वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताकडून गहू आयातीला इजिप्तची सहमती, देशातील गव्हाच्या निर्यात भवितव्याला चालना


2022-23 मध्ये इजिप्तला 30 लाख टन गहू निर्यात करण्याचे भारताचे उद्दिष्ट

2022-23 मध्ये 1 कोटी टन गव्हाच्या निर्यातीचे भारताचे उद्दिष्ट

गव्हाच्या निर्यातीच्या क्षमतांना अधिक वाव देण्यासाठी अपेडा विविध देशांमध्ये व्यापारी शिष्टमंडळे पाठवणार

Posted On: 15 APR 2022 7:46PM by PIB Mumbai

मुंबई / नवी दिल्ली, 15 एप्रिल 2022

जगात गव्हाच्या सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या इजिप्तने भारताकडून गहू आयात करण्यास सहमती दिल्याने देशातील गव्हाच्या निर्यातीच्या भवितव्याला खूप मोठी चालना मिळाली आहे. धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंसाठी प्रमुख स्रोतांपैकी एक म्हणून इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी भारताला मान्यता दिली आहे.

इजिप्तच्या कृषी विलगीकरण आणि कीटक जोखीम विश्लेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील विविध प्रक्रिया केंद्रे, बंदर सुविधा आणि शेतांना भेट दिली. रशिया आणि युक्रेन संघर्षामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याने इतर पर्यायांची चाचपणी इजिप्तकडून सुरू आहे. त्यामुळेच इजिप्तच्या शिष्टमंडळाने विविध गहू उत्पादक देशांसोबत विविध व्यापारी चर्चा आणि बैठकांमध्ये सहभाग घेतल्यानंतर भारताला भेट दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी गेल्या महिन्यात दुबईच्या दौऱ्यादरम्यान इजिप्तचे नियोजन आणि आर्थिक विकासमंत्री डॉ. हाला एस सैद यांची भेट घेतली आणि इजिप्तच्या अन्न सुरक्षेच्या सुनिश्चितीसाठी भारताकडून उच्च दर्जाच्या गव्हाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली. 2021मध्ये इजिप्तने 61 लाख टन गव्हाची आयात केली होती आणि त्यावेळी भारत इजिप्तच्या अधिस्वीकृती असलेल्या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट नव्हता. 2021 मध्ये इजिप्तने आयात केलेल्या गव्हापैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गहू म्हणजेच सुमारे 2 अब्ज डॉलरचा गहू रशिया आणि युक्रेनमधून मागवण्यात आला होता. 

कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) अध्यक्ष एम अंगामुथ्थू म्हणाले, “या वर्षी इजिप्तला 30 लाख टन गहू निर्यात करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

यापूर्वी अपेडाने इजिप्तमध्ये उत्तर आफ्रिकी देशांमधून गहू आणि साखरेच्या आयातीचे व्यवस्थापन करणारे पुरवठा आणि वस्तूंचे सामान्य प्राधिकरण असलेल्या इजिप्तच्या सार्वजनिक खरेदी संस्थेकडे नोंदणी करण्यासाठी भारताच्या निर्यातदारांशी संपर्क साधला होता. मोरोक्को, ट्युनिशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम, तुर्की, अल्जिरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये भारताकडून गहू निर्यातीला चालना मिळण्याच्या शक्यतांची चाचपणी करण्यासाठी अपेडा आपली व्यापारी शिष्टमंडळे पाठवणार आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर 2022-23 मध्ये गव्हाची विक्रमी 1 कोटी टन निर्यात करण्याचे लक्ष्य भारताने निर्धारित केले आहे.

परदेशी व्यापार महासंचालनालयाच्या अंदाजानुसार 2021-22 मध्ये भारताने सुमारे 2.05 अब्ज डॉलर मूल्याच्या 70 लाख टन गव्हाची विक्रमी निर्यात केली होती. यापैकी चालू आर्थिक वर्षात 50 टक्के गव्हाची निर्यात बांगलादेशला झाली होती. साधारणपणे बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात, कतार, श्रीलंका, ओमान, आणि मलेशिया या देशांकडून होणाऱ्या मागणीवर भारतीय गव्हाच्या निर्यातीची वाढ अवलंबून असते. मात्र, अपेडाकडून येमेन, अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया या देशांमध्येही गहू निर्यातीला चालना देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. 2020-21 पर्यंत गव्हाच्या जागतिक व्यापारात भारताचे तुलनेने आंशिक योगदान राहिले आहे. 2019-20 मध्ये केवळ 2 लाख टन आणि 2020-21 मध्ये 20 लाख टन गव्हाची निर्यात भारतामधून झाली होती.

वाणिज्य मंत्रालयाने अपेडाच्या नेतृत्वाखाली गहू निर्यातीसंदर्भात वाणिज्य, नौवहन आणि रेल्वे यांसारख्या विविध मंत्रालयांच्या आणि निर्यातदारांच्या प्रतिनिधींच्या कृती दलांची स्थापना केली आहे.

“आम्ही चालू आर्थिक वर्षात गव्हाच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी कृषी, रेल्वे, नौवहन यांसारखी विविध मंत्रालये आणि निर्यातदार आणि राज्य सरकारांसोबत काम करत आहोत,” असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल अलीकडेच म्हणाले.

काकीनाडा हे मुख्यत्वे तांदळाच्या निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदराचा वापर गव्हाच्या निर्यातीसाठी करता येईल, असे आंध्र प्रदेश सागरी मंडळाने सुचवले होते.

भारतीय गव्हाची निर्यात (दशलक्ष टनांमध्ये / अब्ज डॉलर)

 

 

दशलक्ष टन

अब्ज डॉलर

2019-20

0.21

.0061

2020-21

2.08

.55

2021-22

7

2

2022-23*

10

 

स्रोत: वाणिज्य मंत्रालय, *लक्ष्य

***

PIBMUM/A.Mishra/S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817120) Visitor Counter : 684


Read this release in: English , Kannada