आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्षयरोगावरील उपचाराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे, या आजारातून पूर्ण बरे होणे आणि या आजारापासून प्रत्येकाचे संरक्षण करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे – राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी

“क्षयरोगाचा संसर्ग निश्चित करून त्यावर तातडीने उपचार झाले पाहिजेत जेणेकरून एचआयव्हीवर नियंत्रण मिळविता येईल” : राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे संचालक

“क्षयरोगाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी कुपोषणाची समस्या सोडविणे गरजेचे आहे”

Posted On: 24 MAR 2022 5:15PM by PIB Mumbai

मुंबई, 24 मार्च 2022

क्षयरोग हा हवेद्वारे रोगाचे जीवाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरल्यामुळे होणारा आजार आहे. जगभरात क्षयरोगाचा संसर्ग होण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. जागतिक पातळीवरील एकूण क्षयरोग बाधित रुग्णांपैकी 26% रुग्ण भारतात आहेत.

हे खरे आहे की एड्समुळे होणाऱ्या मृत्युंपेक्षा अधिक मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या या संसर्गजन्य आजारावर अत्यंत परिणामकारक लसी उपलब्ध आहेत. पण, अशा औषधांच्या परिणामापासूनदेखील हा जीवाणू बचावला तर काय होईल?

मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयाने यासंदर्भात आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये बेंगलुरूच्या राष्ट्रीय क्षयरोग संस्थेतील तज्ञ म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रविचंद्र सी. आणि संस्थेचे संचालक डॉ. सोमशेखर एन. यांनी  या जीवाणूची वर्तणूक आणि उपचारपद्धतीवरील त्याचा प्रभाव याविषयी माहिती दिली.

तीन भागांच्या या माहितीपूर्ण मालिकेतील शेवटच्या भागात क्षयरोग विषयातील तज्ञांनी सामायिक केलेली माहिती वाचण्यासाठी येथे कृपया क्लिक करा

औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या जीवाणूंसाठी अधिक तीव्र उपचार

क्षयरोगाला कारणीभूत ठरणाऱ्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्यूलॉसिस जीवाणूंपैकी काही जीवाणूंमध्ये उत्परिवर्तन झाल्यानंतर ते औषधांना दाद देईनासे होतात. क्षयरोगाच्या अशा प्रकाराला औषधरोधक क्षयरोग असे म्हणतात  

औषधाला प्रतिरोध करणाच्या क्षमतेनुसार या जीवाणूंचे वर्गीकरण मोनो-रेझिस्टंट, मल्टीड्रग रेझिस्टंट (एमडीआर) आणि एक्स्टेन्सिव्ह ड्रग रेझिस्टंट (एक्सडीआर) या तीन प्रकारांमध्ये करण्यात येते.

डॉक्टर्स म्हणतात की औषधरोधक क्षयरोग झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 50% ते 60% असते. अशा रुग्णांवर रोगाचे अधिक तीव्र परिणाम होतात आणि त्यांना औषधे देखील दीर्घकाळ सुरु ठेवावी लागतात. औषधाप्रती संवेदनशील असलेल्या क्षयरोगाच्या  बाधित रुग्णाला सहा महिने उपचार घ्यावे लागतात तर औषधरोधक  प्रकारचा क्षयरोग झालेल्या रुग्णाला दोन वर्षांपर्यंत उपचार घ्यावे लागतात. तसेच अशा रुग्णांवर औषधांचे काही दुष्परिणाम झाले आहेत का हे तपासण्यासाठी दर महिन्याला डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी लागते.

आपण या जीवाणूंमधील उत्परिवर्तन थांबवू शकतो!

------------------------------------------------------------------------------------------------------------

या जीवाणूंच्या उत्परिवर्तनाला सर्वात अधिक कारणीभूत आपणच आहोत म्हणजे मनुष्य जात आहे - आपणच या जीवाणूंची वाढ होण्यासाठी आणि त्यांना अधिक ताकदवान होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण केले आहे. या आजारावरील औषधांची टंचाई अथवा अनुपलब्धता, औषधाचे चुकीचे प्रमाण, औषधांची चुकीची संयुक्त योजना, माहितगार व्यक्तीच्या निरीक्षणाखाली उपचार न घेणे आणि रुग्णांची संपूर्ण उपचारप्रक्रियेचे पालन करण्याप्रती टाळाटाळ हे या जीवाणूंच्या उत्परिवर्तनाला कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. तसेच या रोगाला सामाजिकदृष्ट्या लाजिरवाणे समजले जात असल्यामुळे रुग्णाला सर्वांसमोर औषधे घेणे नकोसे वाटते. यामुळे देखील औषधे घेण्यात खंड पडतो.

- डॉ.सोमशेखर एन. राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे संचालक.

------------------------------------------------------------------------------------------------------------

औषधोपचार पद्धतीचे कठोरपणे पालन केल्यामुळे औषधरोधक क्षयरोग उद्भवण्यापासून वाचता येते

डॉक्टर म्हणतात की सहा महिन्यांपर्यंत नियमितपणे क्षयरोगावरील औषधे घेतल्याने तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांची योग्य मात्रा घेतल्याने औषधरोधक प्रकारचा क्षयरोग उद्भवण्यापासून वाचता येईल.

औषधोपचार प्रक्रिया संपूर्णतः पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतरचा उपचारविषयक पाठपुरावा देखील अनिवार्यच

जगभरातील एकूण क्षयरोग बाधितांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. जेव्हा देशातील रुग्ण त्यांना देत असलेल्या उपचारांची संपूर्ण प्रक्रिया जबाबदारीने पूर्ण करतील आणि या रोगाचा प्रसार थांबविण्यास मदत करतील तेव्हाच भारतातून क्षयरोगाचे संपूर्णपणे निर्मूलन होऊ शकेल.

------------------------------------------------------------------------------------------------------------

जर सर्व क्षयरोग बाधित रुग्ण स्वतःहून सरकारी रुग्णालये आणि सरकारी मान्यता असलेल्या प्रयोगशाळांमध्ये आले तर क्षयरोग निर्मूलनाचे 90% काम झाले असे आपण म्हणू शकतो.

- रविचंद्र सी. राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी

------------------------------------------------------------------------------------------------------------

दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला असलेल्या प्रत्येकाने स्वतःहून पुढे यावे आणि क्षयरोगाची चाचणी करून घ्यावी. ज्या रुग्णांनी क्षयरोगावरील उपचार सुरु केले आहेत त्यांनी ते पूर्ण करावेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षयरोगावरील उपचाराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे, या आजारातून पूर्ण बरे होणे आणि या आजारापासून प्रत्येकाचे संरक्षण करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे - रविचंद्र सी. राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी

------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तर उपचारविषयक पाठपुरावा पूर्ण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णाने उपचार पूर्ण झाल्यानंतर देखील क्षयरोगाचा पुन्हा संसर्ग झाला आहे का, किंवा आधीच्या संसर्गानेच पुन्हा डोके वर काढले आहे का हे बघण्यासाठी दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

------------------------------------------------------------------------------------------------------------

संपूर्ण जगातून वर्ष 2030 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर भारतातून वर्ष 2025 पर्यंत क्षयरोगाचा नायनाट करण्याचे आपल्या पंतप्रधानांचे धोरण आहे.

- रविचंद्र सी. राष्ट्रीय क्षयरोग संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी

------------------------------------------------------------------------------------------------------------

भारतातून क्षयरोगाचा संपूर्ण नायनाट होऊ शकतो का?

“होय, भारतातून क्षयरोगाचा संपूर्ण नायनाट होऊ शकतो,” असे या विषयाचे तज्ञ सांगतात. ते म्हणतात या रोगाविरुद्धच्या लढ्यात जर नागरिक आणि क्षयरोगाचे रुग्ण जबाबदारीने वागले तर हे ध्येय नक्कीच साध्य होऊ शकते.

खोकला झाल्यास स्वच्छता राखणे – खोकताना  नाक आणि तोंड झाकणे – संसर्गाचा प्रसार नियंत्रित करण्यात खूप मदत करू शकते. मास्क घालणे हा स्वतःला आणि इतरांना  हवेतून पसरणाऱ्या आजारापासून वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.

पौष्टिक अन्नाचे सेवन केल्यास  हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो . कारण बहुतांश  गरीब देशांमध्ये जिथे क्षयरोगाचा प्रादुर्भाव आहे तेथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे.

“क्षयरोग निर्मूलनासाठी  कुपोषण संपवणे अतिशय गरजेचे  आहे. भारतात क्षयरोगाचे मुख्य कारण  कुपोषण आहे. 15 ते 55 वयोगटातील 50% लोक कुपोषित आहेत आणि त्यापैकी सुमारे 30% क्षयरोगी  आहेत”, असे डॉ. रविचंद्र म्हणाले.

पौष्टिक आहाराव्यतिरिक्त,  क्षयरोग  संसर्गाचे  क्षयरोगात रूपांतर करणारे  अन्य  घटक देखील डॉक्टरांनी स्पष्ट केले.  अनियंत्रित मधुमेह असलेल्या सर्व रुग्णांपैकी 30% रुग्णांना क्षयरोग होऊ शकतो; धुम्रपानामुळे  सुमारे 10% रुग्णांना क्षयरोगाचा धोका असतो तर  घरातील हवेच्या  प्रदूषणामुळे   12% ते  18%.  लोकांना  क्षयरोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

------------------------------------------------------------------------------------------------------------

म्हणूनच उज्ज्वला योजनेची  अंमलबजावणी  अत्यंत आवश्यक आहे – जेणेकरून स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर केल्यानंतर प्रत्येक घर  वायू प्रदूषणापासून मुक्त होईल.

- डॉ. रविचंद्र सी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, एनटीआय

------------------------------------------------------------------------------------------------------------

भारत सरकार आणि केंद्रीय क्षयरोग विभाग क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी विविध धोरणे अवलंबून सक्रियपणे उपाययोजना करत आहेत.

क्षयरोग आणि कोविड-19 साठी दुहेरी तपासणी , उपचार पश्चात  पाठपुरावा, अनुमानित क्षयरोग  तपासणी, प्रतिबंधात्मक उपचार आणि अलीकडील घडामोड  म्हणजे टीबी रुग्णांचे  उप-राष्ट्रीय प्रमाणीकरण या उपाययोजनाचा  समावेश आहे.

तसेच लवकर निदान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जात आहे,ज्यात  खोकल्याचा आवाज वापरून त्या व्यक्तीला क्षयरोग आहे की नाही हे ओळखता येईल  - गोवा राज्यातील क्षयरोग  अभियान प्रमुख -  डॉ. मनीष गावणेकर

क्षयरोगा संबंधितल्‍या कोणत्‍याही प्रश्‍नासाठी 1800-11-6666 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

एचआयव्ही आणि क्षयरोग

------------------------------------------------------------------------------------------------------------

जेव्हा एचआयव्हीचा रुग्ण उपचारासाठी येतो, तेव्हा त्याची लगेचच क्षयरोग  चाचणीही केली जाते. एचआयव्ही रुग्णांसाठी क्षयरोगाचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांना एचआयव्ही आहे त्यांना क्षयरोगाची लागण झाल्यास, क्षयरोग बळावण्याची  शक्यता जास्त म्हणजे  70% असते .

- डॉ.सोमशेखर एन, संचालक, एनटीआय

------------------------------------------------------------------------------------------------------------

एचआयव्ही रुग्णांमध्ये मृत्यूचे सर्वात सामान्य कारण म्हणजे क्षयरोग आणि एचआयव्ही रुग्णांमध्ये सर्वात लवकर होणारा  संसर्ग हा क्षयरोग  आहे. म्हणून क्षयरोगाचे  लवकरात लवकर निदान  करून त्यावर उपचार केले पाहिजेत जेणेकरुन एचआयव्हीवर उपचार करता येईल. दर महिन्याला अशा कोणत्याही अतिसंसर्गजन्य आजारासाठी विशेषत: टीबीसाठी एचआयव्ही रुग्णांची तपासणी केली जाते.

------------------------------------------------------------------------------------------------------------

एचआयव्ही रूग्णांचे आयुर्मान पूर्वीच्या 5-10 वर्षांवरून 20 वर्षांपर्यंत वाढले आहे. लवकर निदान आणि लसींमुळे  एचआयव्ही मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाप्रमाणे नियंत्रणात येऊ शकतो.

- डॉ.सोमशेखर एन, संचालक, एनटीआय

------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षयरोग असलेल्या एचआयव्ही रुग्णांवर उपचार:

एचआयव्ही रूग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या  अँटी-रेट्रोव्हायरल थेरपीसह डॉक्टर क्षयरोग प्रतिबंधक  औषधे लिहून देतात.

जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला क्षयरोग आणि एचआयव्ही दोन्हीचे निदान होते, तेव्हा रुग्णावर प्रथम क्षयरोगावर उपचार केले जातात आणि दोन आठवड्यांनंतर अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी सुरू केली जाते.  कारण  एचआयव्ही आणि टीबी या दोन्हींचे  प्रतिकूल परिणाम समान असतात; यामध्ये उलट्या, जठराला  सूज आणि खाज येणे यांचा समावेश असतो.

जेव्हा रुग्ण प्रतिकूल परिणाम सहन करण्यास सक्षम असतो, तेव्हा अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी सुरू केली जाते.

एचआयव्ही-क्षयरोग   रुग्णांसाठी आधार:

क्षयरोग आणि एचआयव्ही दोन्हीसाठी औषधे घेत असलेल्या रुग्णांमध्ये अधिक प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. डॉक्टर आणि उपचार करणारे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवतात.

क्षयरोगाशी लढण्यासाठी आहार:

------------------------------------------------------------------------------------------------------------

यासंबंधी अनेक  अंधश्रद्धा आहेत की मांसाहार करणे अत्यंत आवश्यक आहे. हे अवैज्ञानिक आहे. जरी तुम्ही मांसाहार करत नसलात तरी काही हरकत नाही. घरी शिजवलेले पौष्टिक अन्न घ्या आणि तुम्ही बरे व्हाल

- रविचंद्र सी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, एनटीआय

------------------------------------------------------------------------------------------------------------

क्षयरोगासाठी विशिष्ट आहार सुचवलेला नाही.

रुग्ण उपचार घेत असताना पौष्टिक आहार घेणे फार महत्वाचे आहे. या काळात रुग्णाला जास्त भूक लागते आणि वजनही वाढू लागते. सर्व प्रकारच्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या यांचाही आहारात समावेश करता येतो.

पुरेसे अन्न खाणे  महत्वाचे आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------

उपचारांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे फार महत्वाचे आहे. तसेच, जेव्हा तुम्ही जेवण कराल तेव्हा पोटभर जेव्हा.  - रविचंद्र सी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, एन टीआय.

------------------------------------------------------------------------------------------------------------

दर महिन्याला रक्त तपासणी केली जाते, नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते आणि आजारी रूग्णांसाठी ऑनलाइन मदत देखील पुरवली  जाते.

* * *

S.Patil/Sanjana/Sushma/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

(Release ID: 1809266) Visitor Counter : 8263

Read this release in: English , Kannada