रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय औषधनिर्मिती उद्योगाने जगाचा प्रमुख औषध पुरवठादार बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल


आयडीएमएच्या हीरक महोत्सवाच्या समारोप समारंभात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मार्गदर्शन

भारतामध्ये असलेल्या लहान उद्योगांना वर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेल्या 160; भारतीय उत्पादक कंपन्यांनी मदतीचा हात दिला पाहिजे- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

Posted On: 15 APR 2022 4:58PM by PIB Mumbai

मुंबई, 15 एप्रिल 2022 

भारतीय औषधनिर्मिती उद्योगाने जगाचा मुख्य औषध पुरवठादार बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. ते आज मुंबईत भारतीय औषध निर्माते संघटनेच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोप समारंभात बोलत होते. भारतीय औषध निर्मिती उद्योग आपल्यामध्ये सातत्याने परिवर्तन घडवत आहे. नवोन्मेष, संशोधन, नवीन उत्पादने, ग्राहकांच्या वर्तनावर प्रभाव अशा सर्वच गोष्टींचा अंगिकार करत आहे. उत्पादनांचा दर्जा, उत्पादकता यामध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे या उद्योगाने लहान लक्ष्यांवर समाधानी राहता कामा नये, अशी सूचना त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या उत्पादनांची स्पर्धात्मकता अतिशय महत्त्वाची आहे. आपण जगातील नव्या घडामोडी, उत्तम उत्पादन पद्धती याबाबतच्या अद्ययावत माहितीसोबत वाटचाल केली पाहिजे. भारत सरकार यासाठी पूरक मार्ग उपलब्ध करून देत आहे, असे ते म्हणाले. यूएई आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय उत्पादनांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सरकारने मार्ग खुले केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. व्यापारी करारात पहिल्यांदाच आमूलाग्र परिवर्तनकारक निर्णयांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. बिगर तांत्रिक अडथळे काढून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत आणि त्याचा औषधनिर्मिती उद्योगाला विशेष फायदा होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच देशांतर्गत पेटंटची नोंदणी जागतिक नोंदणी पेक्षा जास्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सात आठ वर्षात पेटंटच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, काही औषधांच्या उत्पादनाची देखील भारतात पेटंट घेतली जात आहेत. या सर्वच बाबी अतिशय चांगल्या बदलाचे संकेत आहेत. पण या कामगिरीने आपण समाधानी राहून चालणार नाही. आपले कष्ट, लक्ष्याचा पाठपुरावा यात सातत्य राखले पाहिजे आणि आपली सध्याची कामगिरी म्हणजे आपल्या भावी काळातील उत्तुंग वाटचालीची एक पायरी म्हणून याकडे पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

यापुढच्या काळात जगाची औषधांची राजधानी म्हणून भारताची ओळख निर्माण करायची असेल तर भारतीय औषधनिर्मिती उद्योग क्षेत्राला आपली ओळख निश्चित करण्याबाबतही विचार करावा लागेल. आपण तिसरे जगातील औषध निर्माते बनायचं की प्रगत देशांमधील सर्वात वरच्या स्थानावर असलेले निर्माते म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे हे निश्चित करावे लागेल, असे गोयल यांनी सांगितले. भारतामध्ये असलेल्या लहान उद्योगांना वर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेल्या भारतीय उत्पादक कंपन्यांनी मदतीचा हात दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी उद्योगांसाठी यशाची त्रिसूत्री सांगितली. नवोन्मेषावर भर, दर्जाचा आग्रह आणि जागतिक बाजारपेठेची गरज ओळखून काम या त्रिसूत्रीवर भारतीय उद्योगांनी भर दिला तर अमृत काळानंतर म्हणजे पुढच्या 25 वर्षांनी भारतीय अर्थव्यवस्था 50 ट्रिलियन डॉलरची बनवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवायला सुद्धा काहीच हरकत नाही, असे ते म्हणाले.

त्यापूर्वी गोयल यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या सुरुवातीला भारतीय औषध निर्माता उद्योगाच्या कामगिरीची प्रशंसा केली. विपरित परिस्थितीमध्ये सकारात्मकतेचे भारतीय औषधनिर्माता उद्योगाशिवाय दुसरे उत्तम उदाहरण सापडणार नाही, असे ते म्हणाले. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाने केलेली कामगिरी असाधारण आहे आणि यासाठी ते कौतुकाला पात्र आहेत, असे त्यांनी सांगितले. कोविड काळात 200 पेक्षा जास्त देशांना आपण औषधांचा पुरवठा केला. औषधनिर्मिती क्षेत्रामधील सामर्थ्याचे दर्शन घडवतानाच आपण एक संवेदनशील देश असल्याचे देखील सिद्ध केले, असे ते म्हणाले. इतक्या मोठ्या संकटाच्या काळात ज्या प्रकारे आपण या आपत्तीला तोंड दिलं आहे त्यावरून आपण औषधनिर्मिती क्षेत्रात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनलो आहोत, असे म्हणायला हरकत नाही, असं गोयल यांनी सांगितलं. मात्र, भारतीय औषध उद्योगाने जागतिक पुरवठा साखळीमधील अनिश्चिततेचा विचार करावा आणि देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी संबंधित बाबी विचारात घ्याव्यात अशी सूचना गोयल यांनी केली. अन्न सुरक्षा म्हणजे काय हे भारतानं संपूर्ण जगाला दाखवून दिलं. तब्बल 25 महिन्यांपेक्षा जास्त काळ देशातील 80 कोटींपेक्षा जास्त जनतेला मोफत अन्नधान्याचा पुरवठा करून भारतानं आपली क्षमता सिद्ध केली, असं ते म्हणाले.

आयडीएमएने आयोजित केलेल्या या हीरक महोत्सवामध्ये दोन दिवसांच्या काळात अतिशय व्यापक विचारमंथन झालं आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली. आयडीएमएची साठ वर्षांची वाटचाल म्हणजे मोठी कामगिरी आहे, मात्र त्यांना भावी काळातील वाटचालीची दिशा ठरवावी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अलीकडच्या काही वर्षात आयडीएमए औषध उत्पादकांचा बुलंद आवाज बनली आहे. सातत्याने सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या संपर्कात राहून समन्वयाने काम करत आहे, असे त्यांनी सांगितलं.

***

MD/S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817087) Visitor Counter : 321


Read this release in: English , Kannada