वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतातील एकूण वस्तू आणि सेवांची निर्यात या आर्थिक वर्षात 650 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचेल- पीयूष गोयल


“उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन योजना आणि पंतप्रधान गतिशक्ति आराखडयामुळे भारत मोठ्या देशांच्या पंक्तीत झेप घेऊ शकेल.”

“आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताने संपूर्ण आत्मविश्वास आणि भक्कम सामर्थ्य घेऊन जगाशी व्यवहार करणे”

केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते मुंबईत एफई-सीएफओ ऑफ द इयर-2022’ पुरस्कार प्रदान

Posted On: 25 MAR 2022 11:14PM by PIB Mumbai

 

भारताने आता विकसित जगात आपला ठसा उमटवणारा विस्तार करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण तिथेच आपल्या भविष्यातील विकासाची गाथा लिहिली जाईल, असे मत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केले.

भारत वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत यंदा, 650 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल तसेच, एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारात, भारताचा सुमारे 1.350 ट्रिलियन डॉलर्स इतका वाटा, भारताला मोठ्या देशांच्या पंक्तीत घेऊन जाईल. असं विश्वास, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. फायनान्शियल एक्सप्रेस ने मुंबईत आयोजित केलेल्या, ‘एफई-सीएफओ ऑफ द इयर अवॉर्ड 2022’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

सेवा क्षेत्रातील निर्यातीत आपण कदाचित 250 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठू

भारताने 400 अब्ज डॉलर्स निर्यातीचा टप्पा गाठल्याची दखल, उद्योग क्षेत्रातील धुरीण आणि प्रसारमाध्यमांनी घेतल्याबद्दल, त्यांचे आभार व्यक्त करत गोयल म्हणाले की, हे आर्थिक वर्ष संपतांना आपली निर्यात 410 अब्ज डॉलर्स किंवा त्याच्या जवळपास पोहोचली असेल, अशी आशा वाटते.

कृषिनिर्यातीबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की आपण गेल्या वर्षभरात 40 अब्ज डॉलर्स किमतीच्या कृषी उत्पादनांची निर्यात केली आहे. हे वर्ष संपत असतांना, ही निर्यात 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपल्या शेतकऱ्यांनी आणि कृषिसंलग्न उद्योगांनी ही लक्षणीय कामगिरी केली आहे. असे गोयल यांनी सांगितले.

आपली अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडेल. आभूषणे आणि रत्ने, वस्त्रोद्योग, चर्म-उद्योग- सगळे उद्योग आता हळूहळू रुळावर येत आहेत. पेट्रोलियम निर्यातीत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. पोलाद क्षेत्रानेही उत्तम कामगिरी केली आहे.

सेवा क्षेत्रातील निर्यातीत भारत मोठी उद्दिष्टे साध्य करत आहे. आपण  सेवा क्षेत्रातील निर्यातीत 250 अब्ज डॉलर्सचा आकडा गाठू शकूआशा त्यांनी व्यक्त केली.

आत्मनिर्भर भारत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारताविषयी बोलतात, तेव्हा निश्चितच त्याचा अर्थ असा नसतो की भारताची दारे आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी बंद आहेत. आत्मनिर्भर भारताचा अर्थ आहे, आत्मविश्वास असलेला, स्वावलंबी, भारत, जो आपल्या सामर्थ्यच्या बळावर जगाशी बरोबरीने व्यवहार करतो. असे गोयल म्हणाले.

जगातील कुठल्याही देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहारांविना झालेला नाही. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतील या प्रवासाच्या अखेरच्या टप्पात आपण काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकारमधील प्रत्येक मंत्रालय आणि विभाग राज्य सरकारांशी समन्वय साधत काम करत आहे. 

 

मुक्त व्यापार करार

भारताच्या मुक्त व्यापारी कराराबाबत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, युरोपीय महासंघ, इस्रायल अशा देशांशी व्यापार करत आहे. आणि लवकरच आम्ही आखाती सहकार्य परिषद(जीसीसी- मध्य पूर्वेतील देश) हा करार करु शकू अशी आशा आहे.

अलीकडेच पूर्णत्वास आलेल्या युएई- एफटीए कराराबाबत बोलतांना गोयल म्हणाले आमचा स्वतःचा अंदाज असा आहे की या करारानंतर, आज दोन्ही देशांमध्ये असलेला  60-65 अब्ज डॉलर्सचा व्यापार, लवकरच 100 डॉलर्स पर्यंत पोहोचेल.

आपण आता विविध भौगोलिक क्षेत्रांकडे बघण्याची गरज असून, आपण आपला व्यापार, विशेषतः विकसित देशांमध्ये कसा विस्तारता येईल, याचे नियोजन करायला हवे, असे सांगत, भारत यासाठी तयार आहे, असेही गोयल म्हणाले.

उत्पादनांच्या किमतीच्या बाबतीत भारत स्पर्धात्मक आहे, भारतात गुणवत्ता आहे, विश्वासार्हता आहे, त्यामुळे इतर देश आपल्याकडे एक सशक्त आणि लवचिक पुरवठा साखळी करणारा देश  म्हणून मोठ्या अपेक्षेने बघतात. आज भारताकडे एक विश्वासार्ह भागीदार म्हणून बघितले जाते. आपले उद्योगक्षेत्र संपूर्ण जगासोबत- जिथे नियमांवर आधारित पारदर्शक व्यवस्था आहेत- अशा देशांसोबत काम करण्यास तयार आहे.

जेव्हा भारत आरसीईपी मधून बाहेर पडला, त्यावेळी आम्हाला उद्योगक्षेत्र, शेतकरी सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. प्रत्येकाला चीनच्या तिथल्या अस्तित्वाविषयी चिंता वाटत होती, कारण त्यांची अर्थव्यवस्था खुली, पारदर्शक नाही, भारतीय उद्योगांचे तिथे स्वागत केले जात नाही आणि किमतीच्या बाबतीतही संदिग्धता असते.” पीएलआय आणि पीएम गतिशक्ति योजना अर्थव्यवस्थेला कलाटणी देणाऱ्या ठरतील.

उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन-पीएलआय

उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन-पीएलआय योजनेचा उदय हा उद्योग आधारित समितीतून झाला असून, केंद्रसरकारकडून त्यासाठी सुविधा दिल्या जात आहेट्. 24 क्षेत्रांचे काळजीपूर्वक अध्ययन केल्यानंतर ही योजना तयार करण्यात आली. यातील 14 क्षेत्रांची योजनेसाठी निवड करण्यात आली असून, त्यातून त्यांना आपले उद्दिष्ट आणि जागतिक स्पर्धेत स्वतःचे स्थान बळकट करण्यास मदत मिळते आहे. अशी माहिती त्यांनी दिली.  ज्या क्षेत्रांना जागतिक स्तरावर अमाप संधी आहेत मात्र आजवर भारताचा त्या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्प सहभाग आहे, अशा क्षेत्रांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे.

"वस्त्रोद्योगाच्या संदर्भात, आपण अनेकदा बाजारपेठेच्या एकाच पैलूकडे लक्ष देतो, आणि तांत्रिक वस्त्रोद्योग आणि जियो टेक्सटाईल या क्षेत्रांकडे दुर्लक्ष करतो, ज्यात बहुतांश जागतिक व्यापार चालतो, मात्र आपण यात फक्त लहान खेळाडू आहोत. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना हा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न आहे."

"विशेष गुणवत्ता असलेले पोलाद क्षेत्र असाच  आणखी एक पैलू आहे ज्यात स्थानिक मागणी कमी आहे आणि स्पर्धात्मक दराचा अभाव आहे, यात उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू करण्यात आली आहे. अन्न प्रक्रिया आणि ड्रोन उत्पादन या क्षेत्रांतही उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना लागू करण्यात आली आहे."

सरकारने प्रथमच सेमी कंडक्टर या एका क्षेत्रासाठी योजना आणली आहे, ज्यात स्थानिक उत्पादकांना उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजने अंतर्गत 76,000 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल," पीयूष गोयल म्हणाले.

 

पंतप्रधान गतिशक्ती

पंतप्रधान गतिशक्ती या नाविन्यपूर्ण उपक्रमाक्सचे महत्व विशद करून सांगताना गोयल म्हणाले, "यामुळे देशात पायाभूत सुविधांचा विकास अधिक विचारपूर्वक, सुनियोजितपणे आणि हुशारीने करता येईल. यामुळे कामांवर उत्तम देखरेख ठेऊन ठरलेल्या खर्चात कामे जलदगतीने पूर्ण करून लॉजीस्टिक खर्च कमी करता येईल." माध्यमांनी या योजनेचा अभ्यास करून सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे त्यांनी  आवाहन केले.

एफ ई सीएफओ पुरस्कार

पीयूष गोयल यांच्या हस्ते जेएसडब्ल्यू समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक शेषगिरी राव यांनी एफ ई सीएफओ जीवनगौरव पुरस्कार 2022 देण्यात आला. गोयल यांच्या हस्ते उयोग क्षेत्रातील तीन विभागातील अठ्ठावीस विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  द फायनान्शियल एक्सप्रेसचे संपादक श्यामल मजुमदार, इंडियन एक्सप्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका तसेच हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता आणि उद्योग क्षेत्रातील धुरीण आणि मुख्य वित्तीय अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1809924) Visitor Counter : 136


Read this release in: English , Hindi