव्या विक्रमी "हुनर हाट" चे अभूतपूर्व आणि भव्य आयोजन मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात, 31 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास 1000 विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मिळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत.
'हुनर हाट' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' आणि 'स्वदेशीतून स्वावलंबन' या संकल्पनांचा सशक्त, यशस्वी, सुदृढ, आणि प्रभावी प्रकल्प म्हणून सिद्ध होतो आहे, असे नक्वी यांनी यावेळी सांगितले. 'हुनर हाट' ने एकीकडे देशाच्या शतकानुशतकांची परंपरा असलेल्या शिल्पकला, विणकला या पारंपरिक कलांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रोत्साहन यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, तर दुसरीकडे 9 लाखांपेक्षा जास्त विणकर आणि शिल्पकारांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यात 50 टक्क्यांहून अधिक महिला कारागिरांचा समावेश आहे. आजपर्यंत देशभरात आयोजित करण्यात आलेल्या 39 हुनर हाट मध्ये प्रत्येक हुनर हाटला सरासरी 8 ते 10 लाख लोकांनी भेट दिली आहे. अशाप्रकारे आज पर्यंत ‘हुनर हाट’ मध्ये 4 कोटी पेक्षा जास्त लोक खरेदी करायला आणि कौशल्य कुबेरांचा उत्साह वाढवायला आले आहेत आणि वेगवेगळ्या गीत संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला आहे.
नक्वी म्हणाले की, ‘हुनर हाट’ मुळे देशातल्या दुर्गम भागांतून शिल्पकार, विणकरांच्या कलेला मंच देऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात आली आहे. ‘हुनर हाट’, ‘स्थानिक उत्पादनांना जागतिक ब्रँड’ बनविण्यासाठीचे भक्कम व्यसपीठ ठरले आहे.
विणकाम आणि शिल्पकलेशी संबंधित कुटुंबांची तरुण पिढी आपल्या स्वदेशी वारशापासून दूर जात आहे. या उत्पादनांना बाजारपेठ आणि संधी नसल्यामुळे हा वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी विणकर, शिल्पकार, कारागीरांच्या पिढीजात वारशाचा विकास आणि संवर्धनासाठी प्रभावी पावले उचलली आहेत, असेही नक्वी यांनी सांगितले. ‘हुनर हाट’ सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनातून आता विणकर, शिल्पकारांची तरुण पिढी आपला पिढीजात वारसा पुढे नेत आहे. त्यांना ‘हुनर हाट’ ने अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणल्याची माहिती त्यांनी दिली.
आज ‘हुनर हाट’चा प्रत्येक विणकर, शिल्पकार, कारागीर मोठ्या संख्येने स्वदेशी उत्पादनांची विक्री करत आहे. यामुळे विणकर, शिल्पकारांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती आली आहे. ‘हुनर हाट’ने महिला विणकरांना, शिल्पकारांच्या आकांक्षांना नवी उंची, नवी आशा दिली आहे. ‘हुनर हाट’ मध्ये महिला विणकर, कारागिरांच्या मेहनत आणि यशाच्या अनेक गाथा आहेत. या महिला विणकर, शिल्पकार स्वतःच्या प्रगतीसोबतच आपल्या कुटुंबाला देखील समृद्ध करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबईत, वांद्रे कुर्ला संकुल, इथे 16 ते 27 एप्रिल, 2022 दरम्यान आयोजित होत असलेल्या 40 व्या ‘हुनर हाट’ मध्ये 31 पेक्षा जास्त राजे आणि केंद्रशासित प्रदेशातील जवळपास 1000 विणकर, शिल्पकार, कारागीर सहभागी होत आहेत, ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर, शिल्पकारांचा समावेश आहे. मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली, नागालँड, मध्य प्रदेश, मणिपुर, बिहार, आंध्रप्रदेश, झारखंड, गोवा, पंजाब, लडाख, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळसह देशातील प्रत्येक क्षेत्रातून नावाजलेले कारागीर आपली सुंदर हस्तनिर्मित दुर्मिळ उत्पादने घेऊन आले आहेत.
‘हुनर हाट’च्या उपहारगृहात (फूड कोर्ट) इथे येणारे लोक देशाच्या विविध भागांतील पारंपारिक पदार्थांचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलीयन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’ चे मुख्य आकर्षण आहेत.
12 दिवस चालणाऱ्या मुंबई ‘हुनर हाट’ मध्ये येणाऱ्या लोकांना प्रसिद्ध कलाकारांच्या विविध गीत - संगीताच्या भव्य कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. अन्नू कपूर, पंकज उधास, सुदेश भोसले, सुरेश वाडेकर, साधना सरगम, अमित कुमार, शैलेन्द्र सिंह, शब्बीर कुमार, महालक्ष्मी अय्यर, भूमि त्रिवेदी, कविता पौडवाल, दलेर मेहदी, अल्ताफ राजा, रेखा राज, उपासना सिंह (हास्य कलाकार), एहसान कुरैशी (हास्य कलाकार), भूपिंदर सिंह भुप्पी, रानी इन्द्राणी, मोहित खन्ना, प्रिया मलिक, व्हीआयपी हास्यकलाकार, जॉली मुखर्जी, प्रियंका मैत्रा, विवेक मिश्रा, दीपक राजा (हास्य कलाकार), अदिति खांडेगल, अंकिता पाठक, सिद्धांत भोसले, राहुल जोशी, सुप्रिया जोशी, भूमिका मलिक, प्रेम भाटिया, पोश जेम्स आदि कलाकार आपले कार्यक्रम सदर करतील. 26 एप्रिल रोजी मेगा शो चे आयोजन केले जाईल ज्यात लेझर शो प्रमुख आकर्षण असेल. या व्यतिरिक्त प्रसिद्ध कलाकार अन्नू कपूर यांचा ‘अंताक्षरी’ हा कार्यक्रम देखील आकर्षणाचा केंद्र बिंदू असेल.
येत्या काळात अहमदाबाद, भोपाळ, पटना, जम्मू, चेन्नई, आग्रा, प्रयागराज, गोवा, जयपुर, बेंगलुरु, कोटा, सिक्किम, श्रीनगर, लेह, शिलॉंग, रांची, अगरतला आणि इतर शहरांत देखील ‘हुनर हाट’ चे आयोजन केले जाईल, अशी माहिती नक्वी यांनी दिली.
उदघाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, लोकसभा सदस्य खासदार पूनम महाजन, खासदार अरविंद सावंत, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार मनोज कोटक, खासदार नवनीत राणा, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, आमदार झिशान बाबा सिद्दिकी, आमदार गणेश नाईक आणि इतर लोकप्रतिनिधी आणि केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
***
S.Tupe/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817268)
Visitor Counter : 405