अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तीकर विभागाचे महाराष्ट्रात छापे

Posted On: 24 MAR 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2022

 

भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी शाळा तसेच महाविद्यालये चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या लोकप्रिय साखळीवर प्राप्तीकर विभागाने 14 मार्च 2022 रोजी तपास आणि जप्ती कारवाई केली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये स्थापन करण्यात आलेल्या 25 शैक्षणिक संस्थांच्या संकुलांमध्ये ही तपास मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान, आक्षेपार्ह दस्तावेज आणि डिजिटल स्वरूपातील माहिती सापडली असून ती ताब्यात घेण्यात आली आहे आणि त्यातून या शैक्षणिक संस्थेचे अनेक प्रवर्तक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी संस्थेच्या विश्वस्त निधीमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. या व्यवहारामुळे प्राप्तीकर कायदा 1961 अंतर्गत विश्वस्त संस्थेला मिळणाऱ्या सवलती देऊ करणाऱ्या तरतुदींचा भंग झाल्याचे दिसून येत आहे.

विश्वस्त निधीतून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या विविध पद्धतींनुसार,  संस्थेचे अनेक प्रवर्तक तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या मालकीच्या तसेच त्यांच्या विश्वासातील कर्मचाऱ्यांच्या विविध बनावट कंपन्या आणि एलएलपी मधून वस्तू आणि सेवांच्या शुल्काच्या नावाखाली ट्रस्टमधून पैसे काढण्यात आले होते. या व्यवहारांमध्ये या संस्थांनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू किंवा सेवा दिलेल्या नाहीत आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. अशा प्रकारे विश्वस्त निधीमधून काढून घेतलेल्या पैशांचा वापर बेनामी मालमत्ता विकत घेण्यासाठी तसेच चुकीच्या गोष्टींसाठी पैसे देण्यासाठी झाला असे दिसून आले आहे. 

या शोधसत्रांमध्ये, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू मधील सुमारे दोन डझन स्थावर मालमत्तांविषयी पुरावे सापडले आहेत. या मालमत्ता एकतर बेनामी आहेत किंवा संबंधित व्यक्तींच्या आयकर विवरणात त्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. या सर्व मालमत्तांवर तात्पुरती टाच आणण्यात आली आहे.

या कारवाईदरम्यान, सुमारे 55 कोटी रुपयांच्या हुंडीस्वरुपात कर्ज घेतल्याचे आणि त्याची रोखीने परतफेड केल्याचे यावेळी सापडलेल्या प्रॉमिसरी नोट, विनिमय पावत्या यांच्या वरून निदर्शनास आले, हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या शोधसत्रातून  सुमारे 27 लाख रुपये रोख आणि 3 कोटी 90 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.

या प्रकरणी, पुढील तपास सुरु आहे.


* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1809308) Visitor Counter : 246


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil