वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
अमेरिकेला हापूस, केसर आणि बंगनपल्ली आंब्यांची निर्यात करणे अपेडाने (APEDA) केले सुलभ
Posted On:
13 APR 2022 4:24PM by PIB Mumbai
मुंबई, 13 एप्रिल 2022
तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय आंब्याच्या निर्यातीने पुन्हा जोर धरला आहे. कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाद्वारे(APEDA) आंब्याच्या या हंगामातील पहिल्या पेटींची तुकडी 11 एप्रिल 2022 रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे सुलभपणे पोहोचली.
हापूस, केसर आणि बंगनपल्ली या जातींचे आंबे मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशनने, अपेडाने मंजूर केलेल्या सुविधेमार्फत आवेष्टनात गुंडाळून आणि त्यांचे विकिरणन करुन निर्यात केले.अपेडातर्फे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दृकश्राव्य व्यापारी प्रदर्शन, फार्मर कनेक्ट पोर्टल, ई-ऑफिस, कृषीक्षेत्रिय मागोवा यंत्रणा (हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम), ग्राहक-विक्रेता मंच बैठका, विशिष्ट उत्पादन अभियान इत्यादींसह विविध निर्यात प्रोत्साहन उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
राज्यातून निर्यातीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अपेडा राज्य सरकारसोबत काम करते. पायाभूत सुविधांचा विकास आणि बाजारपेठ सुगमता यासाठी साहाय्य करून अपेडा, कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेता प्रतिसाद मंच (बीएसएम), आयात करणार्या देशांसोबत दृकश्राव्य व्यापार मेळेदेखील आयोजित करते.
अपेडा, भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक वैधानिक संस्था असून भारतीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीला प्रोत्साहन देणारी क्षेत्रीय सेवा प्रदान करणारी संस्था असून ती फलोत्पादन, फुलशेती, प्रक्रिया केलेले अन्न, कुक्कुट उत्पादने, दुग्धव्यवसाय तसेच इतर कृषी उत्पादनांची निर्यात सुलभ करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्याचे काम करते.
S.Kulkarni/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816402)
Visitor Counter : 156